💥परभणी जिल्हास्थानी होणार सायबर पोलिस स्टेशन कार्यान्वित.....!



💥जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर.यांनी दिली माहिती : 2 जानेवारीपासून प्रारंभ💥

परभणी (दि.31 डिसेंबर) : परभणी या जिल्हास्थानी सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर स्वतंत्र सायबर पोलिस स्टेशन 2 जानेवारीपासून कार्यान्वित होणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर.यांनी दिली.

          जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अधिक्षक श्रीमती रागसुधा आर. यांनी सायबर सेलने गेल्यावर्षभरात हरवलेल्या मोबाईलपैकी हस्तगत केलेल्या व मूळ मालकांना परत केलेल्या मोबाईल संदर्भात तपशीलवार माहिती दिली. त्या पाठोपाठ शहरासह जिल्ह्यातील सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या गृह विभागाच्या सूचनेप्रमाणे स्वतंत्र असे सायबर पोलिस स्टेशन 2 जानेवारीपासून कार्यान्वित करीत आहोत, असे त्या म्हणाल्या.

          जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या परिसरातच हे सायबर पोलिस स्टेशन कार्यान्वित होणार असून त्यात एपीआय दर्जाचा एक अधिकारी व नऊ कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे त्या म्हणाल्या. विविध पोलिस ठाण्यांमधून सायबर गुन्हेगारीसंदर्भात तक्रारी नोंदविल्या जाणार आहेत, परंतु त्या तक्रारी या स्वतंत्र पोलिस ठाण्याकडे वर्ग केल्या जातील व साबर पोलिस स्टेशनच या सर्व गुन्ह्यांचे तपास स्वतंत्रपणे करतील, असेही नमूद केले.

राज्यात यापूर्वी अठरा ठिकाणी सायबर पोलिस स्टेशन कार्यान्वित आहेत. परभणी जिल्ह्यातील हे पहिले व राज्यातले हे एकोनविसाचे असे स्वतंत्र सायबर पोलिस स्टेशन असणार आहे. सर्वसामान्य नागरीकांनी व्हॉट्सअप, एसएमएस, इंटरनेट वगैरेच्या माध्यमातून फसवणूकी संदर्भातील सर्व तक्रारी या सायबर पोलिस स्टेशनमध्ये नोंदवाव्यात, असे आवाहनही श्रीमती रागसुधा आर यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या