💥चिखली अर्बनने निर्माण केल्या रोजगाराच्या संधी - ना. नारायणराव राणे यांचे प्रतिपादन...!

                                 


💥चिखली अर्बन बँकेच्या हिरक महोत्सवानिमित्त उद्योजकता प्रोत्साहन व प्रशिक्षण शिबीर संपन्न💥

✍️ राजेंद्र काळे

चिखली :  महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या भारताला प्रभावी बनविण्यासाठी बुलडाणा जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न दोन लाखापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे, त्याकरिता नियोजन व अधिक प्रभावीपणे काम करण्याची आवश्यकता असून.. त्यादृष्टीने चिखली अर्बन बँकेचे काम सुरु असून, लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा विधायक प्रयत्न या बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त व संचालक मंडळाचा असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री ना. नारायणराव राणे यांनी काढून.. लोककल्याणकारी महाराष्ट्र घडविण्याचे काम भारतीय जनता पक्षच सक्षमपणे करु शकतो, असे सांगून तसा विश्वास जनतेच्या मनात तयार करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली._

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात चिखली अर्बन बँकेचे हिरक महोत्सवी वर्ष सुरु झाले असून, त्यानिमित्त रविवार ३१ ऑक्टोबर रोजी उद्योजकता प्रोत्साहन तथा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबीराचे उद्घाटन करतांना केंद्रीय मंत्री ना.नारायणराव राणे बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ.डॉ.संजय कुटे तर प्रमुख उपस्थितांमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष आ.आकाश फुंडकर तर चिखली मतदार संघाच्या आ.सौ.श्वेताताई महाले पाटील या प्रामुख्याने उपस्थित होत्या. सर्वप्रथम दिप प्रज्वलित करुन या शिबीराचे उद्घाटन झाल्यावर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

ना.नारायणराव राणे  बोलतांना पुढे म्हणाले की,भारताला जागतिक किर्तीचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर माध्यमातून मिळाले असल्याने देशाची मान जगात उंचावली आहे. त्यांनी लघू, सुक्ष्म व मध्यम उद्योग खात्याच्या माध्यमातून रोजगार वाढविणाऱ्या योजनांची जी जबाबदारी दिली आहे, ती सक्षमपणे पार पाडण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे.

चिखली अर्बन बँकेने हिरक महोत्सवाच्या निमित्ताने बँकेचे अध्यक्ष सतीशजी गुप्त यांनी उद्योजकता प्रोत्साहन तथा प्रशिक्षण शिबीराचे केलेले आयोजन हे माझ्या खात्यासंदर्भात असल्यामुळे राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या मातृतिर्थ जिल्ह्यात येण्याचे भाग्य मला लाभल्याचे ना.राणे यांनी सांगून ते पुढे म्हणाले की, जनतेला कोणताही दिलासा न देता केवळ केंद्र सरकारवर टिका करण्याचे काम महाराष्ट्राचे विद्यमान सरकार करीत आहे. गोरगरीबांसाठी केंद्र सरकारने ७ वर्षात अनेक योजना दिल्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन केवळ मोदीद्वेष हेच राज्य सरकारचे धोरण राहिले आहे. या आरोप-प्रत्यारोपापेक्षा जनतेचे जिवनमान कसे उंचावेल, हे बघणे जरुरी आहे._

प्रास्ताविकातून डॉ.आशुतोष गुप्त यांनी बुलडाणा जिल्हा हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखल्या जात असल्याने जिल्हा विकासासाठी लघू उद्योजकांना प्रोत्साहन देत आर्थिक सहाय्य करण्याचे आवश्यक असल्याचे नमूद करुन, जिल्ह्याची उद्योजकता वाढीस लागण्याच्या दृष्टीनेच आजचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगितले.

