💥उठसुठ पत्रकारांच्या नावानं शिमगा करणारांनी हा मजकूर जरूर वाचला पाहिजे...!


💥आम्ही राजापूरच्या कशेळी गावात गेलो हे आपल्या शशिकांतचं गावं दुर्गम भागातल्या या गावच्या परिसरातच भययुक्त शांतता💥

पत्रकांरांनी प्रामाणिक असावं, नि:पक्ष असावं, निर्भीड असावं, जनतेच्या बाजुनं रोखठोक भूमिका त्या नं घेतली पाहिजे अशी अपेक्षा समाजाची असते.. हरकत नाही परंतू या गुणांची जी शिक्षा भोगावी लागते ती किती भयानक असते याचा प्रत्यय शशिकांत वारिशे हत्येनंतर आलाय.. शशिकांतची हत्या झाल्यानंतर मराठी पत्रकार परिषदेच्या उपाध्यक्षा जान्हवी पाटील शशिकांतचे गाव असलेल्या कशेळे इथं जाऊन आल्या.. तिथं गेल्यानंतर त्यांनी जे पाहिलं, अनुभवलं ते विषण्ण करणारं आहे.. उठसुठ पत्रकारांच्या नावानं शिमगा करणारांनी हा मजकूर जरूर वाचला पाहिजे... 

💥.....मुक्काम पोस्ट शशीचे कशेळी :- 

निष्ठेनं, प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांची अवस्था किती विदारक असू शकते आणि त्यांचा संसार कसा "उजाड" झालेला असतो याचा विषण्ण करणारा प्रत्यय काल आम्हाला आला .. आम्ही राजापूरच्या कशेळी गावात गेलो.. हे आपल्या शशिकांतचं गावं.. दुर्गम भागातल्या या गावच्या परिसरातच भययुक्त शांतता दिसत होती.. लोक तर होते पण पुढं येऊन बोलायला कोणी तयार नव्हतं..  शशिकांतचं घर शोधायला वेळ लागला नाही.. गल्ली बोळा पार करीत शशिकांतच्या घराजवळ पोहोचताच आम्हाला यश दिसला.. हा १९ वर्षाचा यश शशिकांतचा एकूलता एक मुलगा.. वडिलांच्या अचानक जाण्यानं अंतर्बाह्य मोडून पडलेला.. येणारयाकडं निर्विकार नजरेनं पाहणारया यश ची अवस्था पाहून आम्ही सारेच नि:शब्द झालो.. प्रचंड घाबरलेला यश हाताश होऊन टाहो फोडत होता.. बाबा गेल्यानं यश आता एकटा पडला होता.. निरश्रीत झाला होता.. शशिकांतच्या घरात इनमिन तीन माणसं.. शशिकांत, त्याची ७५ वर्षांची अंथरुणाला खिळलेली आई आणि मुलगा यश.. या त्रिकोणी कुटुंबाचा शशिकांत हाच एकमेव आधार होता.. यश चार वर्षांचा असताना आई सोडून गेली.. आजी आणि बाबांनी यशचं संगोपन केलं.. आज यश १९ वर्षांचा आहे.. आयटीआय करतोय.. मात्र अगोदर आई सोडून गेली, आता बाबा गेले.. आजी अंथरुणाला खिळलेली... यशचं आता पुढं काय होणार असा प्रश्न आम्हाला पडलेला..यश आज प्रचंड भिती खाली आहे.. डिप्रेशनमध्ये आहे.. बाबांना मारलं, हे लोक मलाही मारतील अशी भिती तो व्यक्त करतोय.. मिसुरडंही न फुटलेल्या यशचं समजूत कशी घालावी हेच मला समजत नव्हतं.. 

