💥धनंजय मुंडे परळीचा बारामतीसारखा विकास करतील ; त्यांना कायम पाठबळ द्यावे - ना. जयंत पाटील यांचे परळीत आवाहन...!


💥अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार नुकसान भरपाई देणार - ना.जयंत पाटील

[ परळी धनुभाऊंची, इथे पक्ष-संघटना परिपूर्ण; आढाव्याची गरजच नाही - जयंत पाटील यांच्या परिवार संवाद यात्रेत धनंजय मुंडे "पास"

'धनुभाऊवर माझं लहान भावाप्रमाणे प्रेम' म्हणत पाटलांनी जिंकली परळीकरांची मने

धनंजय मुंडेंप्रमाणेच मंत्री झाल्यानंतर परळीत प्रथम आलेल्या जयंत पाटलांचे भर पावसात अभूतपूर्व स्वागत

परळीची माती आणि पक्षाच्या साथीनेच आज मी मंत्री होऊ शकलो - ना.धनंजय मुंडे]

परळी वैजनाथ -: धनंजय मुंडे हे अत्यंत प्रतिभावान नेते आहेत, पुढील काळात परळी मतदारसंघासह राज्यभरात त्यांच्या हातून मोठे विकासकार्य होणे अपेक्षित आहे. येत्या काही वर्षात परळी मतदारसंघाचा त्यांच्या हातून बारामतीसारखा विकास होईल, त्यासाठी परळी करांनी कायम पाठीशी राहून आपल्या धनुभाऊंना पाठबळ द्यावं असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी केले आहे. 

ना. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याच्या तिसऱ्या पर्वात ही यात्रा बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात आली असता ना. जयंत पाटील यांनी परळी मतदारसंघात बैठक घेतली, मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता या बैठकीचे मेळाव्यात रूपांतर झाले आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

💥अतिवृष्टीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार मदत करणार ;-

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच जयंत पाटील यांनी बीड जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा उल्लेख करत बीड जिल्ह्यातील नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार भक्कमपणे उभे असल्याचे सांगितले. तसेच राज्य सरकार प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यांच्या आधारे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत करणार असल्याचेही स्पष्ट केले. 

💥परळी धनुभाऊंची ;-

धनंजय मुंडे प्रथम मंत्री झाल्यानंतर परळीकरांनी ज्या जल्लोषात त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले होते, अगदी त्याच जल्लोष व धो धो पडत्या पावसात प्रचंड उत्साहात परळी मतदारसंघातील प्रत्येक गावात व शहरातील रस्त्यांवर जागोजागी जयंत पाटील यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. "माझ्या लग्नात एवढी मोठी वरात कोणी माझी काढली नव्हती" अशी टिप्पणी करत ना. पाटलांनी परळीतील कार्यकर्त्यांचे आभार मानले. 

यावेळी परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी परिपूर्ण असून इथे आढावा घेण्याची गरजच नाही, इथे पक्ष संघटना अगदी परिपूर्ण आहे. पक्षाच्या आढावा बैठकीच्या बाबतीत धनु भाऊ आणि त्यांची टीम 'पास' झाली, असा विश्वास ना. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

💥धनुभाऊवर माझं लहान भावाप्रमाणे प्रेम ;-

मोठा होणाऱ्या प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या टीका करून त्याची उंची कमी करण्याचे प्रयत्न केले जातात. आमच्या धनु भाऊंवर देखील असेच आरोप करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु मी कायम त्यांच्या पाठीशी आहे. माझं त्यांच्यावर लहान भावाप्रमाणे प्रेम आहे व ते कायम राहील, असे म्हणत जयंत पाटील यांनी उपस्थितांची मने जिंकली

💥परळीची माती अन पक्षाची साथ ;-

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर मला सर्व स्तरावर खलनायक ठरविण्यात आले. लोकांच्या भावनिक प्रचारामुळे अनेकांनी मला शिव्या घातल्या, परंतु परळीच्या मातीतील माणसांनी मला उभारी दिली. पक्षाचे नेते खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी मला संधी दिली आणि आज मी राज्याचा मंत्री होऊ शकलो. या मातीचे व पक्षाचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही, असे प्रतिपादन ना. धनंजय मुंडे यांनी केले. 

या कार्यक्रमास ना.जयंत पाटील, ना.धनंजय मुंडे, आ.संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शिवकन्याताई सिरसाट, रा.कॉ.चे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, रा.कॉ.संपर्कमंत्री जयसिंगराव गायकवाड, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष सौ. रुपालीताई चाकणकर, मा.आ.उषाताई दराडे, सुदामती ताई गुट्टे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, पक्ष निरीक्षक जीवनराव गोरे, डॉ.सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, युवती आघाडी प्रदेशाध्यक्ष कु.सक्षनाताई सलगर, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जि. प. गटनेते अजयजी मुंडे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयसिंह सोळंके, रामेश्वर मुंडे, सुरज चव्हाण, परळीच्या नगराध्यक्ष सौ. सरोजनीताई हालगे, उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, गटनेते वाल्मिक अण्णा कराड, मतदारसंघ अध्यक्ष गोविंदराव देशमुख, राजेश्वर आबा चव्हाण, दत्ता आबा पाटील, परळी तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे, पंचायत समिती सभापती बालाजी मुंडे, मार्केट कमिटीचे सभापती ऍड. गोविंदराव फड, शिवाजी सिरसाट, वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांच्यासह महिला आघाडीच्या ऍड.हेमा ताई पिंपळे, जिल्हाध्यक्ष संगीताताई तुपसागर, प्रज्ञाताई खोसरे, रेखाताई फड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध आघाड्या व सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारिणीचे सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या