केंद्रीयमंत्री ना.नारायणराव राणे यांचे चिखली नगरीत स्वागत करुन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त म्हणाले की, चिखली अर्बन बँकेने महिला बचत गटाच्या माध्यमातून ३८ हजार महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. आजमितीस केवळ सरकारी बँकांनाच उद्योजकांना आर्थिक पुरवठा करण्याचे अधिकार असून, हे अधिकार नागरी सहकारी बँकांना दिल्यास महाराष्ट्रात अधिकाधिक उद्योजक तयार होवून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळू शकते. याकरीता उद्योग मंत्रालयाच्या विविध योजना कार्यान्वित करण्यासाठी त्यात नागरी सहकारी बँकांचा अंतरभाव करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी सतीशभाऊ गुप्त यांनी व्यक्त केले अध्यक्षीय मनोगतातून आ.डॉ.संजय कुटे यांनी आजचा उद्योजक प्रोत्साहन व प्रशिक्षण शिबीर कार्यक्रम महत्त्वाचा असून ना.राणे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ निश्चित होणार असल्याचे सांगून, यामुळे युवक व महिला उद्योजक तयार होण्यास प्रोत्साहन मिळणार असलेतरी याकरिता सर्वांनी प्रयत्न गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

चिखली विधानसभा मतदार संघात उद्योजकता प्रशिक्षण केंद्र होणे गरजेचे असल्याचे मत आ.सौ.श्वेताताई महाले यांनी व्यक्त करुन चिखली शहरातील सहकार क्षेत्र अग्रेसर असुन त्यांच्या माध्यमातून उद्योजकांना भक्कम करण्याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे नमूद केले. ना.राणे यांच्यासारख्या कर्तृत्वान व्यक्तिमत्वाचे मार्गदर्शन आपणास लाभले असुन, त्यांच्या कार्यकाळात चिखली शहराच्या विविध कामांकरिता त्यांचे सहकार्य मिळाले आहे. या परिसरातील अनेक महिला चिखली अर्बन बँकेशी जुळल्या असुन त्यांनी उद्योगाच्या माध्यमातून यशस्वी भरारी घेत आहोत, असे त्यांनी सांगून ना.राणे यांचे मतदार संघात स्वागत केले. भाजपा जिल्हाध्यक्ष आ.आकाश फुंडकर यांनी ना.राणे यांच्या माध्यमातून जिल्हा विकासासाठी अधिक प्रयत्न होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. स्थानिक रानवारा मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या कार्यक्रमात माजी आ.सौ.रेखाताई खेडकर व विजयराज शिंदे यांच्यासह अंबिका अर्बनच्या अध्यक्षा सौ. संध्या कोठारी, पं.स.सभापती सिंधुताई तायडे, न.प.उपाध्यक्षा वजीराबी शे.अनिस, विजय कोठारी, प्रेमराज भाला, रामकृष्ण दादा शेटे, सुरेश आप्पा कबुतरे, डॉ.प्रतापसिंह राजपूत, संजय चेके पाटील, शे.अनिस शे.बुढन यांच्यासह चिखली अर्बनचे उपाध्यक्ष पुरुषोत्त दिवटे, संचालक व व्यवस्थापक यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अजिम नवाज राही यांनी केले.

▪️ ना.नारायणराव राणे यांचे जंगी स्वागत..अन् राजकीय चर्चांनाही आले उधाण ;-

 चिखली शहराच्या माध्यमातून ना.नारायणराव राणे यांचा हा केंद्रीय मंत्री बनल्यानंतर पहिला बुलडाणा जिल्हा दौरा होता. या गोष्टीचा ना.राणे यांनीही त्यांच्या भाषणातून उल्लेख करुन चिखली अर्बन हिरक महोत्सवी वर्षानिमित्त, राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांच्या भुमीत येण्याचा योग लाभल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमात माजी आमदार सौ. रेखाताई खेडेकर उपस्थित होत्या. अध्यक्षीय मनोगतात आ.डॉ.संजय कुटे यांनी रेखाताईंना परत भाजपात येण्याचे जाहिर निमंत्रण दिले. केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत असलेल्या अनेक योजनांचा उहापोह कार्यक्रमात झाला. चिखली अर्बन बहुउद्देशीय संस्था व भगवानदासजी गुप्ता फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेला हा कार्यक्रम, अनेक अर्थांनी ऐतिहासीकच ठरला...!  

✍️  राजेंद्र काळे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या