💥परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो रब्बी पिकस्‍पर्धेत सहभागी व्हा अन् बक्षीसे जिंका....!


💥या स्पर्धेत जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषि संचालक विकास पाटील यांनी केले💥

परभणी (दि. 20 डिसेंबर) : राज्यात प्रयोगशील शेतक-यांकडून विविध पिकांच्या माध्यमातून उत्पादन वाढविले जाते. त्यातून त्यांचा आर्थिक स्तर उंचावतो. अशा शेतक-यांकडून इतरांनी प्रेरणा घेत आर्थिक प्रगती साधावी, यासाठी रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस पिक उत्पादक शेतक-यांच्या जिल्हा आणि तालुकास्तरीय पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषि संचालक विकास पाटील यांनी केले आहे.

विविध प्रयोगातून आर्थिक प्रगती साधणा-या शेतक-यांचे इतर शेतक-यांना मार्गदर्शन मिळावे आणि रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवसाच्या माध्यमातून कृषि उत्पादनामध्ये भर पडावी,  हा उद्देश  ठेवून राज्यांतर्गंत  पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.  रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस आदी पाच पिके असून, पिकस्पर्धेतील पिकाची निवड करताना त्या पिकाचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान  एक हजार हेक्टर असावे. तथापि संबंधित पिकाखालील क्षेत्र त्यापेक्षा कमी असल्यास मात्र स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांची विहीत मार्गाने लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे.

पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीकडे स्वतःच्या शेतात भात पिकासाठी किमान 20 आर व इतर पिकासाठी 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पीकनिहाय (प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र) रक्कम 300 रुपये राहील. तालुकास्तरावर स्पर्धा आयोजनासाठी सर्वसाधारण गटासाठी किमान 10 व आदिवासी गटासाठी किमान पाच अर्ज असणे आवश्यक आहे. त्यापेक्षा प्रवेश अर्ज कमी आल्यास पिकस्पर्धा रद्द करून प्रवेश शुल्क परत देण्यात येईल.

ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस पिकाच्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 31 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्या दिवशी शासकीय सुट्टी असल्‍यास त्‍यापुढील तारीख गृहीत धरण्‍यात येईल. जिल्हास्तरावरील विजेत्याला अनुक्रमे पहिले दहा, दुसरे सात आणि तिसरे पाच हजाराचे बक्षिस देण्यात येणार आहे. तर तालुकास्तरावर पहिले पाच, दुसरे तीन आणि तिसरे बक्षिस दोन हजार रुपयांचे मिळणार आहे. या पद्धतीने पिकस्पर्धा घ्यावयाचे हे प्रथम वर्ष असल्याने प्रथम फक्त तालुकास्तरीय व जिल्‍हास्‍तरीय पीकस्पर्धा घेणार आहे. मागील वर्षाच्‍या तालुकास्‍तरीय स्‍पर्धेतील पिकनिहाय पहिल्‍या तीन क्रमांकाच्‍या विजेत्‍या शेतक-यांनी जिल्‍हास्‍तरीय पिकस्‍पर्धेमध्‍ये सहभाग घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या