💥कबीर आणि गांधी यांनी नैतिकता आचरणात आणली होती - डॉ. रजनी सिन्हा


💥'तत्त्व-प्रकाश व्याख्यानमालेचे' 17 वे पुष्प संपन्न💥

15 फेब्रुवारी  2023 रोजी मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभागाद्वारे, तत्त्वज्ञान विषयातील संशोधन आणि संशोधन पद्धत्तिशास्त्राला वाहिलेल्या 'तत्त्व-प्रकाश' व्याख्यानमालेचे 17 वे पुष्प सम्पन्न झाले. हे पुष्प मुलगी जेठा महाविद्यालय जळगाव येथील तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. रजनी सिन्हा यांनी गुंफले. 

डॉ. रजनी सिन्हा यांनी 1998 या वर्षी मगद विद्यापीठ, बोधगया येथून डॉ. रमा सेन यांच्या मार्गदर्शनात ''महात्मा गांधी और संत कबीर के नैतिक विचार : एक आलोचनात्मक अध्ययन" या विषयावर संशोधन केले. सदर संशोधन विषय व त्यातील पद्धत्तिशास्त्राला अनुसरुन त्यांनी 'कबीर और गांधी के नैतिक विचार' या विषयावर आपले व्याख्यान दिले. डॉ. सिन्हा यांनी आपल्या व्याख्यानातून, पहिल्यांदा संशोधन विषयातील पद्धतीशास्त्रावर प्रकाश टाकला. तसेच त्यांनी आपल्या संशोधन कार्यामध्ये निर्माण झालेल्या समस्या आणि त्यातील प्रकरण याविषयी माहिती दिली. 

आपल्या व्याख्यान विषयावर बोलत असताना डॉ. सिन्हा यांनी, संत कबीर आणि महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून दिला. त्यानंतर त्यांनी या दोन्हीही महामानवाच्या धार्मिक, सामाजिक आणि नैतिक विचारांवर प्रकाश टाकला. त्यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितले की, मध्ययुगीन कालखंडामध्ये संत कबीर यांनी तत्कालीन समाजामध्ये असलेल्या सामाजिक कुप्रथांना विरोध केला. प्रामुख्याने त्यांनी वर्णव्यवस्थेचे खंडन केले. त्यांनी जाती व धर्म यातील भेद अमान्य केला. कबीरांप्रमाणे समकालीन कालखंडामध्ये महात्मा गांधींनी सुद्धा कळ्या गोळ्याचा भेद अमान्य केला. जातीभेद आणि अस्पृश्यता अमान्य केली. याशिवाय डॉ. सिन्हा म्हणाल्या की, संत कबीर आणि महात्मा गांधी हे दोघेही धर्म मानणारे होते. नैतिकतेसाठी धर्म आवश्यक असतो असे या दोघांनीही मानले होते. मात्र धर्माच्या नावाने चालणारे अवडंबर, कुप्रथा, भेदाभेद आणि कर्मठपणा या दोघांनी कधीही मान्य केला नव्हता. 

संत कबीर यांनी आपले विचार दोह्यांच्या माध्यमातून अभिव्यक्त केले तर गांधींनी ग्रंथ लिहून आणि व्याख्याने देऊन आपले विचार मांडले. या दोघांनीही आपल्या विचारातून मानवतावादी दृष्टिकोन समाजाला दिला. मानवतावादाच्या संदर्भाने नैतिक आचरण हे फार महत्त्वाचे असते, असे या दोघांनी मांडले. नैतिकता ही केवळ सैद्धांतिक स्वरूपाची नसते, तर तिला प्रत्यक्ष आचरणात आणले पाहिजे; असे या दोन्ही महामानवांचा आग्रह होता. या दोन्ही महामानवांनी सत्य, अहिंसा, दया, करुणा, परोपकार, स्वच्छता इत्यादी मूल्यांना अनुसरून अनेक विचार अभिव्यक्ती केले. मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही महामानवांनी ही सर्व मूल्य आपल्या आचरणात आणली होती. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने भारताच्या भूमीवर संत कबीर आणि महात्मा गांधी यांचे विचार व कार्य आदर्श प्रारूप मानली जातात, असे मत डॉ. रजनी सिन्हा यांनी व्यक्त केले.

व्याख्यानाच्या प्रारंभी व्याख्यानमालेचे आयोजक तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. वेदप्रकाश डोणगावकर यांनी वक्त्यांचा परिचय करुन देत व्याख्यानमालेचा उद्देश स्पष्ट केला आणि व्याख्यानानंतर व्याख्यात्यांचे व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रसह, मध्यप्रदेश उत्तर प्रदेश झारखंड, राजस्थान इत्यादी राज्यातील प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि तत्त्वज्ञान प्रेमी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या