💥आधुनिकीकरण म्हणजे पाश्चात्यांचे अनुकरण करणे नव्हे - डॉ. भाऊसाहेब काळे


💥वाशिम येथील गोटे महाविद्यालयात 'तत्त्व-प्रकाश व्याख्यानमालेचे' चौथे पुष्प संपन्न💥

वाशिम ; येथे दिनांक.15 जानेवारी 2022, स्थानिक मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभागाद्वारे, तत्त्वज्ञान विषयाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित 'तत्त्व-प्रकाश' व्याख्यानमालेचे चौथे पुष्प बार्शी येथील श्रीमान झाडबुके महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. भाऊसाहेब काळे यांनी गुंफले. 

मानवी जीवनात तत्त्वज्ञान हे एक महत्वाचा विषय आहे तेव्हा अशा या महत्त्वपूर्ण विषयाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय येथील तत्वज्ञान विभागाद्वारे ही 'तत्व-प्रकाश' व्याख्यानमाला सुरू करण्यात आली आहे. या व्याख्यानमाले अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या पंधरा (15) तारखेला रात्री 08 वाजता एक व्याख्यान आयोजित केले जाते. दिनांक 15 जानेवारी 2022 या रोजी व्याख्यानमालेचे चौथे पुष्प बार्शी येथील श्रीमान झाडबुके महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. भाऊसाहेब काळे यांनी गुंफले डॉ.काळे यांनी 1984 या वर्षी पुणे विद्यापीठातून डॉ. एस. सुंदरराजन यांच्या मार्गदर्शनात Some perspective on Modernization : a critical study या विषयावर संशोधन केले. सदर संशोधन विषयाला अनुसरुन 15 जानेवारी या दिवशी त्यांनी 'आधुनिकीकरण : एक समीक्षा'' या विषयावर आपले व्याख्यान दिले. 

डॉ. काळे यांनी आपल्या व्याख्यानातून, हुकूमशाही व्यवस्था, साम्यवादी व्यवस्था आणि भांडवलशाही व्यवस्था इत्यादीवर प्रकाश टाकत नव मार्क्सवाद कसा उदयाला आला हे सांगितले. नव मार्क्सवाद हा म्हणावा तसा प्रभावी ठरला नाही. मात्र त्यामुळे साम्यवाद आणि भांडवलशाही व्यवस्थेचा प्रभाव कमी होऊन त्यात समतोल राखता येईल असे एक वातावरण निर्माण झाले होते. समाजाच्या विकासासाठी स्वातंत्र्य आवश्यक असते. परंतु स्वातंत्र्य हे भयमुक्त असले पाहिजे. अर्थात आधुनिकीकरणाच्या प्रवाहात हुकूमशाही हा पर्याय म्हणून टिकू शकला नाही, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

आधुनिकीकरणाच्या प्रवासात वैज्ञानिक आणि तार्किक विचारसरणी प्रभावी ठरत गेली. त्यातूनच धर्म चिकित्सा होऊन औद्योगिक क्रांती झाली. परंतु यात मूल्याधिष्ठित व्यवस्थेकडे समाजाचे दुर्लक्ष होत गेले. तेव्हा पाश्चात्त्य देशात उदयाला आलेल्या अशा या विविध विचारप्रवाहांची समीक्षा झाली पाहिजे असा भाव व्यक्त करीत त्यांनी पाश्चात्यांचे अनुकरण करणे म्हणजे आधुनिकीकरण नव्हे हे ठामपणे सांगितले. सामान्यतः आधुनिकीकरणाच्या या प्रवासात वैज्ञानिक आणि यांत्रिक प्रगतीला महत्त्व दिले गेले. परंतु आत्मिक व मानसिक प्रगती सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे आणि त्यासाठी अध्यात्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मूल्यांचा विचारसुद्धा होणे आवश्यक आहे. भारतीय धर्म परंपरेत अनेक चांगले विचार आहेत त्यांना नवीन रूप देऊन, त्यांचा नवीन अर्थ सांगून विज्ञान आणि अध्यात्मामध्ये समतोल राखून शाश्वत प्रगती करण्याचे कार्य या आधुनिकीकरणाच्या प्रवासात करता येऊ शकते याकडेही डॉ. भाऊसाहेब काळे यांनी श्रोत्यांचे लक्ष वेधले.

व्याख्यानाच्या प्रारंभी व्याख्यानमालेचे आयोजक तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. वेदप्रकाश डोणगावकर यांनी वक्त्यांचा परिचय करुन देत व्याख्यानमालेचा उद्देश स्पष्ट केला. आणि व्याख्यानानंतर व्याख्यात्यांचे व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या विविध विद्यापीठातील प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि तत्त्वज्ञान प्रेमी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या