💥परभणी शहरात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती आयोजित शिव जन्मोत्सव मिरवणूक जल्लोषात संपन्न....!


💥मिरवणूकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व्यंकटेश शिंदे,मराठा आरक्षण समन्वय समितीचे राज्याध्यक्ष सुभाष जावळे,संभाजी सेनेचे रामेश्‍वर शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थिती💥 


परभणी :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंती निमित्ताने रविवार दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने शहरातून भव्य दिव्य अशी शिव जन्मोत्सव मिरवणूक काढण्यात आली.

          शहरातील मध्य वसाहतीतील शनिवार बाजारापासून या मिरवणूकीस ढाल तासे/टाळ मृदंगाच्या गजरात आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय...तुमच आमच नात काय जय जिजाऊ....जय शिवरायच्या गगनभेदी जयघोषात भव्य अश्या मिरवणूकीला प्रारंभ झाला. या मिरवणूकीच्या अग्रभागी फेटेधारी युवती भगवा ध्वज हाताशी घेवून घोड्यावर स्वार होत्या. पाठोपाठ कलशधारी महिला, भगवे फेटे परिधान केलेल्या युवती, महिला भजनी मंडळे तसेच पारंपारिक वेशभूषेतील वासूदेव हे कलावंत सहभागी होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा साकारलेल्या कलावंतांनी संपूर्ण मिरवणूकीचे, परभणीकरांचे लक्ष वेधून घेतले. तर भजनी मंडळाने सुंदर अशी भजने सादर करीत शिवप्रेमींना मंत्रमुग्ध केले.

           या मिरवणूकीत गोंधळी कलावंतांनी सुंदर असा गोंधळ सादर केला व शिवप्रेमींची दाद मिळवली. या मिरवणूकीचे वैशिष्ट्य म्हणजे एका सुंदर अशा सजवलेल्या रथामधून छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनावर बसलेली मूर्ती शिवप्रेमींसाठी आकर्षण होती. तर पालखीत छत्रपती शिवाजी महाराज यांची फेटा परिधान करणारी मूर्तीही लक्षवेधी ठरली.

          आंध्रा बँक कॉर्नर, शिवाजी रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक, तेथून या मिरवणूकीने शिवरायांचा जयघोष करीत गुजरी बाजार, गांधी पार्क, अष्टभूजा चौक व स्टेशन रोड दणाणून सोडला. या मिरवणूकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व्यंकटेश शिंदे, मराठा आरक्षण समन्वय समितीचे राज्याध्यक्ष सुभाष जावळे, संभाजी सेनेचे रामेश्‍वर शिंदे, भारतीय जनता पक्षाचे दिनेश परसावत, सामाजिक कार्यकर्ते रितेश जैन यांच्यासह अन्य पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते सहभागी होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या