💥गरीमा रियल इस्टेट व गरीमा होम्स अँण्ड फार्म हाऊसेस कंपनीकडून फसवणूक.....!



💥आजपावेतो 4269 ठेवीदारांची 8 कोटी 60 लक्ष रूपयांनी फसवणूक💥

💥या कंपनीच्या नावाने फसवणूक झाली असल्यास नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधावा💥

✍🏻विशेष रिपोर्टींग ; जमील पठाण 

बुलडाणा, (दि.२१ जानेवारी ) : गरीमा रियल इस्टेट अँण्ड अलाईड मिलीटेड व गरीमा होम्स अँण्ड फार्म हाऊसेस लिमीटेड कंपनीने स्वत:चे कार्यालय डिएसडी आसमंत बिल्डींग, चिखली रोड, बुलडाणा येथे उघडले. कंपनीने गुंतवणूकदारांना आश्वासनाप्रमाणे केलेल्या गुंतवणूकीचा परतावा न देता कंपनीचे कार्यालय बंद केले. याबाबत अरूण लक्ष्मण फोलाणे (वय 43) रा. रायपूर यांनी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. फिर्यादीनुसार बनवारीलाल माधवसिंह कुशवाह रा. जमालपूर, शिवराम माधवसिंह कुशवाह, बालकिसन माधवसिंह कुशवाह व जितेंद्रकुमार पुरासिंह रा. राजस्थान यांनी या कंपनीचे कार्यालय उघडून कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वारंवार आमिष दाखविले. कंपनीने फिर्यादीकडून 11 लक्ष 30 हजार 982 रूपयांची गुंतवणूक करवून घेतली. मात्र आश्वासनाप्रमाणे परतावा न देता कार्यालय बंद करून त्यांची व सहकार्यांची आर्थिक फसवणूक केली. या रिपोर्टवरून बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला कलम 420, 406 व 34 भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आजपावेतो झाालेल्या तपासावरून व उपलब्ध कागदपत्रांवरून गरीमा रियल इस्टेट अँण्ड अलाईड मिलीटेड व गरीमा होम्स अँण्ड फार्म हाऊसेस लिमीटेड, साथी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी या कंपन्यांनी एकूण 4269 ठेवीदारांची 8 कोटी 60 लक्ष 87 हजार 433 रूपयांचा अपहार करून फसवणूक  केली.

    या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे व पेालीस उपअधिक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत करीत आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी कंपनीचे संचालक बालकिसन माधवसिंह कुशवाह वय 32 रा. जमालपूर जि. धौलपूर राजस्थान यास 18 जानेवारी 2022 रोजी अटक केली आहे. याप्रकरणी मा. न्यायालयातून 21 जानेवारी 2022 पावेतो पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला असून पुढील तपास पो. उप दिगंबर अंभोरे, पोहेकॉ सरदार बेग, अविनाश जाधव, संजय कोल्हे, रामेश्वर मुंढे, राजेंद्र मोरे, संजय शेळके, पोका दिपक जाधव, एजाज खान, जितेंद्र झाडोकार, मपोका किरण भुजबळ, विद्या आराख करीत आहे. 

   गरीमा रियल इस्टेट अँण्ड अलाईड मिलीटेड, गरीमा होम्स अँण्ड फार्म हाऊसेस लिमीटेड व साथी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीच्या नावाने अशाप्रकारचे आमिष दाखवून कुणाची आर्थिक फसवणूक झालेली असल्यास अशा व्यक्तींनी त्यांचेकडे उपलब्ध असलेल्या या कंपन्यांच्या कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, बुलडाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक दिगंबर अंभोरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या