🌟स्थलांतरित कुटूंबांतील किशोरवयीन मुलींचे शिक्षण सुरु राहण्यासाठी प्रयत्न करा - जिल्हाधिकारी आंचल गोयल


🌟त्यामुळे अशा मुलींचे शिक्षण सुरु राहण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी अधिक लक्ष देण्याचे दिले आदेश🌟


परभणी (दि.२४ फेब्रुवारी) : आगामी काळात जिल्ह्यातील अनेक कुटूंबांचे रोजगारानिमित्त स्थलांतर होण्याची शक्यता असून, अशा कुटूंबातील किशोरवयीन शालेय मुलींचे बालविवाह मोठ्या प्रमाणावर होऊ शकतात. त्यामुळे अशा मुलींचे शिक्षण सुरु राहण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी अधिक लक्ष देण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आज दिले.

 ‘बालविवाहमुक्त परभणी’ मोहिमेच्या जिल्हा कृती दल समितीची आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. तालुक्यातील एका गावातील माहितीचे विश्लेषण करुन त्यातून आढळून येणाऱ्या कमतरतांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे आदेश त्यांनी जिल्हा कृती दल समिती सदस्यांना दिले. बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेचे वाचन न घेणाऱ्या जिल्ह्यातील शाळांबाबतची माहिती घेण्याच्या सूचना देत पंचायत विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, एकात्मिक बालविकास सेवा योजना, जिल्हा महिला व बालविकास विभाग आणि पोलीस विभागाचा आज जिल्हाधिकारी गोयल यांनी आढावा घेतला.

मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. संदीप घोन्सीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके, पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती आर. पी. रंगारी, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जया बंगाळे, सुमेध सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुमन सोनटक्के, ‘एनआयसी’चे सदानंद जोशी, दीपक जंबुरे, चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक संदीप बेंडसुरे, विकास कांबळे, यांच्यासह जिल्हा कृती दलातील सदस्य यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यात बालविवाहाची घटना घडल्याचे आढळून आल्यास दोन्ही पक्षाच्या जबाबदार असलेल्यांना समितीसमोर उभे करण्याचे आदेश देत समाजाच्या मानसिकतेत बदल होणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. ही मोहीम यशस्वीपणे जिल्ह्यात राबविण्यासाठी पोलीस पाटील, सरपंच, शिक्षक आशासेविका यांनी पालकांची मानसिकता बदलण्यात पुढाकार घ्यावा. सर्व समाजघटकांनी आपापली जबाबदारी योग्यरित्या पार पाडल्यास जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यात नक्कीच यश येईल, असा विश्वासही जिल्हाधिकारी गोयल यांनी व्यक्त केला. 

‘बालविवाहमुक्त परभणी’ मोहिमेच्या ग्रामपातळीवरील समितीच्या बैठकीमध्ये सरपंचाची सर्वाधिक जबाबदारी असून, या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या ४७ सरपंचांना नोटीस पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले. यापुढे बालविवाह रोखण्यासाठी शालेय मुलींची वाढती अनुपस्थिती, तिच्या पालकांचे रोजगारानिमित्त होणारे स्थलांतर याची माहिती घेऊन, शक्य असल्यास अशा मुलींना तात्पुरत्या निवासी वसतिगृहात प्रवेश देऊन शिक्षण सुरु ठेवण्यास त्यांनी सांगितले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या