💥रायगड जिल्ह्यातील नागोठाण्याचे पत्रकार नवीन सोष्टे पेन्शनची प्रतीक्षा करीतच गेले....!


💥मात्र तुम्ही ३० वर्षे पत्रकारितेत नाहीत असे नेहमीचे कारण देत त्यांना प्रशासनाने पेन्शन नाकारली गेली💥

 रायगडमधील नागोठणयाचे पत्रकार नवीन सोष्टे यांच्या निधनाची बातमी शोकाकुल करणारी आहे.. रायगडमध्ये असताना जे माझे कौटुंबिक मित्र होते त्यात सोष्टे यांचा समावेश होता.. रायगड सोडल्यानंतर ही आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो..एक चांगला मित्र मी आज गमविला आहे.. 

नवीन सोष्टे यांना पत्रकार पेन्शन योजनेचा लाभ मिळावा यासाठी बरेच प्रयत्न केले.. मात्र असंवेदनशील सरकारी यंत्रणेनं त्यांना पेन्शन मिळू दिली नाही.. नवीन सोष्टे अधिस्वीकृती धारक पत्रकार तर होतेच त्याचबरोबर आयुष्याची ४०-४५ वर्षे त्यांनी केवळ पत्रकारिता आणि पत्रकारिताच केली. ..मात्र तुम्ही ३० वर्षे पत्रकारितेत नाहीत असे नेहमीचे कारण  देत त्यांना पेन्शन नाकारली गेली.. .. आयुष्यभर पत्रकारिता जगलेल्या नवीन सोष्टे यांच्याकडे उत्पन्नाचे अन्य कोणतेच साधन नव्हते.. त्यामुळे त्यांना पेन्शनची सक्त गरज होती..परंतू .तांत्रिक मुद्दे उपस्थित करून माहिती आणि जनसंपर्क मधील अधिकरयांनी सोष्टे यांना त्यांच्या हक्कांपासून वंचीत ठेवले .. आज पेन्शन मिळेल, उद्या मिळेल अशी प़तिक्षा करीतच सोष्टे आज कायमचे निघून गेले..पण अखेरपर्यंत त्यांना पेन्शन मिळाली नाही.. तोंडं पाहून पेन्शन दिली जाते, जे पात्र नाहीत अशा अनेकांना पेन्शन दिली जाते पण सोष्टे सारख्या अनेकांच्या बाबतीत केवळ तांत्रिक मुद्दे उपस्थित करून त्यांना डावलले जाते..हा अनुभव एकट्या नवीन सोष्टे यांचा नाही.. राज्यातील किमान २०० ज्येष्ठ आणि वयोवृद्ध पत्रकारांची अवस्था नवीन सोष्टे पेक्षा वेगळी नाही..  चीड आणणारं आहे हे सारं. 

दु:ख याचं होतं की, माहिती आणि जनसंपर्क राज्यमंत्री अदिती तटकरे रायगडच्या आहेत.. त्यांच्या गावच्या पत्रकारावर हा अन्याय झालेला आहे.. गंमत म्हणजे अलिबागमधील एका कार्यक्रमात अदिती तटकरे आणि महासंचालक डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांना सोष्टे यांच्यावर कसा अन्याय केला जात आहे हे निदर्शनास आणून दिले होते.. मात्र त्यानंतरही काही झाले नाही.. सोष्टेचीच नव्हे तर महाराष्ट्रातील वयोवृद्ध पत्रकारांच्या या वेदना मुख्यमंत्र्यापर्यत पोहोचूच दिल्या जात नाहीत आणि पत्रकारांना भेटायला मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही अशा स्थितीत आणखी किती नवीन सोष्टे पेन्शनची प़तिक्षा करीतच आपल्याला सोडून जातील सांगता येत नाही..

पेन्शन योजनेसाठी आम्ही तब्बल २२ वर्षे सरकार दरबारी पाठपुरावा केला.. पेन्शन योजना  सुरू करून सरकारनं ढोल तर बडवून घेतले पण ज्यांच्यासाठी ही पेन्शन योजना अपेक्षित होती ते सारेच पत्रकार या योजनेच्या परिघाबाहेर ठेवले गेले.. जे पेन्शन योजनेचे लाभार्थी ठरूच शकत नाहीत पण त्यांना पेन्शन दिली गेली अशी किमान पंचवीस नावं माझ्याकडे आहेत आणि ती दिलीप पांढरपट्टे यांना मी सांगितली आहेत.. पण बदल होत नाही..सरकारकडे पैसे नसतील किंवा पत्रकारांना पेन्शन देऊच नये असे सरकारमधील काहींना वाटत असेल तर ही पेन्शन योजना बंद केली तरी हरकत नाही.. कारण योजनाच नसेल तर दुःख होणार नाही पण पात्र असूनही आपल्याला डावलले जाते हा अन्याय किमान पत्रकारांना सहन होत नाही..पण वयपरत्वे ते काही करूही शकत नाहीत.. त्यातून केवळ दु:ख पदरी पडते.. जे नवीन सोष्टे यांच्या वाट्याला आले.. एका ध्येयवादी, तत्त्वनिष्ठ पत्रकाराच्या बाबतीत हे सारं घडायला नको होतं.. 

रायगडवर नितांत प़ेम असणारा, रायगडच्या प़श्नांची चांगली माहिती असणारा, चळवळीशी नातं सांगणारा,गळ्यात शबनम अडकवून कायम भटकंती करणारा, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षपद समर्थपणे पेलणारा एक जागरूक, सतत सामान्यांची बाजू घेऊन लढणारा पत्रकार आणि सिद्धहस्त लेखक (नवीन सोष्टे यांची विविध विषयांवरची १८ पुस्तकं प़सिध्द आहेत) आज आपण गमविला आहे.नवीन सोष्टे यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून येणारी नाही..


भावपूर्ण श्रद्धांजली 

 मराठी पत्रकार परिषद सोष्टे परिवाराच्या दु:खात सहभागी आहे.. ..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या