💥उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने गेल्या अडीच वर्षात विविध क्षेत्रात राज्याचा सत्यानाश केला...!


💥भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची परखड टिका : आता विकासपर्व सुरु💥

परभणी (दि.13 डिसेंबर) : उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने गेल्या अडीच वर्षात विविध क्षेत्रात राज्याचा अक्षरशः सत्यानाश केला, अशी टिका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परभणीत केली. शिंदे-फडणवीस सरकार त्या अडीच वर्षातील नुकसानीची भरपाई करेल, असा विश्‍वास करीत आता विकास पर्व सुरु झाले आहे, असे ते म्हणाले.

                      प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सोमवारी रात्री परभणी मुक्कामी दाखल झाल्यानंतर आज मंगळवार दि.13 डिसेंबर रोजी सकाळपासून संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीकोनातून बैठकांचे सत्र सुरु केले. तत्पूर्वी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी हितगुज करतेवेळी बावनकुळे यांनी आपला हा परभणी जिल्हा दौरा पूर्णतः संघटनात्मक कामासंदर्भातील आहे. या दौर्‍यातून आपण बुथ मजबुतीकरणाच्या दृष्टीकोनातून लक्ष केंद्रीत करणार आहोत. केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा लाभार्थ्यांना कितपत लाभ मिळतो आहे, या गोष्टीचाही कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करावा तसेच या योजनांचा सर्वसामान्यांमध्ये प्रचार व प्रसार करावा, या दृष्टीनेही हितगुज करणार आहोत. कार्यकर्त्यांनी प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजे. संवाद साधला पाहिजे. त्यातून फिडबॅक घेतले पाहिजेत. केंद्र व राज्य पुरस्कृत जवळपास 27 योजना आहेत. त्या योजनांच्या यशस्वी अंमलबजावनीच्या दृष्टीने नेमके काय काय झाले आहे, हे कार्यकर्त्यांनी तपासले पाहिजे. ‘धन्यवाद मोदीजी’ या उपक्रमाचा तोच प्रामुख्याने उद्देश आहे, असे ते म्हणाले.पक्षाद्वारे अ‍ॅपही लॉन्च करण्यात आले असून त्यातून पक्षाचे ध्येय-धोरणे, वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने भूमिका सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. नव्या पिढीला हा अ‍ॅप उपयोगी ठरतो आहे, असे ते म्हणाले.

                     आपण या संघटनात्मक बांधणी दौर्‍यानिमित्त त्रिसूत्री निश्‍चित केली असून त्यातून संवाद, प्रवास व प्रशासन यावर लक्ष केंद्रीत केले आहे, असे ते म्हणाले. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने विकासाचे पर्व सुरु केले आहे, असे स्पष्ट करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौर्‍यातून राज्यास भरघोस मदतीचे आश्‍वासन निश्‍चितच राज्याच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे. परभणी जिल्ह्याच्याही समस्या सोडवणूकीसंदर्भात निश्‍चितच विचार होतो आहे. कोअर कमिटीच्या माध्यमातून अभ्यास, चर्चा व दिशा देण्याचे काम सुरु आहे. जल जीवन मिशन, अमृत जल सारख्या महत्वाकांक्षी योजनेतून ग्रामीण भाग ‘सुजलाम् सफलाम्’ केला जाईल, असे ते म्हणाले.

                    दरम्यान, या पत्रकार परिषदेस भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

💥भांडवल करण्याऐवजी मूल्यमापनही करा :-

                     राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे साद-पडसाद उमटले आहेत. त्यांचे ते विधान अनावधानाने झाले आहे. परंतु, त्यातून राज्यपालांवर प्रखर टिका-टिप्पणी करण्याऐवजी राज्यपालांनी आपल्या कारकिर्दीत केलेल्या कामांचे मूल्यमापन सुध्दा केले पाहिजे, असे बावनकुळे यांनी म्हटले. अब्दुल सत्तर असो, चंद्रकांत दादा पाटील यांचीही वक्तव्ये अनावधानानेच झाली आहेत. परंतु, त्याचे एवढे भांडवल करु नये, घटनेप्रमाणे निषेध व्यक्त करणे ठिक परंतु, त्यातून हिंसक प्रतिक्रिया  किंवा गैरप्रकाराने निषेध नोंदविणे पूर्णतः चूकीचे आहे, असे बावनकुळे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या