💥महाराष्ट्र विधानसभेत मातृत्व प्रेमाचा साक्षात्कार : शेवटी 'आई' ती 'आईच' आहे...!

 


💥आमदार सरोज अहिरे अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन विधीमंडाच्या हिवाळी अधिवेशनात💥

✍️ मोहन चौकेकर

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी महाराष्ट्र कर्नाटक सीमवादाचा प्रश्न अधिवेशनात गाजला.पण त्याचबरोबर आज आणखी  एका महिला आमदार यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन अधिवेशनाला हजेरी लावली.

* आई सोबत आमदार पण आहे म्हणून अधिवेशनाला आले :-

मी आई आहे, सोबतच आमदारही आहे, महिलांचे काही प्रश्न आहेत ते मांडण्याची संधी असते, मी आमदार आहे पण त्याचबरोबर मी एक आईसुद्धा आहे, आणि ही दोन्ही कर्तव्य महत्वाची आहेत, त्यामुळे मी माझ्या अडीच महिन्यांच्या बाळाला इथे घेऊन आले असल्याचं आमदार सरोज अहिरे यांनी सांगितलं. बाळ अगदीच लहान आहे, माझ्याशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे बाळाला घेऊन यावं लागलं असं आमदार सरोज अहिरे यांनी सांगितलं. मतदारसंघाचे अनेक महत्वाचे प्रश्न आहे ते विधानसभेत उचलणे आवश्यक असल्याचं सरोज अहिरे यांनी म्हटलं आहे.

* पती आणि बाळासह अधिवेशनात :-

आमदार सरोज अहिरे यांच्या मुलाचं नाव प्रशंसक प्रवीण वाघ असं आहे, 30 सप्टेंबरला त्याचा जन्म झाला. आजपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनात त्या प्रशंसक आणि पती प्रवीण वाघ यांच्यासह नागपूरात आल्या. मुलाला समृद्धी महामार्गावर घेऊन येताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं, महामार्गावर कुठेही एखादं शौचालय नाही, त्याच पद्धतीने ना कुठे पाण्याची सोय न खाण्याची त्यामुळे हे प्रश्न उपस्थित करणार असल्याचं आमदार सरोज अहिरे यांनी म्हटलं.

* धनंजय मुंडे यांनी केलं ट्विट :-

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी याबाबत ट्विट केलं आहे. देवळालीच्या आमदार सरोज अहिरे ताईं आज आपल्या अडीच महिन्यांच्या प्रशंसकला घेऊन विधिमंडळ अधिवेशनात सहभागी झाल्या आहेत. अवघ्या अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन कामकाजात सहभागी होऊन ताईंनी मतदारसंघाप्रति जबाबदारी आणि कर्तव्य परायणतेचे उत्कृष्ट उदाहरण प्रस्थापित केले आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

* कोण आहेत आमदार सरोज अहिरे :-

सरोज अहिरे या नाशिकमधल्या देवळाली मतदार संघाच्या आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्या विजयी झाल्या. राष्ट्रवादीच्या युवा आमदारांमध्ये सरोज अहिरे यांचं नाव घेतलं जातं, मतदारसंघात जनेतशी नाळ असलेल्या आमदार म्हणून त्या ओळखल्या जातात. आमदार सरोज अहिरे यांचे पती प्रविण वाघ नाशिकमधली प्रसिद्ध दंतरोग तज्ज्ञ आहेत. फेब्रुवारी 2021 मध्ये सरोज अहिरे आणि प्रवीण वाघ यांचं लग्न झालं.

* सीमाप्रश्नाचे अधिवेशनात पडसाद :-

दरम्यान, सीमावाद प्रश्नाचे पडसात अधिवेशनातही उमटले आहेत.बेळगाव मुद्यावर आज जशास तसं उत्तर देऊ म्हणणाऱ्यांची तोंड बंद का झाली, असा प्रश्न विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. सीमाभागाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय पोलीसांना द्यावी अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.खासदार धैर्यशील माने यांना प्रवेशबंदी करण्यात आल्याचा मुद्दाही अजित पवार यांनी उपस्थित केला. एका खासदाराला बंदी घालण्यात आली असून जिल्हाधिकारी बंदी कशी आणू शकतात? अशी दडपशाही योग्य नाही. सरकरने ठोस भूमिका घेतली पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या