💥परभणी जिल्हा लोकसहभागातून बालविवाह मुक्त करु या - जिल्हाधिकारी आंचल गोयल


💥‘बालविवाह मुक्त परभणी’ चळवळीला आजपासून सुरुवात : बोधचिन्ह,घोषवाक्य आणि कृती आराखड्याचे विमोचन💥


परभणी (दि.04 जानेवारी): जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होणारे बालविवाह थांबविण्यासाठी ‘बालविवाहमुक्त परभणी’ कृती आराखड्याला आजपासून प्रत्यक्ष सामाजिक चळवळ म्हणून सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह शासकीय यंत्रणेच्या सर्व विभागांनी या चळवळीमध्ये संवेदशीलतेने सहभागी होत परभणी जिल्ह्याला बालविवाह मुक्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आज येथे केले.


‘बालविवाह मुक्त परभणी’मध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, त्यांचे स्वयंसेवक, ग्रामीण यंत्रणा, शाळा-विद्यार्थी आणि समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग वाढावा, यासाठी आज (दि. 04) सकाळी जिल्हा नियोजन सभागृहात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘बालविवाह मुक्त परभणी’ बोधचिन्ह, घोषवाक्य आणि कृती आराखड्याचे विमोचन करण्यात आले. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती गोयल बोलत होत्या.


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, सुशांत शिंदे, श्रीमती स्वाती दाभाडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्री. लांडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मंजुषा मुथा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव आदी याप्रसंगी उपस्थित होते. 


सर्व शासकीय यंत्रणेकडून घेतलेल्या अभिप्रायातून बालविवाह कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण मोठे असून, ग्रामीण भागातील शाळा गळती, शिक्षणाचे प्रमाण कमी, उदरनिर्वाहाची कमी साधने, त्यामुळे होणारे स्थलांतर, सामाजिक असुरक्षिततेची भावना वाढीस लागणे, तसेच रुढी परंपरांचा पगडाही याला कारणीभूत असल्याची बाब त्यांनी विशद केली. यावर मात करण्यासाठी शिक्षणाचा प्रसार करणे, लोकांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे, त्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करणे आवश्यक असून, शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी जाईल तिथे याबाबतची जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले.

बालविवाहाला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, ग्राम पंचायत स्तरीय आणि वॉर्डस्तरावर कृती समितीची स्थापना केली असून, त्यामुळे बालविवाहमुक्त परभणी ही सामाजिक चळवळ होईल, असा विश्वास व्यक्त केला. दीर्घकाळ चालणाऱ्या चळवळीत जिल्हा कृती आराखड्यातील प्रत्येक सदस्याने आपापली जबाबदारी ओळखून आपल्या परिसरात बालविवाह न करण्याबाबत लोकांमध्ये जाणीव जागृती करण्याचे आवाहन केले. त्यासाठी सर्वत्र 1098 आणि 112 या निशुल्क क्रमांकाचा वापर करण्याचे सांगून अति काळजी घेणारे घटकाबाबत माहिती दिली. तसेच जिल्हा कृती समितीने करावयाच्या कार्यवाहीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

जिल्हा परिषदेची संपूर्ण यंत्रणा बालविवाह मुक्त परभणी या चळवळीमध्ये सक्रियपणे कार्य करेल. त्यासाठी बालविकास विभाग, गटविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, ग्रामपंचायत, शिक्षक, विद्यार्थी, महिला बचत गट आदींना सहभागी करुन लोकसहभाग वाढविण्यात येईल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

या चळवळीत महानगरपालिका क्षेत्रात ही चळवळ राबविण्यास मनपा कटीबद्ध असून, सर्व अधिकारी –कर्मचाऱ्यांना सहभागी करुन घेत, शहरातील नागरिकांना महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर यांनी दिली.

बालविवाह हे परभणी जिल्ह्यातील वास्तव असून, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी प्रशासकीय कामे करताना सामाजिक समस्येकडे लक्ष घालून त्यात सर्वांचा सहभाग वाढवला आहे. त्यामध्ये प्रशासकीय यंत्रणेतील सर्वांनी आपापला सहभाग वाढवून समाजाची बालविवाहाबाबतची मानसिकता बदलण्याची गरज व्यक्त केली. कोविडोत्तर काळात बालविवाहाचे प्रमाण वाढले असून, ते थांबविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करून जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांच्या सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय होण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. लांडगे यांनी समयोचित मार्गदर्शन केले. तत्पूर्वी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजा राममोहन रॉय, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांनी केले. सूत्रसंचालन मनिषा गोरे आणि आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी मानले. तसेच शितल कानडे यांनी बालविवाहातून होणारे दुष्‌परिणामाबाबत एकपात्री नाट्य सादर करत उपस्थितांना अंतर्मूख केले.

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते यावेळी माणिक भालेकर, संगिता ससाणे, गिता पौंड, अनंता सौगे, गणेश लोंढे, विशाल गायकवाड, मिलिंद कांबळे, दिलीप श्रृंगारपुरे, भाग्यश्री चव्हाण आणि सैनी सिंग आदींचा सत्कार करण्यात आला.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या