💥राजापुरचे निर्भिड जनहीतवादी पत्रकार शशिकांतची हत्त्या आणि 'बरंच काही'


💥म्हणूनच प्रत्येक सच्या पत्रकाराला शशिकांत आपला हिरो वाटत असतो💥

राजापूर हे रत्नागिरी जिल्ह्यातलं सुंदर, निसर्गरम्य गाव.. मुंबई - गोवा महामार्गावर वसलंय .. "राजापूरची गंगा" ही राजापूरची जुनी ओळख.. हे गाव अलिकडं चर्चेत आलं ते तेथे होत असलेल्या तेल शुध्दीकरण प्रकल्पामुळे.. आशियातील सर्वात मोठी रिफायनरी राजापुरात होतेय .. रिफायनरीचे समर्थक सांगतात ३ लाख कोटी रूपयांची परकीय गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून महाराष्ट्रात येणारय. ..


एक लाख रोजगार निर्माण होताहेत.....म्हणजे कोकणात बरकत येणार...आबादी आबाद होणार...विरोध करणारे सांगतात, प्रकल्पासाठी १५,००० एकर जमिन लागतेय.. त्यामुळं ८००० शेतकरी भूमीहिन होताहेत .. ३००० स्थानिक विस्थापित होणार आहेत.. मच्छिमारी संकटात येणार आहे.. परिसरात असंख्य नारळी, पोफळीच्या, आंब्याच्या, काजूच्या बागा आहेत.. सुंदर निसर्ग आहे... नाणार प्रकल्पामुळे हे सारं संपणारय....कोकण उध्वस्त होणार आहे..

या दोन बाजू....राजकारण्यांना दोन्ही बाजुंशी काही घेणं नाही..या डोमकावळयांची नजर केवळ वाटयावर.. कोकणात बरकत आली तर ती आपल्यामुळे... कोकणाचा विनाश झाला तर हे विरोधकांचं पाप असं सांगत राहणार.. त्यामुळंच कोकणातील पुढारी सोयीनुसार कधी प्रकल्प समर्थक असतात.. तर कधी विरोधक .. आजही चित्र असंच आहे.. कालचे समर्थक हे आजचे प्रकल्प विरोधक आहेत तर काल विरोध करणारे आज समर्थन करीत आहेत.. हा विरोध किंवा समर्थन "वाटा" कसा मिळणार याच्याशी निगडीत असतो.. जे सत्तेत असतात ते समर्थक असतात.. जे विरोधात असतात ते विरोध  यासाठी करतात की, आपल्या वाट्याला काही येणार नाही हे त्यांना माहिती असते.. समर्थक किंवा विरोधकांच्या टोळ्या केवळ राजकीय मंडळीतच आहेत असं नाही..

 तसे गट सामांन्य जनतेतही आहेत..असतात..शेवटी प्रश्न तीन लाख कोटीतील वाट्याचा असतो..रक्कम जेवढी मोठी.. संघर्ष तेवढाच जीवघेणा...एखादा प्रकल्प येत असताना अगोदर सारेच विरोध करतात.. हळूहळू अनेकांच्या तुंबड्या भरतात.. मग विरोधी आवाज क्षीण होत जातो.. विरोधक कधी समर्थक होतात हे कळतंही नाही.. रायगडात मी याचा जवळून अनुभव घेतलाय.."जमीन आमच्या हक्काची" म्हणत बेंबीच्या देठापासून ओरडणारे पुन्हा "शेती परवडत नाही.. ती कंपनीला दिलेलीच बरी" असं सांगताना मी अनेकांना पाहिलंय... जे विरोधक असतात तेच कालांतराने  प्रकल्पामुळे कसा विकास होणारंय याच्या कथा सांगायला लागतात.. विरोधकांना वश कसे करून घ्यायचे हे कंपन्यांना चांगलं ठाऊक असतं.. कोणाला पाकिटं दे, कोणाला नोकरया तर कोणाला कामाचे ठेके देऊन व्हाईस बंद केला जातो..  यात गावातले उनाड टगे जसे असतात तद्वतच विविध राजकीय पक्षांचे चुकार कार्यकर्ते  असतात.. पत्रकारही मागे नसतात .. जे पत्रकार विकत मिळतात त्यांची खरेदी केली जाते.. जे विकत मिळत नाहीत.. त्यांना गाडीखाली चिरडून त्यांचा आवाज बंद केला जातो.. राजापूरच्या काही पत्रकारांना विकत घेतले गेले.. शशिकांत विकला जात नाही म्हणून त्याचा आवाज कायमचा बंद केला गेला..शशिकांतच्या हत्येची ही सारी पार्श्‍वभूमी... दहशत बसविण्यासाठी हे मार्ग सर्रास वापरले जातात...प्रत्येक प्रकल्पात असा एक तरी बळी दिला जातोच जातो.. हवं तर सारया प्रकल्पाचे इतिहास तपासून बघा..बळी जाणारा कधी  पत्रकार असतो, कधी कार्यकर्ता.. तर कधी सामांन्य माणूस.. 

