💥५०० कोटींच्या घोटाळ्यावर किरीट सोमय्या गप्प का ? खासदार भावना गवळींचा सवाल


💥पाटणी व्यापारी संकुलामध्ये आमदार पाटणी व कुटुंबीयांनी पाचशे कोटींचा गैरव्यवहार केला असेही खा.गवळी म्हणाल्या💥

✍🏻फुलचंद भगत

वाशीम : बालाजी पार्टीकल बोर्डाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या वाशीम जिल्ह्यात येऊन माझ्यावर खोटे आरोप करीत आहेत. सोमय्या हे भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी जमिनीची फेरफार करून केलेल्या ५०० कोटींच्या घोटाळ्यावर गप्प का, असा प्रश्न खासदार भावना गवळी यांनी उपस्थित करीत भाजपच्या भूमिकेचा समाचार घेतला.

             भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे बालाजी पार्टीकल बोर्डाची पाहणी करण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील देगाव येथे आले होते. त्यामुळे खासदार भावना गवळी यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. कागदपत्रांची चुकीच्या पद्धतीने फेरफार व नोंदी घेऊन नियमबाह्य पद्धतीने उभारलेल्या पाटणी व्यापारी संकुलामध्ये आमदार पाटणी व कुटुंबीयांनी पाचशे कोटींचा गैरव्यवहार केला आहे. या गैरव्यवहारासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सीबीआय व ईडीची चौकशी मागणार असल्याची माहिती खासदार भावना गवळी यांनी दिली.भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी व समर्थक न्यायप्रविष्ट प्रकरण चुकीच्या पद्धतीने समोर आणून माझी राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहे. चौदा वर्षांपासून प्रलंबित असलेला गुंठेवारीचा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने मार्गी लावल्यामुळे गरिबांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. गुंठेवारीचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे शहरातील भुमाफीयांचे आर्थिक नुकसान झाल्याने त्यांनी शिवसेनेची बदनामी सुरू केली. बालाजी सहकारी पार्टीकल बोर्डाच्या बाबतीतही असेच झाले, असेही त्या म्हणाल्या. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी, नगरसेवक ॲड. विनोद खंडेलवाल, तालुका प्रमुख रामदास मते पाटील, रवी पवार, रवी भांदुर्गे उपस्थित होते.

💥राग काढण्यासाठी खोटे आरोप :-

आमदार पाटणी समर्थक व संस्थेचे तत्कालीन प्रशासक हरीश सारडा यांनी १९९८ मध्ये शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली शेतकऱ्यांच्या खरेदी-विक्री संघाची कोट्यवधींची जागा पाटणी नामक व्यापाऱ्याला दीर्घ मुदतीसाठी लिजवर दिली होती. त्यावेळी आम्हीच टोकाचा विरोध करून ही जागा पाटणीकडून परत मिळविली होती. विरोधक व भुमाफीयांना हा सर्व राग काढायचा असल्यामुळे आमच्यावर खोटे नाटे आरोप सुरू केले. तेव्हा पाटणी व्यापारी संकुलामध्ये झालेल्या पाचशे कोटीच्या घोटाळ्याची चौकशी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या करतील काय, असा सवालही खासदार भावना गवळी यांनी केला.

प्रतिनीधी-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या