💥समाज बांधवांना लसीकरणासाठी प्रोत्साहीत करा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन


💥धर्मगुरु व समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींची सभा💥

✍🏻फुलचंद भगत

वाशिम: कोरोनाची संभाव्य तिसरी लाट केंव्हा येईल हे सांगता येणार नाही. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लस घेणे हा एकमेव उपाय आहे. कोरोना लसीबाबत समाजात गैरसमज आहे. कोरोना लस ही सुरक्षित आहे. कोरोना लसीबाबतचे समाजात असलेले गैरसमज दूर करुन मुस्लीम समाजातील धर्मगुरु व प्रतिष्ठीत व्यक्तींनी समाज बांधवांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले.

आज 16 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात कोविड लसीकरणाबाबत मुस्लीम धर्मगुरु व समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींच्या सभेत श्री. षण्मुगराजन बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी दिपक मोरे, मो. शमीम अक्तर हाबीदी, इमाम मोबीन अहमद काझमी व मो. इद्रीस रझा यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. षण्मुगराजन म्हणाले, मी स्वत: एका खेडयात जावून लस घेतली आहे. त्यामुळे लसीबाबतचे ग्रामीण भागात असलेले गैरसमज दूर झाले. राज्यात लसीकरणामुळे एकही मृत्यु झालेला नाही. युरोपीयन देशात आज कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. जिल्हयात जवळपास 45 टक्के मुस्लीम समाज बांधवांनी लस घेतली आहे. उर्वरित पात्र समाज बांधवांनी 30 नोव्हेंबरपर्यंत लस घ्यावी. लसीकरणाचे काम सर्वांना सोबत घेवून करायचे आहे. मुस्लीम समाजातील ज्या डॉक्टरर्सचे दवाखाने आहेत, त्याठिकाणी सुध्दा लसीकरण केंद्र सुरु करण्यात येईल. तसेच मस्जीद परिसद, मदरसा आणि मॅरेज सभागृह येथे सुध्दा लसीकरण केंद्र सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

मुस्लीम बहुल वस्त्यांमध्ये ज्या घरी वृध्द आणि दिव्यांग व्यक्ती आहे, त्यांचे घरी जावून लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला लसीकरण केंद्र सुरु करुन समाजातील पात्र व्यक्तींचे लसीकरण करता येईल, याबाबतची माहिती दयावी. कोरोना विरुध्दची लढाई आपणा सर्वांना एकत्र येऊन लढायची आहे असे ते म्हणाले. 

श्री. हिंगे म्हणाले, लस घेण्यापासून दूर न राहता लस घेवून सुरक्षित असलेले चांगले राहील. नकारात्म्क गोष्टी समाजात लवकर पसरतात. समाजातील धर्मगरु, मौलाना व प्रतिष्ठीत व्यक्ती हे समाजाचे दिशादर्शक आहेत. समाजाचे प्रबोधन करुन त्यांनी समाजातील पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी सहकार्य करावे. चुकीच्या संदेशावर विश्वास न ठेवता आपल्या कुटूंबातील व्यक्तींचा विचार करुन लस घ्यावी असे त्यांनी सांगितले. 

मो. शमीम अक्तर हाबीदी म्हणाले, समाज बांधवांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी. त्यामुळे कोणत्याही समस्या निर्माण होणार नाही. येणाऱ्या काळात कोरोनाची तिसरी लाट आली तर, त्याला प्रतिबंध लसच करणार आहे. अनेकांनी आतापर्यंत कोविड लस घेतली आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. त्यामुळे लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर जावून समाज बांधवांनी लस घ्यावी. असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. 

इमाम मोबीन अहमद काझमी म्हणाले, कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी जगभर लसीकरण करण्यात येत आहे. लसीचे फायदेच आहे. कोरोना लसीबाबत असलेले गैरसमज दूर करुन लस घ्यावी. लसीमुळे कोरोनाला आपणच प्रतिबंध करु शकतो असे त्यांनी सांगितले.

मो. इद्रीस रझा म्हणाले, लसीबाबत समाजात असलेले गैरसमज दूर झाले पाहिजे. कोरोना लस सुरक्षित आहे. कोरोनाची लाट जर आली तर तिला लसच प्रतिबंध करु शकते. समाजातील जेवढे लोक लस घेतील त्यांना फायदाच होईल. तेंव्हा समाजातील पात्र व्यक्तींनी लस घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.  

अली म्हणाले, समाजामध्ये लसीकरणाबाबत गैरसमज आहे. ते दूर झाले पाहिजे त्यावर काही उपाययोजना केल्या पाहिजे. त्यामुळे समाज भयभित न होता लसीकरणासाठी पुढे येईल असे त्यांनी सांगितले. सभेला मेहमुद अ. सत्तार, अ. हमीद अ. मुफ्ती, अ. मुफ्ती आकीब नुरानी, इस्माईल खान, मौलवी अब्दुल अलीम, मो. नाझेर मो. हयात, असमत अली खान, मुस्फीन अ. गनी, मो. जमील मो. सादीक, मो. राजीक व अ. नईम यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या