💥परभणी जिल्ह्यात एकही बालक आरोग्य तपासणीपासून वंचित राहू नये - जिल्हाधिकारी आंचल गोयल


💥'जागरुक पालक,सदृढ बालक' तपासणी अभियान : शून्य ते १८ वयोगटातील मुला-मुलींची होणार आरोग्य तपासणी💥


परभणी (दि. 8 फेब्रुवारी) - परभणी जिल्ह्यात उद्या गुरुवार दि.०९ फेब्रुवारी २०२३ पासून ‘जागरूक पालक, सदृढ बालक’ अभियान अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील बालके, किशोरवयीन मुला-मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकही बालक यापासून वंचित राहू नये. तसेच त्यांच्यामध्ये आढळणारे आजारांची, लक्षणांची व्यवस्थित नोंदी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी यावेळी दिल्या.

तसेच या अभियानाचा जिल्हास्तरावर दोन महिने नियमित आढावा घेण्यात येणार असल्याचे श्रीमती गोयल यांनी   सांगितले. या अनुषंगाने जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेण्यात आली.

 जिल्हा शल्य चिकित्सक सुहास जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. पांचाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे,  उपस्थित होते. यांच्यासह सर्व संबंधित विभागप्रमुख तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक दूरदृष्यसंवाद प्रणालीव्दारे उपस्थित होते.

शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील बालकांची किशोरवयीन मुला-मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे, आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे, गरजू आजारी बालकांना संदर्भसेवा देऊन उपचार करणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे, सुरक्षित व सदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे हा जागरूक पालक, सदृढ बालक अभियानाचा उद्देश आहे. त्यामुळे संबंधित सर्व यंत्रणेने समन्वयाने काम करत ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी सूचना केल्या.

या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, आश्रमशाळा, अंगणवाड्या, बालगृहे, बालसुधारगृहे, अनाथालये, समाज कल्याण व आदिवासी विभागाची मुला-मुलींची वसतिगृहे, खासगी नर्सरी, बालवाडी, खासगी शाळा व खाजगी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शाळाबाह्य मुला-मुलींची तपासणी करण्यात येणार आहे.

परभणी जिल्ह्यामध्ये शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील ३ हजार ११४ शाळांमधील ३ लाख ९ हजार  ६५५ तसेच महानगरपालिका शाळांमधील ८२ हजार ९१ मुले-मुली आहेत. एकही बालक त्या आरोग्य तपासणीपासून वंचित राहू नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या