💥27 फेब्रुवारीला पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ; लसीकरण मोहिमेची तयारी पुर्ण....!


💥१ लाख २१ हजार २६८ बालकांना  पाजणार पोलिओ डोस💥

✍🏻फुलचंद भगत

वाशिम (दि.२५ जानेवारी) :- राज्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम १९९५ पासून राबविण्यात येत आहे.  सन २०२२ या वर्षात २७ फेब्रुवारी २०२२  रोजी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ० ते ५ वर्ष वयोगटातील अपेक्षित लाभार्थी बालकांची संख्या ग्रामीण भागात ८६,०६४ आणि नागरी भागात ३५,२०४ अशी एकूण १ लाख २१ हजार २६८ आहे.त्यासाठी ग्रामीण भागात ८३१ आणि नागरी भागात १३० असे एकूण ९६१ पल्स पोलिओ लसीकरण बूथ राहणार आहे. बुथवर काम करण्यासाठी ग्रामीण भागात २१५९ आणि नागरी भागात ३८२ असे एकूण २५४१ मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे.ही मोहीम प्रभावीपणे ग्रामीण भागात राबविण्यासाठी १६८ व शहरी भागासाठी २६ असे एकूण १९४ पर्यवेक्षक नियुक्त केले आहे. 

            २७ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजतापासून या मोहिमेला सुरुवात होईल. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५ वर्षाखालील सर्व बालकांना लस पाजण्याचे काम करण्यात येईल.  वीटभट्टया,गिट्टी खदान व एकदा मजुरांच्या वस्त्यांमधील लाभार्थी संरक्षित करण्यासाठी ग्रामीण भागात २४ आणि नागरी भागात एकूण ३२ मोबाईल टीमची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय प्रवासातील लाभार्थ्यांना संरक्षित करण्यासाठी रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड,बस थांबे, चौफुलीच्या ठिकाणी ट्रान्झिट टीमद्वारे ग्रामीण भागात ८६ आणि नागरी भागात ३४ असे एकूण १२० ट्रान्झिट टीम दोन पाळीमध्ये कार्यरत राहणार आहे. पुढील तीन दिवस ग्रामीण भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून बूथवर न आलेले व परगावी गेलेल्या लाभार्थ्यांचा शोध घेऊन पोलिओ लसीचा डोस पाजण्यात येणार आहे. ग्रामीण भागासाठी ३ दिवसासाठी १६०१ आणि शहरी भागासाठी पाच दिवसांसाठी ८१ असे एकूण १६८२ चमू कार्यरत राहणार आहे.

       पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे. ही मोहीम १०० टक्के यशस्वी करण्यासाठी इतर विभागांचा व जनतेचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील सहा खातेप्रमुख नियुक्त करण्यात आले असून गट विकास अधिकारी , पंचायत समिती यांना प्रत्येक गावासाठी एक कर्मचारी नियुक्त करून मोहीम १०० टक्के यशस्वी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी आदेश दिले आहे.

               २७ फेब्रुवारी २०२२ रोजी राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला जनआंदोलनाचे स्वरूप देऊन ही मोहीम १०० टक्के यशस्वी करावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या