💥परभणी जिल्हा उद्या रविवार दि.१९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव दिनी शिवभक्तांच्या जयघोषाने दुमदुमणार....!


💥परभणी शहरासह जिल्ह्यात सर्वत्र शिवजन्मोत्सवाची जय्यत तयारी💥 

परभणी (दि.१८ फेब्रुवारी) : परभणी शहरासह जिल्ह्यात सर्वत्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जन्मोत्सवाची जय्यत तयारी झाल्याचे निदर्शनास येत असून जिल्ह्यातील सेलु,मानवत,जिंतूर,पाथरी,सोनपेठ,गंगाखेड,पालम,पुर्णा आदी तालुक्यांतील शहरांसह ग्रामीण भागात देखील सर्वत्र भगवेमय वातावरण निर्माण झाले असून शिवभक्तांमध्ये जल्लोशाचे वातावरण पाहावयास मिळत आहे.


शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने उद्या रविवारी दि.१९ फेब्रुवारी रोजी विविध राजकीय पक्ष,सामाजिक संस्था व सामाजिक संघटनांद्वारे भव्यदिव्य अशा मिरवणूका,अभिवादन कार्यक्रम तसेच अन्य भरगच्च उपक्रम राबविले जाणार आहेत. विशेषतः परभणीत प्रमुख राजकीय पक्ष व प्रमुख सामाजिक संघटनांनी स्वतंत्रपणे जंगी मिरवणूका काढण्याचा संकल्प सोडला असून त्यामुळेच रविवारी सायंकाळी परभणी नगरी महाराष्ट्राचे आराध्य दैवत ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने’ दुमदुमणार आहे.

* शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रात्री १२-०० वाजता शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी :-

शिवजन्मोत्सवा निमित्त रात्री १२-०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारुढ पुर्णाकृती पुतळा परिसरात परभणी लोकसभा मतदार संघाचे खासदार संजय जाधव,परभणी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.राहुल पाटील तसेच सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने पुष्पवृष्टी केली जाणार आहे.

* परभणी शहरात शिवजन्मोत्सव समितीद्वारे मशाल फेरी व शोभायात्रा :-

शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शनिवार दि.18 फेब्रुवारी रोजी वसमत रस्त्यावरील शिवजयंती महोत्सव समिती कार्यालय हिरो शोरुम समोरून जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड च्या वतीने सायंकाळी ०६-०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत मशाल फेरी काढण्यात आली तर रात्री १२-०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार असून उद्या रविवार दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सकाळी ०६-०० वाजता ‘बाळ शिवाजीचा पाळणा’ हा कार्यक्रम जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ०४-०० वाजता खानापूर फाटा येथून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार असून वसमत महामार्गावरुन निघणार्‍या या मिरवणूकीत मुख्य आकर्षण युवक-युवतींचे शिवकालीन युद्ध कला खेळ पथक, सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध हलगी पथक, पुणे  येथील झांज व ढोल पथक, प्रसिद्ध पोतराज पथक, २१ गोंधळी कलाकार असलेला पारंपारिक गोंधळी पथक, वारकरी, भजनी मंडळ, महिला वारकरी भजनी मंडळ, लेझिम पथक छत्रपती शिवाजी महाराजांचा सुवर्ण रथावर मावळे व आश्‍वासहित सजीव देखावा, फेटेधारी महिला मंडळ तसेच फेटेधारी युवक मित्र मंडळ सहभागी होणार आहेत. तसेच शोभायात्रेच्या स्वागतासाठी  मुख्य रस्त्यावर रांगोळी काढण्यात येणार आहे. याच बरोबर चौका चौकामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे. याशिवाय तरुणांसाठी खास डीजे सुद्धा असणार आहे, अशी माहिती सोहळ्याचे आयोजक शिवजन्मोत्सव समितीचे बालाजी मोहिते, नितीन देशमुख, गजानन जोगदंड,  गंगाधर जवंजाळ, माधव मोहिते यांनी दिली.

* भाजपाद्वारे भव्य मिरवणूक :-

           शिवजयंती निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या महानगर जिल्हा शाखेच्यावतीने रविवारी सायंकाळी 5 वाजता शनिवार बाजारातून मोठी मिरवणूक निघणार आहे. यात कोल्हापूर येथील युवक-युवतींचे शिवकालीन युध्दकला खेळ पथक, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील हलगी पथक, कर्नाटकातील पोतराज पथक, गोंधळी पथक तसेच डिजेसह भजनी मंडळे सहभागी होणार आहेत, अशी माहिती महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी दिली.

* खासदार-आमदारांद्वारे मिरवणूक :-

शिवसेनेचे खासदार संजय जाधव व आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवार बाजारातून रविवारी सायंकाळी 5 वाजता शिवजयंती निमित्त मोठी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्या निमित्ताने ठिकठिकाणी मोठ मोठे होर्डीग्ज उभारण्यात आले आहेत.

* शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्याद्वारे मिरवणूक :- 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सायंकाळी खंडोबा बाजार येथून मोठी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्या निमित्ताने सर्वतोपरी तयारी सुरु आहे.

* वारकरी मंडळाद्वारे भव्य मिरवणूक :-

परभणी जिल्हा वारकरी मंडळ सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा 19 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजीत करण्यात आला आहे. टाळ, मृदंग, हरीनामाच्या गजरात व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जय घोषात शिवाजी महाराज पुतळा ते खानापुर फाटा (वारकरी संस्था) दरम्यान मिरवणुक आहे. सकाळी 7.30 वाजता अल्पोपहार, 8 वाजता शिवपुजन, नंतर दिंडी प्रस्थान, मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी बाल कलाकाराचं स्वागत गीत, साधुसंतांच्या व मान्यवरांच्या हस्ते सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा, तदनंतर महाप्रसाद असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी व्यासपीठ समिती, पुरस्कार समिती, दिंडी परिक्षण समिती, सूत्रसंचलन समिती, दिंडी नियोजन समिती, महिला भजनी मंडळ समिती तसेच प्रसिद्धी समितीच्या माध्यमातुन कार्यक्रम होणार आहेत. समाजासाठी अहोरात्र काम करणार्‍या मान्यवरांना या सोहळ्यांतर्गत कार्यक्रमात पुरस्कार दिले जाणार आहेत. यात सामाजिक, राजकीय, प्रशासन, वैयक्तीक काम करणार्‍या व्यक्तींना वारकरी भुषण, समाज भुषण, एक संघ परिवार, माँ जिजाऊ असे पुरस्कार प्रदान केल्या जाणार आहेत. या सर्व कार्यक्रमात सर्व शिवभक्तांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन बालासाहब मोहिते पाटील यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या