रत्नागिरीहून कशेळेकडं जाताना मनात विचारांचं काहूर माजलेलं होतं.. शशिकांत बद्दल रत्नागिरीत काहींनी अपप्रचार सुरू केला होता.. शशिकांतनं गैरमार्गाने पैसे कमविले असंही बोललं जात होतं.. जेव्हा पत्रकार मारले जातात अथवा पत्रकारांवर हल्ले होतात तेव्हा त्याला बदनाम करणारया काही सुप्त शक्ती कार्यरत होतात.. अनेकदा हा अनुभव येतो.. विषयाचं गांभीर्य संपवून टाकणं हा या मागचा सुप्त उद्देश असतो.. शशिकांत बाबतही अशा सुप्त कंड्या फिकविल्या जात होत्या.. मात्र प्रत्यक्ष शशिकांतच्या घरी गेले तेव्हा शशीच्या बाबतीत होणारया अपप्रचारात काहीच दम नाही याची जाणीव झाली.. शशीचं घर म्हणजे जेम तेम चार पाच माणसं बसतील एवढीच खोली.. पक्क घर नाही.. मातीनं सारवलेल्या भिंती.. ओसरी मातीचीच.. ती शेणानं सारवलेली.. एक लोखंडी कपाट मातीच्या चुलीच्या आसपास पडलेली दोन चार भांडी..किराणा सामानही कुठं दिसलं नाही.. शेजारी शशीच्या वृध्द मातोश्री खाटेवर पडलेल्या.. शशीचा हा तुटपुंजा संसार... शशीला ना जमीन, ना त्याचं बँक बॅलन्स.. ना कोणता बिझनेस.. पत्रकारितेतून मिळणारया तुटपुंज्या पगारावर हा कसाबसा संसार चालवत होता.. म्हणतात ना, श्रीमंती ही  वेषभूषेवरून जशी कळते तशीच ती घरावरूनही दिसते.. शशीच्या घरात असं काही नव्हतं.. असेल तर अठराविश्व दारिद्र्य...घराचा अवतार आणि माणसं पाहून शशी चुकीचं काही करीत असेल या थेरीवर कोणीच विश्वास ठेवणार नाही.. मी तर अजिबातच नाही.. गेली अनेक वर्षे याच अवस्थेत शशीची आई, तो आणि मुलगा इथं नांदत होते..असं शेजारी सांगत होते.. 

यशचं बॅंकेत खातं नाही.. आजीचंही नाही.. मग मदत कुठे आणि कशी करायची..? तात्पुरती रोख मदत करून आम्ही रत्नागिरीच्या दिशेनं निघालो.. पण शशीचं घर, यश आणि तरूण मुलगा गेल्यानं कोलमडून पडलेल्या आजीबाईंची  अवस्था.. हे सारं दृश्य डोळ्यासमोरून जात नव्हतं.. पत्रकारांनी प्रामाणिक असावं, लेखणीशी इमान राखत पत्रकारिता करावी अशी समाजाची अपेक्षा असते.. मान्य करतो आम्ही हे सारं.. पण जेव्हा पत्रकार अडचणीत येतो तेव्हा कोणीच त्याच्या, किंवा त्याच्या कुटुंबाच्या बरोबर असत नाही.. कदाचित प्रामाणिकपणाची ही शिक्षा असेल.. शशीचं कुटुंब याच प्रामाणिकपणाची आज शिक्षा भोगतंय का? माहिती नाही.. परंतू प्रामाणिक पत्रकारांबरोबर आम्ही, आपण सगळे आहोत हा संदेश आपल्याला द्यायचा आहे... म्हणूनच यशला आपल्याला वारयावर सोडता येणार नाही.. आम्ही रत्नागिरी कर पत्रकार काही मदत करणार आहोतच..मराठी पत्रकार परिषद २१,००० मदत करीत आहे.. ज्याला शक्य आहे त्यानं ती करावी.. कारण राज्यातील कोणताही पत्रकार किंवा त्याचं कुटुंब एकाकी किंवा एकटे असता कामा नये..

परिषद याच ध्येयानं काम करते..

यशचे नवे खाते उघडता येईल की, त्याच्या नातेवाईकांच्या खात्यावर मदत पाठवायची हे दोन दिवसात कळवते....

 लेखीका  :- जान्हवी पाटील 

 *उपाध्यक्ष, मराठी पत्रकार परिषद*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या