💥परभणीत महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद...!


💥शहरातील सर्व व्यवहार दुपारनंतर पुन्हा सुरळित💥

परभणी (दि.११ आक्टोंबर) : उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनास आज सोमवार दि.१२ आक्टोंबर रोजी शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.


शिवसेना,अखिल भारतीय काँग्रेस पार्टी,राष्ट्रवादी काँग्रेस व सत्तारुढ आघाडीतील अन्य घटकपक्षांनी पुकारलेल्या या बंद आंदोलनास कितपत पाठींबा मिळेल या विषयी शंका-कुशंका व्यक्त होत होत्या. विशेषतः सोमवारी सकाळपासून नेहमीप्रमाणे बाजारपेठा खुल्या झाल्या. या दरम्यान लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परभणी शहरातून काही भागात फेरफटका मारला तेंव्हा बाजारपेठांतील व्यवहार पूर्णतः ठप्प झाले होते. ज्येष्ठ नेते आमदार सुरेश वरपुडकर, खासदार संजय जाधव, खासदार श्रीमती फौजिया खान, आमदार डॉ. राहुल पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, माजी खासदार अ‍ॅड. तुकाराम रेंगे पाटील, उपहापौर भगवान वाघमारे, स्थायी समिती सभापती गुलमीर खान, रविंद्र सोनकांबळे, प्रा. रामभाऊ घाडगे, काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधणे, बाळासाहेब देशमुख, श्रीधर देशमुख, विनोद कदम, नागसेन भेरजे, रोडगे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, महानगराध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के, शेख शब्बीर, नंदा राठोड, रोडगे, महापौर सौ. अनिता सोनकांबळे, जानू बी आदींनी गांधी पार्क, गुजरी बाजार, कच्छी बाजार वगैरे मुख्य बाजारपेठेतून सकाळी 11 च्या सुमारास फेरफटका मारला. व्यापार्‍यांना बंदचे आवाहन केले. या मंडळींच्या सन्मानार्थ व्यापार्‍यांनी आपआपली प्रतिष्ठाने बंद केली. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलनकर्त्यांनी ठाण मांडून बंद यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. दुपारी मात्र व्यापारीपेठा बंद करण्याबाबत आघाडीच्या या मंडळींनी फारसा आग्रह केला नाही. त्यामुळे सर्व व्यवहार दुपारी एक नंतर सुरळीतपणे सुरु झाले होते.

     दरम्यान, वसमत रोड, जिंतूर रोड आदी भागात काही काळ बाजारपेठा बंद होत्या. शाळा, महाविद्यालय नेहमीप्रमाणे सुरु होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या