💥परभणी जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी आंचल गोयल


💥ऊस तोडीसाठी इतर जिल्ह्यातून कामगार आले आहेत. या कामगारांची अन्नधान्याची सोय व्हावी हा मुळ उद्देश💥


परभणी (दि.20 जानेवारी) : जिल्ह्यातील साखर कारखाऱ्यांसाठी लागणाऱ्या ऊस तोडीसाठी इतर जिल्ह्यातून कामगार आले आहेत. या कामगारांची अन्नधान्याची सोय व्हावी, यासाठी अन्नधान्य व पुरवठा विभागामार्फत अन्नधान्य पोर्टबिलीटी योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या ऊसतोड कामगारांनी ‘एक देश एक रेशनकार्ड’ या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी केले आहे. 


जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना ‘एक देश, एक रेशन कार्ड’, आरोग्य तपासणी व शैक्षणिक समस्या, ओळखपत्र देणे व स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या विविध समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली होती. जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मंजुषा मुथा, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, समाजकल्याण सहायक आयुक्त श्रीमती गिता गुठ्ठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, आणि कारखान्याचे सरव्यवस्थापक यांची उपस्थित होते बहुतांश ऊसतोड कामगार हे इतर जिल्ह्यातून स्थलांतरीत होऊन आले आहेत. त्यामुळे योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित कारखान्याचे सरव्यवस्थापक यांनी संबंधित तहसीलदार यांच्या संपर्कात राहून ऊसतोड कामगारांना अन्नधान्य पोर्टबिलीटी योजनेअंतर्गत स्वस्त अन्नधान्य उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी दिल्या. 


प्रत्यक्ष ऊसतोडीचे काम करणाऱ्या कामगारांना फडाच्या ठिकाणी व साखर कारखाना परिसरात दि. 16 ते 25 जानेवारीदरम्यान जिल्हा परिषदेच्या आरोग्यामार्फत ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी करणे सुरू आहे. या मोहिमेचा लाभ ऊसतोड कामगारांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. परभणी जिल्ह्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार सात हजार ऊसतोड कामगार आहेत. जिल्ह्यातील सर्व ऊसतोड कामगारांची नोंद घेण्याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सरव्यवस्थापकांनी ऊसतोड कामगारांची परिपूर्ण माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी व सहायक आयुक्तांकडे द्यावी. या कामगारांसंदर्भात शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी विशेष मोहीम व कॅम्प राबवावेत. त्यांची मुले कुपोषित राहू नयेत, यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी व बालविकास अधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावे. त्यांच्या पाल्यांना हंगामी वसतिगृह व इतर शिक्षण विभागाच्या शांळाच्या माध्यमातून शिक्षण घेण्यास प्रवृत करावे. ऊसतोड कामगारांसंदर्भात सर्व यंत्रणांनी संवेदनशीलतेने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या