💥परभणीतील हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क साहेब यांच्या उर्सानिमित्त उद्या मानाचा संदल निघणार...!


💥जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना प्रथमतः संदल मिरवणूकीचा मान💥

परभणी (दि.31 जानेवारी) :  हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क साहेब यांच्या उर्सानिमित्त दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी 1 फेबु्रवारी रोजी दुपारी 2.30 वाजता उस्मानीया मस्जिद स्टेशन रोड येथून मानाचा संदल निघणार आहे. परंपरेनुसार जिल्हाधिकारी हे संदल मिरवणूकीचे मानकरी आहेत.


           परभणी महानगराची ओळख मराठवाड्यात नव्हे तर संपूर्ण महारष्ट्रात, शेजारील राज्यात प्रचिती करुन देणारे एक स्थळ म्हणजे येथील हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क यांचे दर्गाह आहे. सय्यद शाह तुराबुल हक्क यांना या भागातील लोक श्रध्देने ‘तुरतपीर’ चे बाबा म्हणजे असे पीर जे दुःखी लोकांचे दुःख तुरंत दूर करतात. याच भावनेपोटी महाराष्ट्रातून नव्हे तर शेजारी राज्यातुनही लाखो भाविकांची मोठी संख्या या उर्सानिमित्त दर्गाहच्या दर्शनाकरीता येत आली आहे. या भाविकांमध्ये हिंदू, मुस्लीम, सर्व धर्माचे नागरीक आहेत.म्हणून हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क साहेब यांचा उर्स राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून ओळखला जात आहे.

          स्वतंत्र्यापुर्वी 1907 साली परभणीच्या जिल्हाधिकारी पदावर मोहिनोद्दीन नावाचे जिल्हाधिकारी रुजू झाले होते. त्यांना सुफी संत यांच्याविषयी श्रद्धा होती. त्यांना हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क साहेब यांच्या दर्ग्याबद्दल माहिती मिळाली. त्यांनी श्रध्देने या दर्ग्यास भेट दिली आणि दर्ग्याबाबत माहिती मिळविली. दर्ग्याची व येथे भरणार्‍या उर्साच्या व्यवस्थापनासाठी स्थनिक हिंदू व मुस्लीम समाजातील सक्रीय लोकांचा सहभाग घेऊन एक योजना आखली. व तत्कालीन प्रशासनाकडून मंजुर करुन घेतली. इ.स. 1908 पासून जिल्हाधिकारी हे उर्साचे व्यवस्थापक म्हणून त्यांच्या देखरेखीखाली नियोजनबध्द उर्साची सुरुवात झाली. जनतेच्या श्रध्देला शासकिय इतमामाची जोड मिळाल्यामुळे या उर्साचे स्वरूप बदलून त्याला भव्यता मिळाली व त्याची शान अजून वाढली, अशी माहिती संदल कमिटीचे संयोजक नसीर अहेमद खान यांनी दिलासाशी बोलतांना दिली.

* संदल मिरवणूक परंपरा व मानकरी :-

             दि. 01 फेब्रुवारी रोजी संदल मिरवणूकीने या उर्साची रितसर सुरुवात होते. जिल्हाधिकारी हे संदल मिरवणूकीचे मानकरी असल्यामुळे जिल्हाधिकारी हे परंपरेनुसार आपल्या डोक्यावर संदलचे तबक (कश्ती) घेऊन या संदल मिरवणूकीची सुरुवात करत आले आहेत. स्वातंत्र्यापूर्वी संदल मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालया पासुन निघायची, जिल्हाधिकरी हे संदलचे तबक (कश्ती) आपल्या डोक्यावर घेऊन प्रवेशद्वारा पर्यंत यायचे. 1948 नंतर उर्साचे आयोजन महाराष्ट्र वक्फ बोर्ड यांच्याकडे सोपविण्यात आले, तेव्हापासुन आज पर्यंत संदलची मिरवणूक जिल्ह वक्फ कार्यालय, उस्मानीया मस्जिद स्टेशन रोड, येथून काढण्यात येत आहे. उर्साचे व्यवस्थापन महाराष्ट्र वक्फ बोर्ड यांच्याकडे असले, तरी उर्साची देखरेख जिल्हाधिकारी यांच्याकडे आहे. परंपरेनुसार दरवर्षी दि. 01 फेब्रुवारी रोजी 2.30 वाजता जिल्हाधिकारी यांचे आगमन उस्मानीया मस्जिद येथे होते. त्यांच्या सोबत पोलीस अधिक्षक, मराठवाडा वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकार अधिकारी, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महाराष्ट्र वक्फ बोर्ड प्रशासनातील अधिकारी, शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व हजारोंच्या संख्येने भाविक येथे उपस्थित असतात. महाराष्ट्र वक्फ बोर्ड व संदल समिती यांच्या तर्फे  जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व इतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात येतो. दु 3.00 वाजता जिल्हाधिकारी हे संदलचे तबक घेऊन मस्जिदीच्या बाहेर पर्यंत येतात व संदल मिरवणूकीचा प्रारंभ हातो. अशा प्रकारे अत्यंत आदरपूर्वक व जल्लोषाने संदलची मिरवणूक शहरातील विविध भागातून वाजत गाजत रात्री 8.00 वा दर्ग्यापर्यंत पोहचते व अशा प्रकारे उर्साची रितसर सुरुवात होते.

* संदल मिरवणूकीचे व्यवस्थापन :-

           1908 पासून संदल मिरवणूकीचे व्यवस्थापन तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी श्री हाजी गुलाम यासीन खान जमादर यांच्याकडे सुपुर्द केले होते. त्यांनी 72 वर्ष ही जबाबदारी सांभाळली. त्या नंतर त्यांचे वारस खाजा खान मुस्तफा खान यांनी ही जबाबदारी संभाळली. आजपावेतो हाजी गुलाम यासीन खान यांचे नातू नसीर अहमद खान व इतर वारसादार ही जबाबदारी पार पाडत आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या