💥मराठी पत्रकार परिषदेच्या नेतृत्वाखाली सर्व माध्यमकर्मी एकत्र आले तर पत्रकारांचे सर्व प्रश्न आपोआप मार्गी लागतील - एस.एम. देशमुख


💥राज्यात साडेसतरा हजार ‘युट्यूब चॅनल्स’ आणि ‘पोर्टल्स’ आहेत💥

बुलढाणा :  सोशल मिडियासाठी अ.भा. मराठी पत्रकार परिषदेने महाराष्ट्र सोशल मिडीया परिषद नावाची नवी व्यवस्था परिषदेच्या रचनेसारखीच निर्माण केली असून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या बॅनरखाली सर्व नवमाध्यमकर्मी एकत्र आले की, त्यांचे प्रश्न आपोआप मार्गी लागतील. पुणे, सातारा, बीड आदी जिल्ह्यात नवी व्यवस्था उभी रहात असून अन्य जिल्ह्यातही ही व्यवस्था सुरु करण्याचा प्रयत्न आहे. ‘यू ट्यूब चॅनल्स’ पोर्टलच्या प्रतिनिधींनी संपर्क साधावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी केले आहे.


एस. एम. देशमुख यांनी आपल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, एका अंदाजानुसार राज्यात साडेसतरा हजार ‘युट्यूब चॅनल्स’ आणि ‘पोर्टल्स’ आहेत.  हा आकडा पाहून पत्रकारितेतील काही ढुंडाचार्य म्हणतात "युट्यूब चॅनल्सचे पेव फुटले आहेत". मला असं वाटत नाही. नवं माध्यम आहे.  सर्व जण आपआपल्या परीनं या माध्यमाला आजमावत आहे. यातील फायदे तोटे तपासून पहात आहेत. अशा स्थितीत जे हाडाचे पत्रकार आहेत ते टिकतील, जे उपटसुंभ आहेत ते प्रवाहाच्या  बाहेर फेकले जातील. मात्र मातृसंस्था या नात्यानं नव्या माध्यमात धडपड करणाऱ्यांना बळ देणं, त्यांच्या समस्या समजावून घेत त्या वेशीवर टांगणं आणि त्यासाठी सर्वात अगोदर त्यांना संघटित करणं आवश्यक आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या बॅनरखाली हे सर्व नवमाध्यमकर्मी एकत्र आले की, त्यांचे प्रश्न आपोआप मार्गी लागतील. परिषदेची ख्याती अशी आहे की, परिषद जे विषय हाती घेते ते तडीस नेतेच नेते. सोशल मिडियातील मित्रांनी याची खात्री बाळगावी, असे आश्वासन दिले. पुढे आपल्या पत्रकार एस.एम. देशमुख यांनी नमूद केले की, सोशल मिडियासाठी परिषदेने महाराष्ट्र सोशल मिडिया परिषद नावाची नवी व्यवस्था केली आहे.. याचं कारण असं की, सोशल मिडिया आणि प्रिंट मिडियाचं प्रश्न पूर्णत: भिन्न आहेत. त्यामुळे त्यांचा वेगळा सेल स्थापन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. सोशल मिडिया परिषदेची रचना ही परिषदेसारखीच असेल. राज्य, जिल्हा, तालुका शाखा असतील. सोशल मिडिया परिषदेचा सदस्य होण्यासाठी ती व्यक्ती मराठी पत्रकार परिषदेचा सदस्य असलीच पाहिजे असे नाही.  मात्र तो अन्य कोणत्याही पत्रकार संघटनेचा सदस्य ही असता कामा नये.  मराठी पत्रकार परिषद आणि सोशल मिडिया परिषद या दोन्ही व्यवस्था परस्पर पूरक काम करतील. म्हणजे मराठी पत्रकार परिषदेचे सर्व लढे, आंदोलनं आणि कार्यक्रमांत सोशल मिडियाचे मित्र सहभागी होतील तद्वतच सोशल मिडिया च्या उपक्रमात परिषदेचे सदस्य सहभागी होतील. सोशल मिडियाची जिल्हा आणि तालुका स्तरावर तेथील सदस्य संख्या पाहून अकरा किंवा सात सदस्यांची कार्यकारिणी असेल.  त्यात अध्यक्षांसह चार पदाधिकारी असतील. या कार्यकारिणीची नियुक्ती राज्य कार्यकारिणी करेल. ही नियुक्ती एक वर्षासाठी असेल. वर्षभरात सदस्य संख्या वाढल्यानंतर पुढील वर्षी रितसर निवडणुका घेऊन कार्यकारिणी निवडली जाईल. ही कार्यकारिणी निवडतांना जिल्हा पत्रकार संघाला विश्वासात घेण्याच्या सूचना दिलेल्या असल्यातरी "आम्ही म्हणू तीच कार्यकारिणी निवडली जावी" असा अट्टाहास मान्य केला जाणार नाही. शेवटी ही पूर्णच स्वतंत्र व्यवस्था आहे. एका चॅनलचा किंवा पोर्टलचा एकच व्यक्ती सोशल मिडिया परिषदेचा सदस्य होईल.  याचा दुसरा अर्थ हे सदस्यत्व संबंधीत चॅनलसाठी आहे. सदस्य अर्ज भरताना चॅनेलचे ओळखपत्र, सबस्क्राईबरची संख्या, याची माहिती देणे आवश्यक आहे.पुणे, सातारा, बीड आदि जिल्ह्यात नवी व्यवस्था उभी राहत आहे. येथे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या  केल्या गेल्या आहेत. अन्य जिल्ह्यातही ही व्यवस्था सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असेल. ज्या ‘युट्यूब चॅनल्स’च्या चालकांना सोशल मिडिया परिषदेचा सदस्य व्हायचं आहे अशांनी सोशल मिडीयाचे राज्य प्रमुख बापुसाहेब गोरे (मो. 98222 22772) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी केले आहे....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या