💥अन्नदात्या शेतकऱ्या काय..रे तुझी ही दैना ; पावसाच्या तावडीतून काढलेले सोयाबीन पुन्हा पाण्यात...!


💥वाशिम तालुक्यातील केकतउमरा येथील घटना 16 क्विंटल सोयाबीन झाले मातीमोल 80 हजाराचे नुकसान💥 

फुलचंद भगत

वाशिम :वाशिम तालुक्यातील केकतउमरा येथील शेतकरी प्रकाश गौर आणि गजानन ज्ञानबा तडस या शेतकऱ्यांचे नुकतेच काढलेले सोयाबीन ट्रॅक्टरमध्ये घरी आणत असतांना सदर ट्रॅक्टर एकबुर्जी धरणाच्या सांडव्यात कोसळून ट्रॅक्टरमधील पाच क्विंटल सोयाबीन वाहून गेले तर अकरा क्विंटल सोयाबीनचे पोते पाण्यात भिजल्याने लाख रुपयाचे नुकसान झाल्याची घटना दि. गुरुवारी 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता केकतउमरा येथिल एकबुर्जी धरणाच्या सांडव्यातील नाल्यावर शेतशिवारात घडली. 

              सविस्तर असे की, केकतउमरा येथील शेतकरी प्रकाश गौर यांची शेती गजानन ज्ञानबा तडस हे शेतकरी वहितीने करतात. पावसाने थोडी उसंत दिल्याने गौर आणि तडस यांनी आपल्या शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन गुरुवारी थ्रेशरने काढले. आणि दुपारच्या सुमारास सुभाष किसन हरीमकर यांच्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने 16 क्विंटल सोयाबीन पोत्यात भरून घराच्या दिशेने मार्गक्रमण केले. दरम्यान पांदण रस्त्यात असलेल्या एकबुर्जी धरणाच्या सांडव्यातुन तयार झालेल्या नाल्यातुन ट्रॅक्टर काढतांना ट्रॅक्टरचे एक चाक फसले. दरम्यान पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ट्रॅक्टर अधिक फसत गेले. परिणामी ट्रॅक्टर मधिल पाच क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत वाहून गेले. आणि ट्रॅक्टर मध्ये राहिलेले सोयाबीन पूर्णपणे भिजून गेले.यावेळी  प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याने ट्रॅक्टर मधील भिजलेले 11 क्विंटल सोयाबीन बाहेर काढता आले. मात्र, पोत्यातुन बाहेर काढल्यानंतर पूर्णपणे सडून गेले आहे. अश्याप्रकारे सोयाबीनचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले . तसेच सुभाष हरीमकर यांच्या ट्रॅक्टरचे 25 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर नुकसानीची शासनाने भरपाई घ्यावी अशी मागणी प्रकाश गौर आणि गजानन तडस या शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच घटनास्थळी पूल बांधून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.  

 या घटनेमुळे आधीच हताश झालेल्या शेतकऱ्यांचे डोळे आणखीनच ओले झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमातून व्हायरल झाल्याने शेतकऱ्यांप्रती अनेकांनी हळहळ व्यक्त केली.


प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या