💥वीर जवान कैलास भारत पवार यांना सियाचीन येथे कर्तव्यावर असताना आले वीरमरण.....!


💥पवार कुटुंबावर कोसळला दु:खाचा हिमालय💥

✍️ मोहन चौकेकक्ष

चिखली : ” ये देश है वीर जवानोका, अलबेलोका, मस्तानोका ” अशी जगभर ख्याती असलेल्या या भारतभूमीच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाचे बलिदान देण्यासाठी प्रत्येक सैनिक सदैव तत्पर असतो. रणांगणात शत्रूशी लढतांना धारातीर्थी पडण्यात जीवनाचे साफल्य मानणाऱ्या या जवानांच्या अनेक वीरगाथा आपल्याला माहिती आहेत. परंतु,  सियाचीनमध्ये देशाच्या सीमेवर खडा पहारा देणारा  चिखलीतील एक लश्करी जवान एक वर्षाचा कर्तव्याचा कालावधी पूर्ण झाल्याने घरी परतत असताना बर्फाळ डोंगरावरून पाय घसरल्याने खाली कोसळला आणि त्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला.       हिमालयाच्या पर्वतरांगेत असलेल्या सियाचीन ग्लेशियरमधील अंग गोठवून टाकणार्या थंडीत पारा शून्य अंश सेल्सिअसच्या खाली असतो. अश्या भयानक थंडीमध्ये देखील लश्करी जवान डोळ्यात तेल घालून चीनी आणि पाकिस्तानी कारवायांवर नजर ठेवून असतात. वेळप्रसंगी ते युध्दास देखील तयार असतात. अश्या दुर्गम आणि बर्फाच्छादित प्रदेशात चिखली येथील पुंडलिक नगर भागातील रहिवासी कैलास भारत पवार हा गेल्या २ ऑगस्ट २०२० पासून ३ – महार बटालियनमध्ये आपले कर्तव्य चोखपणे बजावत होता. त्याची सियाचीनमधील एक वर्षाची ड्यूटी १ ऑगस्टला संपली. आता तो सहा महिन्यांच्या सुटीवर घरी येणार होता.  आपल्या सहकार्यासह कैलास सियाचीन ग्लेशियरच्या बर्फाळ डोंगरावरून खाली उतरत होता. ( सियाचिन ग्लेशियर पर्यंत पाठीवर सामानाचे ओझे घेऊन जाणे आणि उतरून परत येणे हा प्रवास जवानांना पायीच करावा लागतो. तेथपर्यंत पोहचायला आणि तेथून खाली यायला प्रत्येकी चार दिवस लागतात ) दरम्यान, खाली उतरत असतांना बर्फाळ डोंगरावरून कैलासचा पाय घसरला आणि तो बर्फावरुन  घरंगळत खाली कोसळला. सोबत असलेल्या जवानांनी शक्य तेवढे लवकर त्याला तेथून हलवले आणि उपचारासाठी लडाखच्या इस्पितळात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान दि. १ ऑगस्ट रोजी कैलास पवारची प्राणज्योत मालवली. 

💥पवार कुटुंबावर कोसळला दु:खाचा हिमालय💥

हिमालयाच्या संरक्षणासाठी बंदोबस्तावर तैनात असलेल्या आपल्या सुपूत्राचा त्याच हिमालयाने असा घात का केला, त्याला आपल्यापासून कायमचे दूर का नेले ? हा वेदनादायी प्रश्न कैलासच्या कुटुंबियांना पडलाय. जणू काही कैलासच्या अश्या अनपेक्षित जाण्याने पवार कुटुंबावर दु : खाचा हिमालयच कोसळलाय. त्याच्या निधनाची दु : खवार्ता ऐकून घरातील मंडळी, नातलग आणि मित्रपरिवार शोकाकुल झाले आहेत. दिवंगत जवान  जवान कैलास पवार यांच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ आणि धाकटी बहीण असा आप्तपरिवार आहे. त्याच्या पार्थिवावर दि. ४ ऑगस्ट रोजी चिखली येथील तालुका क्रीडा संकुलात सकाळी ११ वाजता लष्कीरी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या