💥बीआयएसने मानांकित केलेल्या वस्तूंची खरेदी करावी - उपसंचालक निशा कणबरगी


💥असे आवाहन ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डच्या पुणे कार्यालयाच्या उपसंचालक निशा कणबरगी यांनी केले💥


परभणी (दि.25 जानेवारी) : वस्तुंच्या गुणवत्ता प्रमाणिकरणात बीआयएसचे महत्त्व अनन्यसाधारण असून ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (बीआयएस)ने मानांकित केलेल्या वस्तूंचीच प्रत्येकाने खरेदी करावी, असे आवाहन ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डच्या पुणे कार्यालयाच्या उपसंचालक निशा कणबरगी यांनी केले.

जिल्हा प्रशासन व भारतीय मानक ब्युरोच्या पुणे कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात  जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण व जागरुता याबाबत आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या.  

कार्यशाळेस तहसीलदार श्रीमती छाया पवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अश्विनी स्वामी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरूड यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

ग्राहकांची फसवणूक टाळावी व त्याला योग्य गुणवत्तापूर्ण वस्तुंचा पुरवठा व्हावा, यासाठी बीआयएस विविध उत्पादनांची गुणवत्ता निर्धारित करुन प्रमाणित करते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (बीआयएस)ने मानांकित केलेली वस्तूंची गुणवत्ता अधिक असल्याने मानांकित वस्तूच्या खरेदीस प्राधान्य द्यावे. मानांकित वस्तूंची माहिती ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड वेबसाईटवर देण्यात आली आहे त्याचा वापर करावा. 

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डकडून वस्तूंना मानांकन कसे दिले जाते, त्याची गुणवत्ता तपासणी  याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.  विशेषत: सोने खरेदी करताना काय कोणती काळजी घ्यावी. हॉलमार्क चिन्ह, गुणवत्ता याबाबत कार्यशाळेत माहिती दिली बाजारात दोन प्रकारचे दागिने आढळतात. यामध्ये  एक प्रकार आहे गैर मानांकित आणि दुसरा असेल ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (बीआयएस)नुसार मानांकित, जे सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र देतात. बीआयएस मार्क असलेले दागिने थोड्या अधिक किमतीला विकले जात असले तरी दागिने आणि गुंतवणूक अशा दोन्ही हेतूंनी दागिने खरेदी होते, तेव्हा उच्च शुद्धता आणि बीआयएस मार्क धातूचा विचार केला पाहिजे, असेही श्रीमती निशा कणबरगी यांनी सांगितले. कार्यशाळेत शिक्षण, कृषी, जलसंपदा, बांधकाम, आरोग्य आदी विविध विभागांच्या विविध बाबींसंदर्भातील मानांकनाबाबत महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. 

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड मार्फत मानांकित वस्तू ग्राहकांनी खरेदी कराव्यात. त्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. ग्राहकांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये यासाठी जनजागृतीच्या या मोहीमेत सर्व शासकीय विभागांनीही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड मार्फत कोण-कोणत्या वस्तूंना मानांकन देण्यात आले आहे, याची माहिती, उत्पादनाची गुणवत्ता तपासणी, तक्रार कशी करावी याबाबतची माहिती विभागाच्या www.bis.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली असल्याची त्यांनी सांगितले. कार्यशाळेत उपस्थित अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न व शंकांचे उपसंचालक श्रीमती कणबरगी यांनी निरसन केले.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या