💥मराठी पत्रकार परिषदेच्या 19 मार्च रोजी होणाऱ्या चाकुर मेळाव्यास उपस्थित राहण्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन...!


💥या कार्यक्रमाला उद्‌घाटक म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्विकारले💥

 ✍️ मोहन चौकेकर 

मुंबई :- लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व चाकूर तालुका पत्रकार संघातर्फे महाराष्ट्रातील पत्रकारांच्या मेळाव्यासह राज्यातील विभागवार पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा मार्च महिन्यात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उद्‌घाटक म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील व परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांच्या उपस्थितीत देण्यात आले. या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या संकल्पनेतून व चाकूर तालुका पत्रकार संघाच्या मागणीनुसार महाराष्ट्रातील पत्रकारांच्या मेळाव्यासह राज्यातील विभागवार पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा मार्च महिन्यात चाकूर जि.लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे. 

या कार्यक्रमांचे उद्घाटन व विभागस्तरीय पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते करण्याचे सर्वानुमते ठरले आहे. या सोहळ्याचे निमंत्रण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील, परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे लातूर जिल्हा निमंत्रक संगमेश्वर जनगावे, डिजिटल मीडियाचे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय बेंबडे, वरिष्ठ पत्रकार विनोद निला, चाकूर तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव विकास स्वामी, नवनाथ डिगोळे, सदाशिवराव मोरे पाटील यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

या पुरस्कार वितरण सोहळ्यात मोहाडी तालुका पत्रकार संघ जि.भंडारा (नागपूर विभाग), धामणगाव तालुका पत्रकार संघ जि.अमरावती (अमरावती विभाग), औढा नागनाथ तालुका पत्रकार संघ जि.हिंगोली (लातूर विभाग), अमळनेर तालुका पत्रकार संघ जि.जळगाव (नाशिक विभाग), पुरंदर तालुका पत्रकार संघ जि.पुणे (पुणे विभाग), जत तालुका पत्रकार संघ जि.सांगली (कोल्हापूर विभाग), पैठण तालुका पत्रकार संघ जि.औरंगाबाद (औरंगाबाद विभाग), महाड तालुका मराठी पत्रकार संघ जि.रायगड (कोकण विभाग) आदीं संघांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी या राज्यस्तरीय कार्यक्रमास राज्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन चाकूर तालुका मराठी पत्रकार संघ व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार ५ मार्च रोजी चाकूर येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार होता.. मात्र ६ मार्च रोजी असलेली होळी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली १९ मार्च ही तारीख त्यामुळं ५ मार्चचा मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे.. तो १९ मार्च रोजी होईल.. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या