🌟परभणी तालुक्यातील तामसवाडी, वरपूड ग्रामपंचायत प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध....!


🌟मतदार यादीवरील आक्षेप, सूचना २ मार्चपर्यंत सादर करा🌟

परभणी (दि.२४ फेब्रुवारी) :  तामसवाडी आणि वरपुड ग्रामपंचायतमधील रिक्त जागांसाठी प्रारुप मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया निवडणूक विभागाकडून सुरु असून, यादी ग्रामपंचायतींच्या सूचना फलकावर डकवून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी या दोन्ही ग्रामपंचायतीच्या यादीवर आक्षेप असतील तर ते २ मार्च २०२३ पर्यंत निवडणूक विभाग, तहसील कार्यालय परभणी येथे कार्यालयीन वेळेत सादर करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी केले आहे. 

            तामसवाडी येथील ग्रामपंचायत सदस्याचे निधन झाल्यामुळे प्रभाग क्रमांक २ मधील नामाप्रची एक जागा तसेच वरपूड येथील नामनिर्देशनपत्र अप्राप्त असल्यामुळे प्रभाग क्रमांक एक व तीन मधील सर्वसाधारणची प्रत्येकी एक व अनुसूचित जातीची एक अशा रिक्त जागा असून, या ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांसाठी प्रारुप मतदार यादी संबंधित ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर शुक्रवार, दि. २४  फेब्रुवारी रोजी डकवून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या प्रारुप यादीवर आक्षेप दि. २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२३ या कालावधीत निवडणूक विभाग तहसिल कार्यालय, परभणी येथे कार्यालयीन वेळेत दाखल करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे व तहसीलदार गणेश चव्हाण यांनी केले आहे. 

            राज्य निवडणूक आयोगाचे उप सचिव यांच्या पत्रातील आदेशान्वये निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणामुळे ग्रामपंचायतीतील सदस्य, थेट सरंपचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदार यादी कार्यक्रम प्राप्त झाला आहे.  या मतदार यादी कार्यक्रमानुसार विधानसभेची मतदारयादी ग्राह्य धरण्याचा दिनांक  ५ जानेवारी २०२३ असून, प्रभागनिहाय प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक २४ फेब्रुवारी आहे. त्यामुळे या प्रारुप मतदार यादीवर दि. २ मार्चपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. कारण ९ मार्च २०२३ रोजी प्रभागनिहाय मतदारयादी अंतिम प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मतदार याद्या पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात येत आहेत, असे तहसीलदार श्री. चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या