💥नांदेड गुरूद्वारा बोर्ड कायद्यातील कलम 11 चे भाजप शासनाने केलेले संशोधन तात्काळ रद्द करा....!


💥राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सरदार मनबीरसिंघ ग्रंथी यांची मागणी💥

नांदेड (दि.10 जानेवारी) - गुरूद्वारा बोर्ड कायदा 1956 मधील कलम 11 चे भाजप शासनाने केलेले संशोधन रद्द करावे, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य स. मनबीरसिंघ ब्रिजपालसिंघ ग्रंथी यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठविले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, 2015 मध्ये भाजप प्रणित महाराष्ट्र शासनाने नांदेड गुरूद्वारा बोर्ड कायदा 1956 च्या कलम 11 मध्ये संशोधन करून अध्यक्षांची थेट निवड करण्याचे अधिकार शासनाने स्वतःकडे ठेवले आहेत, हे नांदेड येथील शीख समाजावर अन्याय करणारे आहे या कायद्यामध्ये आ. स.तारासिंघ आणि स. भुपेंद्रसिंघ मनहास या दोन्ही मुंबई येथील सदस्यांची भाजपा शासनाने अध्यक्ष म्हणून सचखंड गुरूद्वारा बोर्डवर निवड केली आहे. त्यामुळे स्थानिक शीख समाजावर अन्याय होत असून शासनाने कलम 11 चे संशोधन त्वरित रद्द करावे. नांदेड गुरूद्वारा बोर्ड निवडणुकीचा खर्च हा नांदेड गुरूद्वारा बोर्डाच्या वतीने करण्यात येतो. त्यामुळे बोर्डाचा कार्यकाळ हा विधानसभा व लोकसभा याप्रमाणे 3 वर्षांवरून 5 वर्षे करण्यात यावा. नांदेड गुरूद्वारा बोर्डाच्या 3 सदस्यांची निवडणूक ही संपूर्ण मराठवाडा, विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात ही निवडणूक होत असते. जवळपास 600 कि.मी. लांबीचा बोर्डाचा हा मतदारसंघ आहे. 


या गुरूद्वारा बोर्डाच्या मतदारसंघातून 9 खासदार निवडून येतात. म्हणून महाराष्ट्र शासनाने नांदेड गुरूद्वारा बोर्डाच्या 3 सदस्यांऐवजी 11 सदस्यांची निवडणूक नांदेड जिल्ह्यातील शीख मतदारांतून घेण्यात यावी. वरील सर्व सुचवलेले बदल शासनाने करावेत. नांदेड गुरूद्वारा बोर्डाचा कार्यकाळ येत्या 7 मार्च रोजी संपत असून तोपर्यंत महाराष्ट्र शासनाने महाविकास आघाडीतील  नांदेड येथील शीख समाजातून सदस्यांची गुरूद्वारा बोर्ड समिती स्थापन करावी व नवीन गुरूद्वारा बोर्ड अस्तित्वात येईपर्यंत या समितीच्या माध्यमातून गुरूद्वारा बोर्डाचा कारभार चालवण्यात यावा, असेही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य स. मनबीरसिंघ ग्रंथी यांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रति राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, खा. सुप्रियाताई सुळे, प्रधान सचिव, मंत्रालय मुंबई यांना पाठविल्या आहेत....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या