💥पुर्णा-ताडकळस ते पालम या राज्य रस्त्यालगत लागून असलेल्या माहेरवासियांंचे रस्त्याअभावी प्रचंड हाल...!


💥चिखल तुडवत गाठावे लागते गाव,गावकरी अजूनही रस्त्याच्या प्रतिक्षेत💥

पूर्णा-ताडकळस ते पालम या राज्य रस्त्यालगत लागून असलेल्या माहेर गावाकडे जाण्यासाठी अजूनही चांगला रस्ता करुन देण्यासाठी शासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधी यांना यश आलेले नाही. त्यामुळे गावाला जाण्यासाठी ’ गावकरी आणखीही रस्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. पण  प्रशासकीय यंत्रणा याकडे लक्ष द्यायला तयार नाही. याहीवर्षी गावकर्‍यांना चिखल तुडवत गाव गाठावे लागणार आहे.

पूर्णा तालुक्यातील माहेर हे जेमतेम 600 लोकसंख्या असलेले गाव. गावातील मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यामुळे वर्षभर शेतमाल खरेदी विक्री करणे, रासायनिक खते, बियाणे याची वाहतूक करावी लागते. पण पावसाळा सुरू होताच ग्रामस्थांच्या कसरती सुरू होतात. राज्य रस्त्यावर पासून 3 किमी अंतरावर कच्चा रस्ता असल्याने पाऊस पडताच चिखल तयार होतो. यामुळे वाहतूक आपोआप बंद पडते. ग्रामस्थांना बाजारात येण्यासाठी 3 किमी अंतर पायी चालत पार करावे लागते. गावाला पर्यायी रस्ता नसल्याने हाच रस्ता वापरावा लागतो. तब्बल चार महिने मरणयातना भोगाव्या लागतात.

गावातील गरोदर मातांची, रुग्णांची, शाळकरी मुलांची समस्या संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. आजही ग्रामस्थांना रस्त्याची प्रतीक्षा कायम आहे या रस्त्यावरील गावातील गरोदर महिलांचे, रुग्णांचे, शाळकरी मुलांचे अतोनात हाल होत आहेत. परंतु स्वातंत्र्यापासून या गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने आजही येथील रुग्ण गरोदर माता, लहान शाळकरी मुले आणि नागरिकांना चिखल तुडवतच पायी प्रवास करून मुख्य रस्त्यापर्यंत यावे लागते.

काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी माहेर या गावात मुक्काम ठोकून रस्ता करण्याचे आश्वासन दिले. पण काही दिवसातच ग्रामस्थांची ही आशा फोल ठरली आहे. पाऊस पडताच पुन्हा चिखल तुडवत गाव गाठावे लागणार आहे. आश्वासनांंचा पूर ओसरला असून माहेरकराची रस्त्याची समस्या कायम राहिली आहे. रस्ता मागून ग्रामस्थांचे घसे आता कोरडे पडायला लागले आहेत.  निवडणुकीला मतदानाच्या वेळी लोकप्रतिनिधी मोठमोठी आश्वासने देतात व उपोषणाला बसले तर शासकीय अधिकारी हवेत उडण्यासारखी आश्वासने देत  आहे.  मात्र पावसाळ्याच्या तोंडावर तरी  माहेरवासियांचे हाल पाहून प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना जाग येईल का?

सीईओनी  माहेरवासियांना सोबत  भेट घेऊन बैठक घेतली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सर्व समस्या जाणून घेऊन आता एका वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. गावकर्‍यांना वाटले की, आतातरी रस्त्याचा प्रश्न मिटेल. या भावनेत गावकरी राहिले पण आता ऐन पावसाळ्यांच्या तोंडावर रस्त्याअभावी अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. गावकर्‍यांना चिखल तुडवत यातना भोगाव्या लागत आहेत. अशा परिस्थितीत माहेरवासियांना रस्त्याअभावी सुख कधी मिळणार हे पाहणे महत्वाचे आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या