💥नागरिकांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवावी - न्या.आर.पी. कुलकर्णी


💥कारागृहातील कैद्यांसाठी आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात मुख्य मार्गदर्शक म्हणून न्या. कुलकर्णी बोलत होते💥

✍🏻फुलचंद भगत

वाशिम:-प्रत्येक व्यक्ती हा त्याचे अधिकार माहीत करून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवावी. असे प्रतिपादन मुख्य न्यायदंडाधिकारी आर.पी. कुलकर्णी यांनी केले.

            आज २९ ऑक्टोबर रोजी जिल्हा कारागृह येथे आझादी का अमृत महोत्सवानिमित्ताने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम यांच्या संयुक्त वतीने कारागृहातील कैद्यांसाठी आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात मुख्य मार्गदर्शक म्हणून न्या. कुलकर्णी बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. संजय शिंदे होते. यावेळी जिल्हा कारागृह अधीक्षक सोमनाथ पाडुळे प्रामुख्याने उपस्थित होते.

          न्या. कुलकर्णी पुढे म्हणाले, प्रत्येक नागरिकाला घटनेत नमूद केलेले मूलभूत कर्तव्य माहीत असतीलच असे नाही.राष्ट्रीय ध्वज व राष्ट्रगीत यांचा सन्मान करणे हे देखील आपले कर्तव्य आहे. नागरिकांनी यामध्ये कसूर केल्यास त्याबाबत शिक्षेचे प्रयोजन असलेले कायदे आहेत, असे सांगितले. यावेळी त्यांनी शिक्षेचा सौदा आणि नागरिकांचे मुलभूत कर्तव्य या विषयावर उपस्थित कैद्यांना मार्गदर्शन केले.

               न्या. शिंदे यांनी कैद्यांविषयी घटनेमध्ये व दिवाणी प्रक्रिया संहिता १९७३ मध्ये कैद्यांविषयी असलेल्या तरतुदी व तरतुदीनुसार अटक करताना पोलिस अधिकाऱ्यांनी अटक करणाऱ्या व्यक्तीला अटकेचे कारण सांगणे तसेच अटकेची माहिती त्याच्या नातेवाईकांना देणे, त्याचप्रमाणे अटक केल्यापासून २४ तासाच्या आत न्यायालयात हजर करणे. असे अटक व्यक्तीचे अधिकार असल्याचे न्या. शिंदे यांनी सांगितले.

          यावेळी न्या.शिंदे यांनी उपस्थित कैद्यांना जामिनाच्या तरतुदीची माहिती देऊन ज्या कैद्यांना जमानत दिली,त्या कैद्याने जमानत आदेशात नमूद अटीचे उल्लंघन केल्यास त्याची जमानत देखील रद्द होऊ शकते, याबाबतची माहिती दिली.

               कार्यक्रमाला जिल्हा कारागृहातील कैदी उपस्थित होते. प्रास्ताविक व संचालन जिल्हा विधीज्ञ संघाचे सचिव ऍड एन.टी.जुमडे यांनी केले.आभार कारागृह अधीक्षक पाडुळे यांनी मानले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या