💥परभणीचे माजी आमदार तथा भाजप नेते विजय गव्हाणे करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश...!


💥मुंबईत गुरुवारी होणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश सोहळा💥 

परभणी(दि.११ जानेवारी) : जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अ‍ॅड. विजय गव्हाणे हे गुरुवार दि.१३ जानेवारी २०२२ रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,समाजकल्याण मंत्री धनंजय मुंढे,जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत गुरुवार दि.१३ जानेवारी रोजी दुपारी १२-३० वाजता अ‍ॅड.विजय गव्हाणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात हा पक्ष प्रवेशाचा सोहळा होणार आहे. यावेळी खासदार श्रीमती फौजिया खान,आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे अन्य आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी व नेते उपस्थित राहणार आहेत. या पक्ष प्रवेशाच्या सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर अ‍ॅड. गव्हाणे यांनी गेल्या दोन दिवसात ज्येष्ठ नेते पवार, उपमुख्यमंत्री पवार व प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या गाठीभेटी घेतल्या. बैठकांमधून हितगूज केले. ज्येष्ठ नेते पवार यांच्यासह सहकार्‍यांनी केलेल्या आवाहनानंतर अ‍ॅड. गव्हाणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतला....

       दरम्यान, ज्येष्ठ नेते कै. गोपीनाथराव मुंढे व ज्येष्ठ नेते कै. प्रमोद महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत गेल्या 20 वर्षांपूर्वी अ‍ॅड. गव्हाणे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. परंतु, या दोघांच्या पश्‍चात आपली या पक्षात सतत अवहेलना झाली, अशी तीव्र खंत अ‍ॅड. गव्हाणे यांनी दैनिक दिलासाशी बोलतांना व्यक्त केली. भाजपाच्या पक्ष श्रेष्ठींबरोबर आपण याविषयी बोललो, संयम राखला, परंतु संयमाससुध्दा मर्यादा असते, असे अ‍ॅड. गव्हाणे यांनी नमूद केले. भाजपात आपण प्रामाणिकपणेच काम केले. परंतु, पक्षास प्रामाणिक नेते व कार्यकर्त्यांची,निष्ठावानांची किंमत नाही, असे शल्य व्यक्त करीत अ‍ॅड. गव्हाणे यांनी परभणी जिल्ह्यात भाजप बोर्डीकर-वरपूडकरमय झाला असल्याचा आरोप केला. या स्थितीत स्थानिक पातळीवरसुध्दा आपल्यासह समर्थकांना या भ्रष्ट  मंडळींबरोबर काम करणं अशक्य आहे, असेही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या