💥पुर्णा तालुक्यात परतीच्या पावसाने माजवला हाहाकार ; अन्नदाता शेतकऱ्यांच्या पळवला तोंडचा घास....!


💥तालुक्यातील सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान💥  

पुर्णा :- तालुक्यातील सहा जिल्हा परिषद सर्कल मध्ये परतीच्या पावसाने हाहाकार माजवल्याचे निदर्शनास येत असून अनेक गावात  मोठ्या प्रमाणात धोधो बरसत असलेल्या पावसाने अन्नदाता शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंना बांध फोडल्याचे निदर्शनास येत असून शेतकऱ्यांच्या कापणीस आलेल्या खरीप हंगामातील सोयाबीन,उडीद मुगासह अन्य पिक शेतांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे अक्षरशः सडून त्यांना कोंब फुटत असल्याचे निदर्शनास येत असून शेतकऱ्यांवर एकीकडे आसमानी संकट कोसळत असतांना मात्र प्रशासन धृतराष्ट्राची भुमीका निभावतांना पाहावयास मिळत असून विमा कंपन्यामात्र प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी कौरवनितीचा अवलंब करीत अॉनलाई/अॉफलाईनच्या नावावर शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.


परतीच्या पावसामुळे अन्नदाता शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले असून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेली पीक परतीच्या मुसळधार अतिपावसामुळे हातची निघून गेल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाली असून प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांच्या नशिबी निराशाच आल्याचे दिसत आहे.तालुक्यात सर्वत्र शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतांना व पुन्हा परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असतांना महसुल प्रशासनाकडून अद्यापही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे शासनाच्या वतीने पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात आल्याने याही वर्षी नैराष्यापोटी शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.


तालुक्यातील गौर-चुडावा-कावलगाव-एरंडेश्वर-ताडकळस-वजूर या सहा जिल्हा परिषद सर्कल मध्ये मोठ्या प्रमणात पाऊस झाल्याने पुर्णा-गोदावरी नद्यांसह परिसरातील ओढ्यांना व नाल्यांना मोठ्या प्रमाणात पुर येवून शेतकऱ्यांची अक्षरशः शेतातील उभी पिक वाहून गेली तर असंख्य शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेला सोयाबीन पिकाचा घास मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे हिरावला गेल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे         परतीच्या पावसामुळे तालुक्यातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे कमी कालावधीत नुकसान भरपाई चे सर्वेक्षण करणे कमी मनुष्यबळा अभावी शक्य नाही. त्या करीता शासनाकडून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई आवश्यकता आहे शासनाने नेहमी प्रमाणे पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होता कामा नयें या दृष्टिकोनातून पिक विमा  कंपन्यांना कठोर निर्देश देणे ही आवश्यक असून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देणे आता आवश्यक झाले आहे संपूर्ण महाराष्ट्रातच ओला दुष्काळ सदृश्य स्थिती आहे.शेतकऱ्याच्या हाता तोंडाला आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला आहे. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातच अतिरिक्त पाऊस झाला आहे.परभणी जिल्ह्यासह तालुक्यात मागील अनेक वर्षे दुष्काळ सदृष्य परिस्थिती होती यावर्षी पीकपाणी चांगलं आलं होतं. परंतु परतीच्या पावसाने थैमान घातला असून डोळ्यादेखत सर्व काही वाहून गेलं आहे. सोयाबीन, उडीद,मूग आदी पिकांसह खरिपाच्या सर्वच पिकांचे नुकसान झालेलं असून हळद उस आदीसह बागायती क्षेत्राला सुद्धा मोठा फटका बसला आहे. पंचनामे करण्यात विमा कंपन्या वेळ मारून नेतील अनेकवेळा ह्या कंपन्या आपल्यावर अन्याय करत आहेत अशी शेतकऱ्यांमध्ये भावना आहे.आधी सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची पूर्तता करा. शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा परभणी जिल्हा युवा सेना जिल्हा उपाध्यक्ष माणिकराव सुर्यवंशी यांनी केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या