💥सुसज्ज हॉस्पीटल अन् अयोध्येत भक्तनिवासाचा भाईजीचा संकल्प...!


💥मग बुलडाणा अर्बनमधील ‘रोल’ला पूर्णविराम ; ‘रेसीडेन्सी क्लब’ शुभारंभप्रसंगी ‘भाईजी' भावनिक💥 

✍️ राजेंद्र काळे

कल्पकतेची परिपूर्ण व्याख्या म्हणजे भाईजी, भाईजींनी बुलडाणा अर्बनच्या माध्यमातून विविध क्षेत्रात घेतलेली गरुडझेप तशी शब्दांच्या कवेत न मावणारी. हेच भाईजी बुलडाणा रेसीडेन्सी क्लबच्या शुभारंभप्रसंगी भावनिक झालेले दिसले. बुलडाण्यात इतकी मोठमोठी हॉस्पिटल्स असतांनाही दररोज पेशंट्स घेवून अ‍ॅम्बूलन्स औरंगाबादला जातात, अनेक निदान अजूनही बुलडाण्यात होत नाही. एका छताखाली सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत, अशा परिस्थीतीत गत काही वर्षांपासून सर्व सुविधांनी युक्त, सुसज्ज असे हॉस्पीटल बुलडाण्यात उभारले जाईल व रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येत १०० खोल्यांचे भक्तनिवास उभारण्याचाही संकल्प असून त्यासाठी जागेचा शोध सुरु असल्याचे राधेश्याम चांडक यांनी सांगून, या २ महत्वाकांक्षी प्रकल्पानंतर बुलडाणा अर्बनमधील आपले कार्य संपले.. असे समजून आपण बाजूला होवू, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

बुलडाणा अर्बनच्या वतीने त्रीतारांकीत ‘रेसीडेन्सी क्लब’ उभारण्यात आले असून त्यात भव्य सांस्कृतिक सभागृह, बैठक हॉल, स्विमिंग टँक, जिम, स्टीम बाथ.. अशा विविध सोयी-सुविधा असून निवासासाठी खोल्या उपलब्ध आहेत. महानगरीय हॉटेल्सच्याही पुढे एक पाऊल टाकत निर्माण झालेल्या या हॉटेलचे उद्घाटन बुलडाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डॉ.सुकेश झंवर यांच्या १० ऑक्टोबर या वाढदिवशी करण्यात आले. त्यावेळी भाईजी बोलत होते. मंचावर डॉ.झंवर सह सौ.कोमलताई झंवर, बुलडाणा अर्बनच्या संचालक मंडळासह या वास्तूची संकल्पना आखणारे स्ट्रक्चरल इंजिनिअर अशोक शर्मा व बांधकामातून ती साकारणारे उद्योजक कमलेश कोठारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कु.कनिष्का कोमल सुकेश झंवर या भाईजींच्या नातीने फित कापून ‘रेसिडेन्सी क्लब’चे उद्घाटन केले. यावेळी बुलडाणा अर्बन रेसिडेन्सीच्या हिरवळीवर झालेल्या शानदार सोहळ्यात डॉ.सुकेश झंवर यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला. यावेळी भाईजी पुढे म्हणाले की, बदलत्या काळानुसार हॉटेल्सच्या संकल्पनाही बदलत आहे. जेव्हा बुलडाणा अर्बन रेसीडेन्सी बांधली, तेव्हा ती खूप मोठी वाटायची. आता मात्र अनेक कार्यक्रमांना ती छोटी पडू लागली आहे. काहीवेळातर पाहुण्यांसाठी बाहेरच्या हॉटेल्सला खोल्या करण्याची वेळ आयोजकांवर येते. परिणामी या दुसNया हॉटेलची परिपूर्ण संकल्पना सुचली. आता याठिकाणी अनेक आई-वडिलांची त्यांच्या मुला-मुलींचे कार्य करण्याची स्वप्न पूर्ण होतील. हॉटेल चालविण्यासाठी बाहेरुन एजन्सी आणण्यापेक्षा स्थानिकांनाच रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न राहील. बुलडाणा शहराच्या वैभवात भर घालणारे हे नवे दालन साकारत असतांना, या जिल्ह्यासाठी सर्व सुविधायुक्ता सुसज्ज हॉस्पीटल व अयोध्येला भक्तनिवास, या २ संकल्पना असून त्या पूर्ण झाल्यानंतर आपण बुलडाणा अर्बनच्या कार्यातून बाजूला होवू.. असे शेवटी भाईजी म्हणाले.

रेसीडेन्सी क्लबची ही इमारत कोरोना काळात अनेक अडचणींचा सामना करत, नियोजीत २ वर्षातच पूर्ण करता आली.. याचा आनंद बांधकाम व्यवसायीक कमलेश कोठारी यांनी व्यक्त केला. तर निसर्गनिर्मित अनेक सुंदर गोष्टी जगात असतांना मानवनिर्मित सुंदर असणारी वस्तू ही वास्तू म्हणजे इमारत असते. १४ देशात बांधकाम क्षेत्रात काम करत असतांना मातृभूमी असणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात रेसीडेन्सी क्लबच्या रुपाने डॉ.सुकेश झंवर यांच्या संकल्पनेतील ‘वल्र्ड क्लास’ इमारत बांधता आली, याचा आनंद स्ट्रक्चरल इंजिनिअर अशोक शर्मा यांनी व्यक्त केला. आपल्या कार्याची सुरुवात १९९८ला बुलडाणा अर्बन सहकार विद्या मंदिरापासूनच झाली असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. यावेळी बांधकामातील योगदात्यांचा स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला बुलडाणा जिल्ह्यातील अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या शुभारंभ सोहळ्याला भेटी दिल्यात. सुत्रसंचालन पत्रकार रणजीतसिंह राजपूत यांनी केले. तर यावेळी बहारदार संगिताची मैफीलही सजली.

वर्ल्डक्लास दर्जाची संकल्पना साकार : डॉ.झंवर

बुलडाणा अर्बनमध्ये भाईजींच्या संकल्पनेतून अनेक कल्पक साकारले आहेत. त्यातूनच ‘रेसीडेन्सी क्लब’ची कल्पना पुढे आली. ही बिल्डींग ‘वल्र्डक्लास’ दर्जाची असावी, असा आपला काम करणाऱ्यांचाही आग्रह होता. त्याची अंमलबजावणी करुन अशोक शर्मा व कमलेश कोठारी यांनी मेहनतीतून ही इमारत उभी केली. त्यामुळे बुलडाण्यात आता वल्र्डक्लास दर्जाची संकल्पना साकारली असल्याचा आनंद यावेळी डॉ.सुकेश झंवर यांनी व्यक्त केला.

कदाचीत विदर्भातून प्रथमच स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये अमेरिकेतील पी.एचडी मिळविल्याबद्दल यावेळी अशोक शर्मा यांचा भाईजी व डॉ.झंवर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला....

✍️ राजेंद्र काळे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या