💥काँग्रेस पक्ष विकासाभिमुख कामे करणाऱ्यांचा पाठीराखा : ना.यशोमतीताई ठाकूर


💥नगराध्यक्षा सौ.प्रियाताई व कुणाल बोंद्रेसह, शाम पठाडे, गोपाल देव्हडे यांच्या पक्ष प्रवेशामुळे💥  

💥काँग्रेसची ताकद वाढणार : जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे


✍️ मोहन चौकेकर

चिखली :  ग्राऊंड लेवलवर कार्यरत असलेला कार्यकर्ता हाच प्रत्येक पक्षाच्या पाठीचा कणा असतो म्हणून कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करण्याचे कार्य काँग्रेसच्या माध्यमातून होत असून काँग्रेस पक्ष सदैव विकासाभिमुख कामे करणाऱ्यांचा पाठीराखा असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ना.यशोमतीताई ठाकूर यांनी केले. तर बोंद्रे घराण्याच्या अनेक पिढ्यां जनसेवेकरिता सातत्याने सर्वस्व अर्पण करीत आल्याचा सार्थ अभिमान असल्याचे उद्‌गार काढत नगराध्यक्षा प्रियाताई व कुणाल बोंद्रे यांच्यासह शाम पठाडे, गोपाल देव्हडे यांच्या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचे मत माजी आमदार तथा बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांनी विशाल जनसमुदायाला संबोधतांना काढले. नगराध्यक्षा सौ.प्रियाताई कुणाल बोंद्रे, कुणालभाऊ बोंद्रे, नगरसेवक गोपाल देव्हडे, अमडापुर जि.प. सदस्या सौ. शैलाताई श्याम पठाडे व असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भारतीय काँग्रेस पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी बोलत होते.


ऐतिहासिक जयस्तंभ चौक परिसरात उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य शामीयान्यात विशालकाय जनसमुदायाच्या उपस्थितीत या काँग्रेस पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. थेट जनतेने निवडून दिलेल्या नगराध्यक्षा सौ.प्रियाताई कुणाल बोंद्रे, माजी उपनगराध्यक्ष कुणाल बोंद्रे, न.प.पाणीपुरवठा सभापती गोपाल देव्हडे, अमडापूर जि.प.च्या सदस्या शैलाताई पठाडे तथा माजी जि.प.सदस्य शाम पठाडे, दिलीप खंडलकर, जमील काझी, गाझी बाबा, माजी मुख्याध्यापक रामकृष्ण जाधव हातणी, शे.बबलु, हनी सोनवाल, यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आज ता.२८ रोजी चिखली तालुका व शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यावेळी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ना.यशोमतीताई ठाकूर यांची विशेष उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्यासह प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके, बुलडाणा जि.प.अध्यक्षा मनीषाताई पवार, जि.प.सभापती ज्योतीताई पडघान, कृ.उ.बा. चे सभापती नंदकिशोर सवडतकर, माजी नगराध्यक्ष पप्पुसेठ हरलालका, बुलडाणा पं.स.सभापती सौ.उषाताई चाटे, सतीश मेहेंद्रे, जिल्हा काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष विष्णुपाटील कुळसुंदर, दिपक देशमाने, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष समाधान सुपेकर, शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी, काशीनाथआप्पा बोंद्रे, रफिकसेठ, निलेश अंजनकर, काँग्रेसचे नगरसेवक हाजी रऊफभाई, दिपक खरात, गोकुळ शिंगणे, मो.आसीफ मो.शरीफ, सुनिल सुरडकर, नंदु चौधरी,  सौ.संगीताताई गाडेकर, सौ.विद्याताई देशमाने, दिपक थोरात, डॉ.इसरार, अमीनखाँ उस्मानखाँ, प्रदीप पचेरवाल, डॉ.सत्येंद्र भुसारी, विनोद पऱ्हाड मेहकर, सत्तार पटेल, माजी सभापती ज्ञानेश्वर सुरूसे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलतांना ना.यशोमतीताई ठाकूर म्हणाल्या कि, केंद्रातील भाजप सरकारने काँग्रेसमुक्त भारत हा नारा दिला मात्र काँग्रेस विचारधारेने प्रभावीत होऊन पक्षात दाखल होणाऱ्यांची वाढती संख्या पाहता काँग्रेसमुक्त भारत ऐवजी काँग्रेसयुक्त या अभियानास खऱ्या अर्थाने बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीपासून सुरूवात झाल्याचे सांगितले. सत्तेत आले नाही म्हणून काँग्रेस संपत नसून भाजप सरकारला खोटं बोलायचे मात्र रेटून बोलायचे हे कसे जमते? असा प्रतिप्रश्न यावेळी उपस्थित केला. कोरोनाकाळात देशाला लसींची नितांत गरज असतांना त्या लसी परेदशात पाठविण्याचे पाप केंद्रसरकारने केले. या लसी वेळीच भारतीय नागरिकांना उपलब्ध झाल्या असत्या तर अनेकांचे लाखमोलाचे प्राण वाचले असते सांगत भाजपमधून काँग्रेस पक्षात प्रवेश घेत असलेल्या नगराध्यक्षा सौ.प्रिया बोंद्रे, कुणाल बोंद्रे व त्यांचे सहकारी यांनी चिखली शहरात विकासाभिमुख कामे केलीत त्या कामांच्या जोरावर मिळत असलेली लोकप्रियता सहन न झाल्याने त्यांच्यावर आरोप करीत निष्कासीत करण्याची राजकीय द्वेषातून कारवाई करण्यात आली. यावेळी बोलतांना त्या पुढे म्हणाल्या की, काँग्रेस पक्ष हा विकासाभिमुख कामे करणाऱ्यांचा पाठीराखा असून येत्या काळात चिखली नगर परिषदेला विकासकामांकरिता कुठलाही निधी कमी पडू देणार नसल्याचेदेखील सांगितले.

