💥परभणी पॅटर्न ; कसला पक्षभेद,कसले मतभेद ; जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना महाआघाडी नेत्यांतील मतभेद संपुष्टात....!


💥स्नेहभोजनाचे औचित्य साधून आ.सुरेश वरपुडकर आ.बाबाजानी दुर्राणी खा.संजय जाधव यांची गुफ्तगू💥

परभणी (दि.०३ डिसेंबर) :  सत्तारुढ महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या सत्ताधारी महाविकास आघाडीच्या परभणी जिल्ह्यातील नेत्यांतील मतभेद हळुवारपणे संपुष्टात आल्याचे निदर्शनास येत असून एकमेकांच्या विरोधात असलेले जिल्ह्यातील जेष्ठ काँग्रेस नेते तथा माजी राज्यमंत्री आ.सुरेशराव वरपूडकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ.बाबाजानी दुर्रानी व  शिवसेनेचे खासदार संजय जाधव या तिघा नेतेमंडळींनी आज शुक्रवार दि.०३ डिसेंबर २०२१ रोजी दुपारच्या सुमारास स्नेहभोजनाचे औचित्य साधून तब्बल ३ तास गुफ्तगू केली.

      आमदार दुर्राणी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. समर्थकांनीही पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पाठोपाठ दुर्राणी व त्यांचे समर्थक काँग्रेसच्या संपर्कात आले व समर्थकांनी काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेतला. या पार्श्‍वभूमीवर दुर्राणी हे मुंबईतील गाठी-भेटी आटोपून पाथरीत परतले. शुक्रवारी दुपारी ते खासदार संजय जाधव यांच्या निवासस्थानी स्नेहभोजना निमित्ताने दाखल झाले. त्यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर हेही पाठोपाठ दाखल झाले. या तीघांनी स्नेहभोजनाचा आनंद लुटल्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत खासदारांच्या निवासस्थानी गुफ्तगू केले. या त्रिकुटांच्या बैठकीतील नेमका विषय व चर्चा कळाली नाही. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवरच या त्रिकुटांनी चर्चा केली असल्याची माहिती हाती आली आहे.

      दरम्यान, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात रान उठविण्याबाबतही चर्चा झाली असल्याचे कळले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या