💥परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सोनपेठ,पाथरी, मानवत येथील आरोग्य यंत्रणेचा घेतला आढावा...!


💥आज गंगाखेड,पालम येथील रुग्णालयांची करणार पाहणी💥 


परभणी (दि. 22 नोव्हेंबर) :- कोविड काळात जिल्ह्यात आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आरोग्य यंत्रणेची उभारणी करण्यात आली होती. कोविडअंतर्गंत जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेल्या वैद्यकीय संसाधने, यंत्रसामुग्री आणि आरोग्य सुविधांचा उपयोग व मनुष्यबळाचा वापर नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी होत आहे की नाही, याबाबतचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आज भेट देत यंत्रणेच्या प्रत्यक्ष वापराबाबत पाहणी केली. आज पहिल्या दिवशी सोनपेठ, पाथरी आणि मानवत येथील ग्रामीण रुग्णालयांची त्यांनी तपासणी केली. तसेच वैद्यकीय यंत्रणेकडून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधेचाही त्यांनी आढावा घेतला.  


उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, सोनपेठचे तहसीलदार सारंग चव्हाण, पाथरीच्या तहसीलदार श्रीमती प्रतिभा थेटे, सोनपेठचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भारत चव्हाण, पाथरीचे डॉ. सुमंत वाघ, मानवतचे डॉ. शिंदे, गटविकास अधिकारी मधुकर कदम आणि रुग्ण कल्याण समिती नियामक मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते. 


जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय साहित्य सामुग्री खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजना, आपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निधी प्रदान करण्यात आला होता. त्यानुसार उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात साहित्य सामुग्री खरेदी करून आरोग्य सुविधांची तपासणी जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन केली.   

या निधीतून उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक वैद्यकीय साहित्य सामुग्री खरेदी करून रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप यांना वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय व अस्थिव्यंग रुग्णालयासाठी खरेदी करण्यात आलेल्या वैद्यकीय साहित्यासह, मनुष्यबळ वापराबाबत त्यांनी प्रत्यक्ष तपासणी करुन आढावा घेतला.  


सोनपेठ ग्रामीण रुग्णालयात प्राणवायू निर्मिती प्लाँट, क्ष्ा -किरण यंत्र, फोटोथेरपी युनीट, रेडिओलॉजी विभाग यासह इतर यंत्रणांच्या वापरासाठी तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध नसल्यास स्थानिक कर्मचाऱ्यांकडून ते वापरात आणणे, तसेच टेलिमेडिसीनच्या माध्यमातून तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी वैद्यकीय यंत्रणेला दिल्या. येथील प्रसूती पश्चात कक्षाला भेट देत महिला रुग्णांशी कुटुंब नियोजनाबाबत संवाद साधून, येथील प्रयोगशाळा, लसीकरण विभाग, शस्त्रक्रिया विभाग, वैद्यकीय भांडार कक्षाची तपासणी केली. 

ग्रामीण रुग्णालयात प्रसूती विभागात आतापर्यंत दाखल करून घेतलेल्या महिला, प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविलेल्या महिला, येथे झालेली प्रसूती संख्या अद्ययावत असल्याबाबतची जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणी केली. जिल्हा रुग्णालयाकडे प्रसूतीसाठी महिलांना न पाठवता; ग्रामीण रुग्णालयातच त्यांची प्रसूती करावी. तसेच  रुग्णालयात येणा-या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी पुरेशा प्रमाणात बसण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आदेशही त्यांनी यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जगताप यांना दिले.  

येथील रुग्णालयात उपस्थित रुग्ण तसेच नातेवाईकांशी संवाद साधत श्रीमती गोयल यांनी आरोग्यविषयक असलेल्या समस्या, तक्रारी नोंदविण्याचे आवाहन केले.  रुग्णालयात प्रत्यक्ष उपलब्ध असलेले मनुष्यबळ आणि रिक्त पदांचा आढावा घेत चालकाअभावी बंद असलेल्या रुग्णवाहिकांसाठी चालकांची व्यवस्था करून त्या पूर्ववत रुग्णांच्या सेवेत दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गंत अंगणवाडीतील बालकांची वर्षातून दोन वेळेस तर शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांची तपासणी वर्षातून एकदा केली जाते, त्याबाबतचा त्यांनी आढावा घेतला. 

पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयातून जिल्हा रुग्णालय येथे प्रसूतीसाठी पाठविण्यात आलेल्या प्रकरणांचे ऑडिट करण्याचे आदेश श्रीमती गोयल यांनी यावेळी दिले. येथील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेताना श्रीमती गोयल यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करून ऑक्सिजन निर्मिती प्लाँट पुन्हा सुरु करून तो वापरात आणावा तसेच क्ष-किरण यंत्रणा, तात्काळ सुरू करावी आणि टेलिमेडिसीनच्या माध्यमातून तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याचे आदेश दिले. येथील डेडस्टॉक, प्रयोगशाळा, प्रसूती कक्षाला भेट दिली. नवजात बालकांसाठी आवश्यक असलेली फोटोथेरपी युनीट, बेड, फ्रीज आदी यंत्रसामुग्री पडून आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी गोयल यांनी वैद्यकीय अधीक्षकाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली. येथील विस्तारित कक्षाचे बांधकाम डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे आदेश देताना जानेवारीमध्ये या इमारतीमध्ये सर्व यंत्रसामुग्री संच बसवून ते कार्यान्वित करण्याचे आदेश दिले. तसेच या यंत्रसामुग्रीची तपासणी करण्यासाठी पुन्हा जानेवारीमध्ये भेट देणार असल्याचे सांगितले. पाथरी ग्रामीण रुग्णालयात कुटुंब नियोजनाबाबत केलेल्या कार्यवाहीबाबतचा आढावा घेत येथील अधिकारी -कर्मचा-यांची काम करण्याची मानसिकता बदलण्याबाबत कानउघाडणी केली.  

मानवत येथील क्षेत्रीय रुग्णालयासाठी 20 खाटांची नूतन इमारत मंजूर झाली असून लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश दिले तसेच सध्या उपलब्ध असलेल्या इमारतीमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या. येथील रुग्णालयाची इमारत जुनी असूनही उपलब्ध संसाधन व वैद्यकीय यंत्रसामुग्रीचा योग्य वापर केला जात असल्याने श्रीमती गोयल यांनी समाधान व्यक्त केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या