💥संत भगवान बाबांची भक्ती अन् मुंडे साहेबांची शक्ती हाच तुमच्या-माझ्यातील प्रेमाचा धागा - पंकजाताई मुंडे


💥वंचितांच्या सेवेसाठी माझं जीवन समर्पित ; तुमच्या प्रेमाची उतराई कधीही होणार नाही💥


💥जिंतूर तालुक्यात धमधम येथे संत भगवानबाबा  मुर्तीची थाटात प्राणप्रतिष्ठा ; भाविकांची मोठी गर्दी

परभणी (दि.२७ डिसेंबर) - राष्ट्रसंत भगवान बाबा यांची भक्ती आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची शक्ती हाच तुमच्या-माझ्यातील प्रेमाचा धागा आहे. हा धागा जिवंत ठेवण्यासाठीच मी काम करत आहे. वंचितांच्या सेवेसाठी माझं जीवन समर्पित आहे, मुंडे साहेबांच्या पश्चात तुम्ही दिलेले प्रेम एवढे आहे की त्या प्रेमाची उतराई कधीही होणार नाही अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज येथे आपल्या भावना व्यक्त केल्या. जिंतूर तालुक्यातील धमधम येथे ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रसंत भगवान बाबा आणि विठ्ठल रुक्मिणी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रम आज पंकजाताईंच्या प्रमुख उपस्थितीत आणि हजारो भाविक भक्तांच्या साक्षीने मोठया थाटात संपन्न झाला,त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आ. मेघना बोर्डीकर, माजी आमदार तोताराम कायंदे, प्रवीण घुगे, सुदाम महाराज पानेगावकर, लक्ष्मण बुधवंत, धमधमचे सरपंच डाॅ  वाल्मिक टाकरस आदी यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या की, मंदिराच्या कलशारोहणाचा मान माहेरवासिनीचा असतो, मी परळीची लेक असली तरी हा सन्मान तुम्ही मला दिला. माझे भव्य स्वागत केले, गुढया उभारल्या, रांगोळी काढली..एवढे प्रेम, एवढी पुण्याई ही मुंडे साहेबांची शक्ती आहे, त्यांनी आयुष्यभर वंचितांची सेवा केली, तेच व्रत मी पुढे सुरू ठेवले आहे. भगवान बाबांची शिकवण व मुंडे साहेबांच्या संस्कारामुळे सत्ता असतांना मी गावोगांवी विकास निधी देऊ शकले, लोकांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.  वंचितांसाठी  माझं संपूर्ण आयुष्य समर्पित आहे. मी भगवान बाबांच्या आशीर्वादाने राजकारणात आले. खूप संघर्ष केला, पण साहेबांच्या अचानक जाण्याने आभाळ कोसळले,त्यांच्या नसण्याचे दुःख पचवले.तुमचं प्रेम आणि आशीर्वाद यातच मला मुंडे साहेब दिसतात. या प्रेमाची उतराई कधीही होणार नाही.  मी रडणार नाही, लढणारयं अशी शपथ घेतलीयं. मुंडे साहेबांप्रमाणे मी रूकणार, थकणार नाही, त्यांचे नांव जगाला विसरू देणार नाही. वंचितांची सेवा करण्याचं घेतलेलं व्रत सोडणार नाही असं पंकजाताई म्हणाल्या.

ग्रामस्थांनी केले जोरदार स्वागत ;-

धमधम गावांत पंकजाताईंचे हेलिकॉप्टरने आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांनी वाजत-गाजत पुष्पवृष्टी करत त्यांचे जोरदार स्वागत केले. जागोजागी सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. मंदिरात जाऊन त्यांनी संत भगवान बाबा व विठ्ठल रूक्मिणीचे मनोभावे दर्शन घेतले. सर्वांसोबत त्यांनी महाप्रसादाचा लाभही घेतला. दरम्यान, त्यांचे भाषण ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी यावेळी तोबा गर्दी केली होती. 

••••

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या