💥समाजाचे जीवन उज्वल करण्यासाठी ग्रंथालयाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते - प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे


💥स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते💥

पूर्णा (दि.०७ फेब्रुवारी) - प्रतिनिधी - समाजाचे जीवन उज्वल करावयाचे असेल तर ग्रंथालयाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा पुणे विभाग सार्वजनिक ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले. ते पूर्णा तालुक्यातील वझुर येथील अनुसया सार्वजनिक वाचनालय आणि परभणी जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने आयोजित ४५ वे अधिवेशन आणि स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. 


या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य प्राचार्य डॉ. बाबुराव सोळुंके  हे होते. पुढे बोलताना डॉ.पाटणे म्हणाले की नव समाज निर्मितीसाठी ग्रंथालये ही महत्त्वाचीच आहेत. आज मानवी मूल्य पायदळी तुडवली जात असल्याने दुर्गुणांचा अंधार दाटत चालला आहे.  वाढता धर्मद्वेश, अतिरिक्त चंगळवाद यामुळे समाजाचे सांस्कृतिक जीवन उध्वस्त होत आहे. मूल्यहीन राजकारणामुळे संविधानाला तडे जात आहेत. लोकांच्या बुद्धीला ग्लानी आली असून सारा देश एका गुंगीत जगताना दिसतोय. अशा काळात समाजाला जागे करण्यासाठी आणि समाज मनात प्रेम, विश्वास आणि देशभक्ती मूल्ये पेरण्यासाठी ग्रंथालयांनी प्रबोधनाचे उपक्रम राबविले पाहिजेत. ग्रंथालय दुबळी आणि दुर्लक्षित राहीली तर अनेक पिढ्या पांगळ्या होतील अशी चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमात प्राध्यापक डॉ.संजय कसाब लिखित " स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार : जीवन व कार्य " या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथावर भाष्य करतांना डॉ. पाटणे म्हणाले की पुतळे निर्जीव असतात तर ग्रंथ हे जिवंत आणि बोलकी असतात म्हणून इतिहासाचे भान आणि जगण्याची प्रेरणा ग्रंथातून मिळत असते.  यावेळी  

स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार यांच्या कार्याचा  त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख करतांना  म्हणाले की सूर्यभानजी पवार यांच्या सारखी माणसं प्रेरणादायी असतात. म्हणून महापुरुषांची व कर्तृत्ववान माणसांची चरित्रे निर्माण झाली तरच पुढील समाजाला दिशा मिळेत.असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले यावेळी नरेंद्र चव्हाण, प्रा. डॉ. वसंतराव पवार, प्रा. डॉ. सुनिता पवार, योगेश्वरी पवार यांनी आपली मनोगते व्यक्त केली. याकार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुसया सार्वजनिक ग्रंथालयाचे सचिव प्राध्यापक डॉ. रामेश्वर पवार यांनी मांडले या कार्यक्रमाचे उदघाटक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी गाव तिथे ग्रंथालय आणि वाचन संस्कृती जोपासणे काळाची गरज असल्याचे आपल्या उदघाटकीय भाषणात सांगितले. याप्रसंगी मंचावर माजी आमदार गंगाधर पटणे, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, डॉ. आर. एस. बालेकर,गुलाबराव कदम, राम मेकले, उत्तमरावजी कदम, प्रा.गोविंदराव कदम , प्राचार्य डॉ.संतोष कुऱ्हे, गावचे सरपंच लक्ष्मणराव लांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमध्ये सार्वजनिक ग्रंथालय चळवळीतील समर्पित कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना यावर्षीपासून स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानची पवार यांच्या नावाने राज्यस्तरीय, विभागीय व जिल्हास्तरीय पुरस्कार अनुक्रमे तानाजी मगदूम, वसंतराव सूर्यवंशी व चंद्रकांत गोसावी यांना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी चरित्र ग्रंथाचे लेखक प्राध्यापक डॉ.संजय कसाब यांचा कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते याप्रसंगी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. संजय कसाब यांनी केले तर आभार भास्करराव पिंपळकर यांनी मांडले. 

या अधिवेशनासाठी जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते, ग्रंथालय कर्मचारी, चालक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या