💥वाशिमचे नगराध्यक्ष मुख्याधिकारी व अभियंत्यावर युवकास आत्महत्येस प्रवृत्त गुन्हा दाखल...!


💥ग्रामीण पोलिस स्थानकात आत्महत्सेस प्रवृत्त केल्या प्रकरणी कलम ३०६ अंतर्गत गुन्हे दाखल💥

✍🏻फुलचंद भगत

वाशिम – मानसिक त्रास देवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फाशी घेण्याआधी मृतकाने लिहीलेल्या चिठ्ठीत नमुद केलेल्या मजकुराच्या आधारे ग्रामीण पोलीसांनी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व अभियंता यांच्यावर २३ सप्टेंबर रोजी भांदवी कलम ३४ व ३०६ अंतर्गत ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत.    

            शिवा संघटनेचे पदाधिकारी असलेले मृतक गोपाल रविशकंकर महाजन (वय ३२) रा. शिवाजीनगर, सिव्हील लाईन वाशिम यांनी २२ सप्टेंबरच्या रात्री ९ च्या सुमारास मालेगाव रस्त्यावरील झाकलवाडी शेतशिवारात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. याबाबत त्यांचे भाऊ सचिन महाजन यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला २३ सप्टेंबरला फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास ग्रामीण पो.स्टे.चे सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश गलांडे हे करीत आहेत.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी त्वरीत वाशीमचे एस.पी. डीवायएसपी यांना फोन लावून सदर प्रकरणी संबंधीतांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली व कारवाई न झाल्यास शिवा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

फिर्यादी सचिन महाजन यांच्या फिर्यादीनुसार, मी शेतावर असतांना मला पोलीसांचा फोन आला की, आम्ही वाशीम ग्रामीण येथुन बोलतो व त्यानी सांगीतले की, तुमचा लहान भाऊ गोपाल रविशंकर महाजन याने मालेगाव रोडवरील मथुरा हाँटेलचे समोरील गावंडे ले आँऊटमधील निंबाचे झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केली आहे . तुम्ही ताबडतोब या असे सांगीतल्याने मी व भागवत चौधरी, जगदिश गोरे असे मालेगाव रोडवरील मथुरा हाँटेल समोरील गांवडे लेआऊट येथे गेलो असता माझा लहान भाऊ गोपाल रविशंकर महाजन हा निबांचे झाडाला दोरीने गळफास घेवुन लटकलेला दिसला. त्याठीकाणी पोलीस सुध्दा हजर होते. पोलीस कार्यवाही करीत असतांना माझे भाऊ गोपाल याचे सुझुकी एक्सेस १२५ स्कुटीची डिकी उघडुन पाहणी केली असता त्यामध्ये एक फाईल मिळुन आली. सदर फाईलची पोलीसांनी पाहणी केली असता त्यामध्ये माझा लहान भाऊ गोपाल रविशंकर महाजन याने मरणापुर्वी स्वत:चे आक्षरात लिहुन ठेवलेली सहा पानाची चिठ्ठी मिळुन आली. सदरची सहा पाने मी वाचुन पाहीली. माझा भाऊ गोपाल याचे हस्ताक्षर ओळखतो. चिठ्ठीमधील लिहीलेल्या मजकुराचे हस्ताक्षर हे माझा भाऊ गोपाल याचेच आहे. सदर चिठ्ठीमध्ये सुध्दा त्याने जगतज्योती महात्मा बसवेश्वर वचन स्तंभ व चौक सौदयीकरण बाबतचे कामाकरीता नगरपरिषद जागा उपलब्ध करुन देत नसल्याने व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिपक मोरे, अभियंता विजय घोगरे व अध्यक्ष अशोक हेडा यांनी दिलेल्या मानसिक त्रासाबाबत उल्लेख केलेला असुन त्याकारणानेच मी आत्महत्या करीत असल्याचे नमुद केले आहे. या तिघांनी दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळुन गोपाल महाजन याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले अशी जबानी फिर्याद मृतकाचा भाऊ सचिन महाजन यांनी वाशीम ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली. या फिर्यादीनुसार पोलीसांनी न.प. अध्यक्ष, मुख्याधिकारी. अभियंता यांच्यावर कलम ३०६ व ३४ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

गोपालआप्पा महाजन हे शिवा संघटनेचे धडाडीचे, निडर आणि मनमिळाऊ व्यक्तीमत्व आणि सामाजीक कार्यकर्ते होते. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव व विशाल मित्रपरिवार असल्यामुळे त्यांच्या निधनाची वार्ता वार्‍यासारखी शहरात पसरतसच शिवा संघटनेसह सर्व समाजबांधव, मित्र परिवार आणि वाशिमकर शोकसागरात बुडाले आहेत. एवढा कणखर व धाडसी माणूस, लढाऊ बाणा असलेल्या गोपालआप्पाने जीवनाच्या लढाईत पराभव पत्करुन एवढा टोकाचा निर्णय का घेतला हे कळायला मार्ग नाही. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच त्यांना जाणणार्‍या व मानणार्‍या प्रत्येकाचे डोके बधीर झाले आहे. मृतक गोपाल महाजन यांनी कोरोनाकाळात जिवाची पर्वा न करता अनेकांना मदत केली आहे. या दरम्यान त्यांनाही कोरोनाने गाठले होते. तब्बल १५ ते २० दिवस कोरोनाशी झुंज देत त्यांनी या आजारावर मात केली होती शिवा संघटनेतील एक महत्वाच्या पदाची जबाबदारी घेवून हिंगोली नाका येथे महात्मा बसवेश्वर चौकाच्या सौदर्यीकरणासाठी त्यांनी संघर्षाचा पवित्रा घेवून हिंगोली नाका येथे महात्मा बसवेश्‍वरांचे वचनस्तंभ व सौदर्यीकरण व्हावे यासाठी गेल्या ४ ते ५ वर्षापासून लढा उभारला होता. यादरम्यान त्यांनी अनेकवेळा नगर परिषदेला निवेदने देवून आंदोलन व आत्मदहनाचा इशारा सुध्दा दिला होता. गोपालआप्पा यांच्या प्रयत्नाने व पुढाकाराने सौदर्यीकरणाचा मार्ग मोकळा झाला होता. यासाठी त्यांनी प्रशासनाला आत्मदहनाचा इशाराही दिला होता. शिवाय त्यांच्याच प्रयत्नाने या सौदर्यीकरण कामासाठी खासदार भावनाताईंनी ३ लाखाचा निधी उपलब्ध करुन दिला होता.

त्यांच्या निवेदनाची दखल घेवून भूमि अभिलेख कार्यालयाच्या वतीने जागेचे मोजमाप करण्यात आले होते. परंतु सदरील जागा ही दुसर्‍याच्या ताब्यात असल्यामुळे संबंधीतांनी याठिकाणी मोजमाप करण्यास आडकाठी आणली होती.हजारो मित्रपरिवार, नातेवाईक, पत्नी, मुले व वाशीमकरांना वार्‍यावर सोडून अखेर गोपालआप्पा महाजन यांनी अखेरचा निरोप घेतला. जातांना त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर बाय बाय लिहून ठेवले होते. अत्यंत कमी वयात त्यांनी आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेतल्याने अनेकांना जबर धक्का बसला आहे. तर त्यांच्या आत्महत्येप्रकरणी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व अभियंत्यांवर गुन्हे दाखल झाल्याने जिल्हयात खळबळ उडाली आहे.


प्रतीनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या