💥हिंगोली जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ सहाय्यकास 30 हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडले....!


💥रंगेहाथ पकडलेल्या लाचखोराचे नाव सी.आर.वाजपेयी असे असल्याचे पोलिसांनी सांगितले💥

हिंगोली जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातून औंढा नागनाथ येथे बदली केल्याचा मोबदला म्हणून 30 हजार रुपयाची लाच घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ सहाय्यकास लाचलुचपतच्या पथकाने काल बुधवार दि.१८ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी रंगेहाथ पकडले. सी. आर. वाजपेयी असे त्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या एका अभियंत्यास औंढा नागनाथ येथील पंचायत समिती कार्यालयमध्ये बदली हवी होती. त्यानुसार त्यांनी जिल्हा परिषदेचे कर्मचारी सी.आर. वाजपेयी यांच्याकडे बदली बाबत विचारणा केली. यासाठी वाजपेयी याने होकार दिला. त्यानंतर तारीख 13 ऑगस्ट रोजी तक्रारदाराच्या बदलीचे आदेशही निघाले. तक्रारदाराची बदली औंढा नागनाथ पंचायत समिती येथे करण्यात आली. या बदलीचा मोबदला म्हणून वाजपेयी याने तीस हजार रुपये लाचेची मागणी केली. सदर रक्कम आज देण्याचे ठरले.

या प्रकरणात संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. यावरून आज सायंकाळी जिल्हा परिषदेमध्ये लाचलुचपतचे उपाधिक्षक निलेश सुरडकर, जमादार विजयकुमार उपरे . ज्ञानेश्वर पंचलिंगे, तानाजी मुंडे, रूद्रा कबाडे, हिम्मतराव सरनाईक यांच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वाजपेयी यांने कार्यालयातच तीस हजार रुपयांची लाच घेतली. त्याने लाच स्वीकारताना लाचलुचपतच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या