💥परभणी-झिरोफाटा रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा ; रखडलेल्या अर्धवट कामामुळे अपघातांच्या मालिका सुरूच...!


💥कासवगतीने निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी💥

परभणी (दि.०५ जानेवारी) - परभणी-झिरो फाटा रस्त्याच्या रडखडलेल्या कामांमुळे सातत्याने अपघातांची मालिका घडत असून अपघाताच्या मालिकांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लगत असल्यामुळे संबंधित कंत्राटदाराला जवाबदार धरून त्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात  यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक जयंत मिना व ताडकळस पोलिस प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 


महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की परभणी जिल्ह्यातील झिरोफाटा ते  परभणी रस्त्याची चाळणी झाली आहे, रस्त्यावर एक ते दीड फूट खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात आजपर्यंत अनेक अपघात झालेले आहेत. १ फेब्रुवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास एका निष्पाप माय लेकराचा बळी ह्या रस्त्याच्या खड्ड्यांनी घेतला. पूर्णा तालुक्यातील बरबडी येथे येथील मुंजाजी शिंदे यांची पत्नी पद्मिनी शिंदे आणि आठ महिन्याचा मुलगा वैभव शिंदे हे तिघेजण ऑटो ने बरबडी येथून त्रिधार क्षेत्र येथे देव दर्शनासाठी येत होते. रहाटी जवळील खड्ड्यात ऑटो पलटी झाला. ह्यामध्ये पद्मिनी शिंदे आणि वैभव शिंदे या मायलेकरांचा मृत्यू झाला आणि मुंजाजी शिंदे हे गंभीर जखमी झाले. सदरील रस्त्यावर गुत्तेदाराने खड्डे तसेच ठेवल्यामुळे ह्या दोन निष्पाप माय लेकरांचा जीव गेला असून संबंधित कंत्राटदार आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा नाहक बळी गेला आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार आणि प्रशासनातले अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली.  यांची दखल न घेतल्यास  मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल  असा इशाराही देण्यात आला आहे,


या निवेदनावर जिल्हाध्यक्ष रूपेश देशमुख , शहराध्यक्ष सचिन पाटील पुर्णा तालुकाध्यक्ष अनिल , मनविसे जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक, वाहतूकसेना, जिल्हाध्यक्ष  शेख शरीफ, मनविसे परभणी शहर उपाध्यक्ष श्रीकांत पाटील आदींच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या