💥‘बालविवाहमुक्ती’साठी संवेदनशीलतेने काम करा - जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल



💥जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली💥

परभणी (दि.31 ‍जानेवारी) : जिल्ह्यात बालविवाह थांबविण्याला जिल्हा प्रशासनाला यश येत असून, यापुढेही बालविवाहमुक्त जिल्हा कृती आराखड्यानुसार सर्वांनी अधिक सक्रियपणे आणि संवेदनशीलतेने काम करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आज यंत्रणेच्या विभागप्रमुखांना दिले. ‘बालविवाहमुक्त परभणी’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेची जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके, महिला व बालकल्याण अधिकारी अरविंद आकात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. संदीप घोन्सीकर, समाजकल्याणच्या सहायक आयुक्त श्रीमती गिता गुठ्ठे, उपशिक्षणाधिकारी (मा.) गणराज येरमळ, शिक्षणाधिकारी (प्रा.) विठ्ठल भुसारे, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, बालकल्याण समिती सदस्य ॲङ वनिता काळे, एसबीसीबी युनिसेफचे जिल्हा समन्वयक विकास कांबळे, केंद्र समन्वयक संदीप बेंडसुरे  यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

परभणी जिल्हा बालविवाहमुक्त करण्याची ही प्रक्रिया दीर्घकाळ चालणार असून, या महत्त्वाकांक्षी मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी गांभिर्याने काम करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात जानेवारी महिन्यात झालेल्या एकूण विवाह, त्यांची ग्रामपंचायत स्तरावरील अचूक माहिती,  रोजगाराच्या शोधात जिल्ह्यातून होणाऱ्या स्थलांतरित कुटूंबांची संख्या, त्या कुटूंबात असणाऱ्या किशोरवयीन मुलींची माहिती ठेवण्याचे आदेशही यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी प्रशासनाला दिलेत. तसेच नोडल अधिकारी, पंचायत समिती, ग्रामपंचायत, तलाठी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, आशा, अंगणवाडी सेविका, बालरक्षक शिक्षक यांनी बालविवाहमुक्त मोहिमेत सक्रियपणे सहभागी होण्याच्या सूचना केल्या.

बालविवाहमुक्त परभणी मोहिमेचा सातत्याने आढावा घेण्यात येणार असून, समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून त्यांची मानसिकता बदलण्याचे काम करावे लागणार असल्याचे श्रीमती गोयल यांनी सांगितले. ही मोहीम राबविताना 1098 या निशुल्क क्रमांकावर संपर्क साधून गावात होणाऱ्या बालविवाहाची माहिती देण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी जिल्हा कृती आराखडा समितीमध्ये उपस्थित सर्व सदस्यांनी गुगल फॉर्मवर अचूक माहिती भरण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी तसेच जिल्ह्यात बालसभा घेण्याच्या सूचना दिल्या. दर महिन्याच्या एक तारखेला ग्रामपंचायतीकडून दवंडी पिटविण्यात यावी, असेही सांगितले.  जिल्ह्यात 1098 या नंबरबाबत व्यापक प्रमाणावर जनजागृती करुन नियोजित बालविवाह थांबविण्यासाठी मदत करावी. तसेच प्रत्येक तालुक्यात चित्ररथाद्वारे जनजागृती करावी. सर्व विस्तार अधिका-यांचे प्रशिक्षण घेण्यात आले असून, आता जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांची कार्यशाळा घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी दिले. 

तसेच पुढील काही दिवस रोजगाराच्या किंवा इतर कारणांमुळे गावातून स्थलांतरित होणाऱ्या कुटूंबांची त्याबाबत सविस्तर माहिती घेण्याच्या सूचना दिल्या. यासाठी पुढील काही महिने जिल्हा प्रशासकीय यंत्रणेला अधिक सतर्क  राहावे लागणार आहे. या मोहिमेत जिल्हा प्रशासकीय यंत्रणेने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची आवश्यकता असून, जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये बालरक्षक शिक्षक नियुक्त करून शिक्षण विभागाने त्याचा अहवाल सादर करण्याबाबत सांगितले.  

डॉक्टरांनी समाजातील विविध घटकांतील पालकांचे बालविवाह मुक्तीबाबत समुपदेशन करावे. त्यांना बालविवाहापासून परावृत्त करा. असे सांगून यंत्रणेत एकसूत्रता येण्यासाठी सर्वांनी काम करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी सांगितले......

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या