💥चार साहबजादा यांचे बलिदान शीख समाजाची मूळ प्रेरणा...!


💥नांदेडच्या गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजुरसाहेब गुरुद्वारा येथे सध्या 'शहीद सप्ताह सुरु'💥


नांदेड ; खालसा पंथाचे संस्थापक आणि शीख धर्माचे दहावे गुरु, श्री गुरु गोबिंदसिंघजी यांच्या आई माता गुजरी जी आणि चार पुत्र (साहिबजादे) यांनी  एका आठवड्यात हौतात्म्य पत्करलं होतं. त्यांच्या पावन स्मृतित जगभरातील शीख धर्मीय आणि शीख धर्मावर आस्था बाळगणारे भाविक दि. 21 डिसेम्बर ते दि. 27 डिसेम्बर दरम्यान साहबजादा शहीद सप्ताह पाळतात. नांदेडच्या गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजुरसाहेब गुरुद्वारा येथे सध्या सप्ताह सुरु असून चार  साहबजादे आणि माता गुजरीजी यांच्या स्मरणार्थ गुरुबाणी पठन, सुखमनी साहेब पाठ, कीर्तन आणि अरदास करण्यात येत आहे. अशी माहिती पत्रकार स. रविंद्रसिंघ मोदी यांनी दिली आहे. 

गुरुपुत्र "चार साहबजादा" यांचे पराक्रम व बलिदान हे अगळेवेगळे उदारहण असून माता गुजरीजी यांनी शीख पंथासाठी केलेले प्राणत्याग इतिहासात नोंद व्हावी अशी अद्वितीय घटना होय. एका आठवड्यात गुरु गोबिंदसिंघजी यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांचे बलिदान ही जगातील सर्वश्रेष्ठ अशी घटना होय. दि. 22 डिसेम्बर सन 1704 रोजी चमकौर येथील युद्धात गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांचे ज्येष्ठ सुपुत्र साहबजादा अजीतसिंघ जी (18) आणि साहबजादा जुझारसिंघ जी (15) यांनी पराक्रम गाजवून हौतात्म्य पत्करलं होतं. तर पांच दिवसाच्या कालावधीत साहबजादा जोरावरसिंघजी (9) आणि साहबजादा फतेह सिंघ जी (6) यांना सरहिंद सुब्याचे नवाब वजीरखान यांनी इस्लाम धर्म स्वीकार न केल्यामुळे जिवंत भिंतीत दाबून ठार केले. तर त्याच दिवशी माता गुजरीजी यांनी आपला देहत्याग केला. 


या उदाहरणामुळे शीख पंथाचे बलिदान जगभर स्मरणात आणले जाते. पुढे संघर्षवान शिखांनी "सव्वा लाख से एक लडाऊ, तबै गोबिंदसिंघ नाम कमाऊ" उक्ति सार्थक केली होती. गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांचा पाठलाग करणाऱ्या मोगल साम्राज्याच्या दहा लाख सेनेशी या 40 सैनिकांनी शेवट पर्यंत झुंज दिली होती. शेवटी 40 सैनिकांनी लढत लढत हौतात्म्य पत्करलं. इतिहासात त्यांना "चालीस मुक्ते" असे संबोधले गेलेले आहे. श्री गुरु गोबिंदसिंघ जी महाराज आपल्या चार पुत्रांच्या बलिदानास उद्देशुन म्हणाले होते, "इन पुत्रन के शीश पर वार दिए सुत चार. चार मुये तो क्या हुआ जीवित कई हजार." साहबजादा शहीद सप्ताह एका प्रकारे शीख पंथात नवीन प्रेरणा उत्सर्जित करणारे स्रोत आहे. शीख पंथाच्या मार्गक्रमणात चार साहबजादा यांचे बलिदान मूळ प्रेरणा म्हणून नेहमी पथप्रदर्शित करते असे रविंद्रसिंघ मोदी यांनी नमूद केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या