नाणार प्रकल्पाशी निगडीत पत्रकारांसंबंधीच्या दोन स्टोरीज आज समोर आल्यात ..या दोन्ही स्टोरीज पत्रकारितेतील दोन परस्पर विरोधी प्रवाह दाखवून देणारया...एक धवल.. . दुसरी काळीकुट्ट .. प्रामाणिक पत्रकारिता करणारा आणि विकला न गेलेला शशिकांत हा तत्त्वनिष्ठ पत्रकारितेचा प्रतिनिधी असतो...प्रामाणिकपणाची शिक्षा म्हणून त्याचं कुटुंब किती हलाखीच्या स्थितीत जीवन जगत होतं हे वास्तव जान्हवी पाटील यांनी घटनास्थळी जाऊन आल्यानंतर आपल्या लेखातून मांडलं.. जान्हवीचा मजकूर वाचून डोळ्याच्या कडा आपोआप ओल्या होतात...शशिकांतच्या वाट्याला जे भोग आले ते अंगावर काटे आणणारे असले तरी त्याने पत्रकारितेचं बेअब्रू होऊ दिली नाही.. तत्त्वनिष्ठ पत्रकारिता केली ही दिलासा देणारी बाजू असते...म्हणूनच प्रत्येक सच्या पत्रकाराला शशिकांत आपला हिरो वाटत असतो...

दुसरी स्टोरीय ती पत्रकारितेतील काळी बाजू दाखविणारी..स्प्राउटचे संपादक उन्मेष गुजराथी यांनी स्टोरीच्या माध्यमातून पत्रकारितेतील काळा चेहरा समोर आणलाय... रिफायनरीचे जनसंपर्क अधिकारी अनिल नागवेकर यांनी पंढरीनाथ आंबेरकर याच्या माध्यमातून माध्यमांना मोठ मोठ्या गिफ्ट देऊन  मिंधे करण्याचे आणि त्या माध्यमातून रिफायनरी विरोधाची धार कमी करण्याचा कसा प्रयत्न केला हे गुजराथी यांनी दाखवून दिलंय.. .. माध्यमांनी गप्प राहावं म्हणून पत्रकारांना केवळ पाकिटच दिलीत असं नाही तर त्यांच्या नावावर जमिनी करण्यात आल्या..हे लाभार्थी पुराव्यासह समोर आलेत त्यात "टीव्ही 9" चे मनोज लेले,"आज तक" चे राकेश गुडेकर आणि "साम" चे अमोल कलये यांचा समावेश आहे..

आंबेरकर यांनी त्यांच्या नावे केलेल्या जमिनीची कागदपत्रे उन्मेष गुजराथी यांनी दिलीत.. ज्या पत्रकारांनी चलाखी दाखवत आपल्या नातेवाईकांच्या नावे जमिनी करून घेतल्या त्यांची संख्या देखील मोठी आहे.. काही संपादकांपर्यत याचे लाभ पोहोचले असल्याचे सांगितले जाते.. या सर्व  पत्रकारांना एक्स्पोज केल्याबद्दल उन्मेष गुजराथी यांचं अभिनंदन केलं पाहिजे.. अन्य पत्रकार मॅनेज होतात आणि शशिकांत वारिशे विकला जात नाही.. तो निर्भीडपणे बातम्या देत आहे.. हे पाहून आंबेरकर याचं पित्त खवळलं आणि त्यानं शशिकांत वारिशे यांची निर्घृण हत्या केली...

नाणारचा पहिला बळी एक पत्रकार ठरला..हे सारं इथंच थांबेल असं दिसत नाही.. आम्ही पत्रकार संघटन जरी चालवत असलो तरी आम्ही कायम पत्रकारितेतील सत्प्रवृत्तीबरोबरच राहिलो.. कधी पत्रकारितेतील दुष्परवृत्तींचे आम्ही समर्थन केले नाही अथवा अशा प्रवृत्तीची पाठराखण देखील केली नाही.. त्यामुळेच रिफायनरीचे जे लाभार्थी पत्रकार आहेत त्यांची देखील चौकशी करून त्यांच्यावर  कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे..

लेखक :- एस.एम देशमुख

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या