💥आधार क्रमांक संलग्न करणे बंधनकारक💥
परभणी (दि.03 फेब्रुवारी) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. चार महिन्यांच्या अंतराने २-२ हजार रुपये करून, ही रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत १२ हप्ते शेतकऱ्यांना पाठवण्यात आले असून आता शेतक-यांना १३ वा हप्ता गावातील टपाल विभागातून मिळणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने त्याचा आधार क्रमांक आयपीपीबी खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असल्याचे डाकघर अधीक्षक मोहम्मद खदीर यांनी सांगितले. त्यामुळे आता हा हप्ता उचलण्याची सुविधा पोस्टमनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्यात सद्यस्थितीत १४ लाख ३२ हजार लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नाहीत. यात परभणी जिल्ह्यातील २४ हजार आणि हिंगोलीतील १५ हजार ९०६ लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात तेराव्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही. लाभार्त्यांना त्यांचे खाते आयपीपीबीमार्फत उघडण्याची व ते आधार क्रमांकाशी लिंक करण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्टमास्तरमार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी आपले आधार कार्ड व मोबाईल क्रमांक आवश्यक असणार आहे. आयपीबीबीतर्फे गावात येऊन सदरील सेवा देण्यात येणार आहे. यासोबतच खाते नसणारांचे खातेही उघडून देण्यात येणार आहेत. ते खाते आधार क्रमांकाशी ४८ ते ७२ तासात जोडले जाईल .
* 10 फेब्रुवारीपर्यंत राज्यभर मोहीम :-
प्रधान मंत्री किसान योजनेतील प्रलंबित लाभार्त्यांची बँक खाते आयपीपीबीमध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्यात टपाल कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे गावातील पोस्टमास्तर या लाभार्थ्यांना संपर्क करून पोस्ट ऑफिसमध्ये बँक खाती सुरु करतील. योजनेच्या तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य असल्याने आयपीपीबीमार्फत १० फेब्रुवारी २०२३ या कालावधीत राज्यात मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहीमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहन कृषि संचालक विकास पाटील यांनी केले आहे. ही आधार सीडिंग पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. पोस्टामध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील टपाल कार्यालयातच उपलब्ध असल्याचे डाकघर अधीक्षक मोहम्मद खदीर यांनी सांगितले.......
0 टिप्पण्या