तर आज संपन्न होत असलेला भव्यदिव्य प्रवेशसोहळ्याची इतिहासात नोंद होणार असून आजवर चिखलीवासियांनी बोंद्रे घराण्यावर दर्शविलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला नाही. तर १९७४ साली कर्मयोगी सिद्धविनायक बोंद्रे, २००१ साली राहुल बोंद्रे, व २०१६ मध्ये सौ.प्रिया बोंद्रे ह्यांना थेट जनतेतून निवडून येण्याची राज्यातील ऐतिहासिक नोंद असल्याचे सांगत बोंद्रे घराण्याच्या अनेक पिढ्यां जनसेवेकरिता सातत्याने सर्वस्व अर्पण करीत आल्याचा सार्थ अभिमान असल्याचे उद्‌गार काढत नगराध्यक्षा प्रियाताई व कुणाल बोंद्रे यांच्यासह शाम पठाडे, गोपाल देव्हडे यांच्या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचे मत माजी आमदार तथा बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांनी काढले. तसेच जनसेवेकरिता सातत्याने सर्वस्व अर्पण केल्याचा सार्थ अभिमान असल्याचेदेखील सांगितले. कोरोनाच्या २ वर्षांच्या कालावधीत सुमारे ३६ कोटी रूपयांचा महाविकास आघाडीच्या माध्यमातून चिखली नगर परिषदेला दिला. याउलट भाजपाच्या वि.आमदारांसह नेत्यांनी वेळोवेळी कुठलाही निधी खेचून तर आणलाच नाही मात्र विविध विकासकामांमध्ये अडथळे निर्माण केले. नगराध्यक्षा प्रिया बोंद्रेंच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांतून मिळणारी लोकप्रियता भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागल्यामुळे जळजळ होत असल्याचेही सांगितले. तर येत्या न.प.व इतर निवडणुकांकरिता काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहन केले.

तर यावेळी प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, माजी नगराध्यक्ष कुणाल बोंद्रे, नगरसेवक गोपाल देव्हडे आदींची समयोचित भाषणे झाली. यावेळी शहेजाद अलीखान, जय बोंद्रे, सुरेश बोंद्रे, राहुल सवडतकर, अश्विन जाधव, बाळु साळोख, संजय गिरी, सचिन शेटे, पप्पु जागृत, ॲड.प्रशांत देशमुख, कैलास जंगले यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी, सुत्रसंचलन प्रख्यात कवी अज़ीम नवाज़ राही यांनी तर आभारप्रदर्शन तालुकाध्यक्ष समाधान सुपेकर यांनी केले.


            प्रचंड मताधिक्याने जनतेने निवडून दिल्यामुळे नगराध्यक्षपदी विराजमान होऊ शकले. जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता कोट्यवधी रूपयांचा निधी खेचून आणत माझे पती कुणालजी बोंद्रे यांच्या माध्यमातून शहराचा सर्वांगिण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. ठिकठिकाणी केलेल्या विकासकामांमुळेच विधानसभा निवडणुकीत मते मागण्यात आली व चिखलीकरांसह जनतेनेसुद्धा त्यावेळी भरभरून मते पारड्यात टाकली. परिणामी वि.आमदार या निवडणुकीत विजयी होऊ शकल्या. मात्र त्यांनी अनेक कामांची उद्घाटने व भूमीपुजने नारळ फोडून केली, आश्वासनांची खैरात वाटली परंतु प्रत्यक्षात यातील कोणतीही कामे पूर्णत्वास नेली नाहीत किंवा मागील काळात कुठलाही निधी खेचून आणू शकल्या नाहीत. बोंद्रे परिवाराची वाढती लोकप्रियता पाहून राजकीय आकसापोटी विकासकामांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करीत भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावर लावण्यात आले. पूर्वीपार पासून माझ्या कुटुंबीयांवर काँग्रेस विचारधारेचा प्रभाव असून काँग्रेस हाच सक्षम पर्याय समोर असल्याने आम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला तर बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवीत पुढील वाटचाल करण्याचा मानस आहे.

- सौ.प्रिया कुणाल बोंद्रे, नगराध्यक्षा, चिखली

            बालपणापासून संघाच्या तालमीत आम्ही घडलो असून ग्रा.पं.सदस्यांपासून तर जि.प.निवडणुकांमध्ये जनतेने भरघोस मतांनी विजयी करीत माझ्यावर विश्वास दर्शविला. त्याचीच परिणती म्हणजे माझ्यानंतर माझी पत्नी सौ.शैला पठाडे ह्यादेखील जि.प.सदस्य म्हणून आजही कार्यरत आहे. कार्यकर्ता म्हणून भाजपात याअगोदर मान सन्मान होता मात्र आजमितीस कोणत्याही प्रकारचा मानसन्मान मिळत नसल्याचे सांगतांना मन गहिवरून आले आहे. कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचे काम भाजप नेतृत्वाकडून होत असल्यामुळे भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. तळागळातील कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणाऱ्या काँग्रेस पक्षातील विचारधारेने प्रभावीत होऊन भाजपाला रामराम ठोकला आहे.

- शाम पठाडे, माजी जि.प.सदस्य

 ✍️  मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या