💥मुलगा मुलगी एक समान असल्याने लिंग भेद करु नये - न्या. एस.एम.मेनजोगे


💥वाशिम तालुक्यातील काटा येथे कायदे विषयक कार्यक्रम💥

✍🏻फुलचंद भगत

वाशिम : आज आपण 21 व्या शतकात असतांना देखील मुलगा पाहिजे, या अट्टाहासापोटी गर्भलिंग निदान करुन मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात करतो. याबाबीस पुरुषच जबाबदार आहे. आज प्रत्येक क्षेत्रात मुलगी मुलाच्या खांदयाला खांदा लावून काम करीत आहे. त्यामुळे मुलगा मुलगी एकसमान असल्याने लिंगभेद करु नये, असे आवाहन न्या. एस.एम. मेनजोगे यांनी केले.

आज  11 ऑक्टोबर रोजी वाशिम तालुक्यातील काटा येथे आझादी का अमृत महोत्सवानिमित्ताने आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबीरात अध्यक्षस्थानावरुन न्या. श्री. मेनजोगे बोलत होते. यावेळी जिल्हा विधी  सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. संजय शिंदे, जिल्हा विधीज्ञ संघाचे सचिव ॲड. एन.टी. जुमडे, महिला व बालकल्याणचे परिविक्षा अधिकारी ॲड. जिनसाजी चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

न्या. शिंदे यांनी प्रास्ताविकातून गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्राचा वापर अधिनियम 1994 या विषयी मार्गदर्शन केले. मुलगा मुलगी हा भेद न करता सोनोग्राफी व इतर वैद्यकीय तंत्राचा वापर गर्भलिंग निदान करण्यासाठी करु नये, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले.

ॲड. चौधरी यांनी बालविवाह प्रतिबंध कायदा या विषयी विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले यांनी केले. उपस्थितांचे आभार ग्रामसेवक दशरथ राठोड यांनी मानले. कार्यक्रमाला महिला, युवावर्ग व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या