💥परभणी महानगर पालिकेचे नगरसेवक अमरदीप रोडे खून प्रकरणातील आरोपींना जन्मठेप....!


💥जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आज मंगळवार दि.07 फेब्रुवारी रोजी जन्मठेपेची शिक्षा💥

परभणी (दि.07 फेब्रुवारी) : महानगरपालिका सदस्य अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणातील चौघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज मंगळवार दि.07 फेब्रुवारी 2023 रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

         या प्रकरणातील आरोपी क्रमांक 1 रवि वसंत गायकवाड व  आरोपी क्रमांक 2 किरण सोपानराव डाके यांना आजन्म सश्रम कारावास, 5 हजार रुपये प्रत्येकी दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास तर आरोपी क्रमांक 3 मीनाक्षी रवि गायकवाड व आरोपी क्रमांक 4 पार्वती विठ्ठल मोरे यांना आजन्म सश्रम कारावास व 1 हजार रुपये प्रत्येकी दंड व दंड न भरल्यास 15 दिवस सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

         या प्रकरणातील मयत अमरदीप रोडे व आरोपी रवि गायकवाड, किरण डाके हे एकमेकांचे जूने मित्र होते. आरोपी रवि गायकवाड याच्या जायकवाडी वसाहतीतील घरासमोर नळास पाणी येत नव्हते. म्हणून त्याने पाईपास छिद्र पाडून नवीन कनेक्शन घेतले. त्यामुळे वसाहतीमध्ये इतर नागरीकांना पाणी मिळत नव्हते. म्हणून त्या भागातील महिलांनी मयत रोडे यांना महापालिका सदस्य म्हणून भेटून रवि गायकवाड यांच्या कृत्याविषयी तक्रार दाखल केली. यावेळी मयत रोडे यांनी त्यांचे कनेक्शन बंद करु, असे आश्‍वासन दिले. तर आरोपी किरण डाके मयत रोडे यांचे मित्र होते. रोडे यांनी त्यांच्या नावे काळ्या रंगाची स्कार्पिओ एम.एच. 22 ए.एम. 4179 ही गाडी अमरदीप रोडे हे वापरत. परंतु, गाडीचे हफ्ते रोडे हे किरण यास नियमितपणे देत होते. परंतु, तो हफ्ते व्यवस्थित भरत नव्हता. यावरुन त्यांच्यात वाद होता.

         या पार्श्‍वभूमीवर 31 मार्च 2019 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास जायकवाडी वसाहतीतील नागरीक एकत्र आले असता त्यावेळी अमरदीप रोडे हे त्यांच्या गाडीतून त्या ठिकाणी हजर झाले. त्यावेळी त्यांचा या दोघा मित्रांबरोबर वाद झाला. त्यातून किरण डाके याने त्याच्या घरातून कुर्‍हाड आणली अन् रोडे यांच्या मानेवर घाव घातला. त्यावेळी ती कुर्‍हाड रोडे यांनी हिसकावून घेतली व  किरण डाके यांच्या हातात दिली व त्यास दवाखान्यात जाण्याकरीता गाडी काढण्यास सांगितले. परंतु, किरण डाके याने गाडीत डिझेल नसल्याचे कारण सांगून गाडी काढण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपी क्रमांक 1 म्हणजे रवि गायकवाड याने घरात जावून तलवार आणली व रोडे यांना मारण्याचा प्रयत्न केला. रोडे यांनी तलवार हिसकावून घेवून वाकडी करुन फेकुन दिली. त्यावेळी किरण डाके याने त्यांच्या हाताती कुर्‍हाडीने रोडे यांना मारण्यास सुरुवात केली. त्यावेळी कुर्‍हाड रोडे यांच्या हातात रुतली. रोडे यांना त्यांच्या दोघा मित्रांचा मारण्याचा कट लक्षात आला. त्यावेळी ते जीव वाचविण्याकरीता पळत असतांना तोल जावून नळाच्या पाण्याच्या खोल खड्ड्यात पडले. त्यावेळी किरण डाके व रवि गायकवाड या दोघांनी रोडे यांच्या डोक्यावर मोठमोठे दगड मारले. त्यात रोडे हे जागीच मृत्यू पावले. हे दोघे आरोपी तात्काळ तेथून स्वतःचा जीव वाचविण्याकरीता नवा मोंढा पोलिसांना स्वाधीन झाले.

          जायकवाडी वसाहतीतील या खळबळजनक प्रकारानंतर मोंढा पोलिसांनी तात्काळ आरोपींना ताब्यात घेवून घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केला. पाठोपाठ या प्रकरणात बारकाईने तपास करीत साक्षीपुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन पोलिस निरीक्षक रामेश्‍वर तट यांनी तपासांती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

        या खळबळजनक प्रकरणात राज्य सरकारनेही विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. सुभाष उत्तमराव देशमुख हट्टेकर यांनी नियुक्ती केली. जिल्हा व सत्र न्यायालयात खटल्यात विशेष सरकार वकील देशमुख यांनी 25 साक्षीदारांची साक्ष नोंदवली. दोन्ही बाजूंनी युक्तीवाद झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.जी. सातपुते यांनी या चौघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दरम्यान, जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती आर. रागसुधा, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कौर्ट पैरवी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक कपील शेळके, पोलिस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी भांगे, कोर्ट पैरवी अंमलदार प्रमोद सूर्यवंशी व वंदना आदोडे यांनी काम पाहिले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या