💥परभणी जिल्ह्यातील सेलू येथील लाचखोर डिवायएसपी राजेंद्र पालच्या मुंबईतील निवासस्थानातून २४ लाख रुपये जप्त...!


💥पाल लाचखोरी प्रकरणा नंतर पोलिस प्रशासन सतर्क सेलूतील करवा अपघात प्रकरणाचा उलगडा ही होण्याची शक्यता ?💥

परभणी (दि२५ जुलै २०२१) - जिल्ह्यातील सेलू येथील लाचखोर उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल याच्या मुंबई येथील निवासस्थानातून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी २४ लाख ८४ हजार रुपयांची बेहिशोबी रक्कम जप्त केली आहे.


उपविभागीय पोलिस अधिकारी पाल याने तक्रारकर्त्याकडून मागितलेल्या १ कोटी ५० लाख रुपयांच्या लाचे पैकी पोलिस नाईक गणेश चव्हाण यांना १० लाख रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडल्याच्या प्रकरणात दोघा आरोपींना सेलू पोलिसांनी येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने या दोघांना २७ जुलै २०२१ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली त्या लाचखोरीच्या घटने नंतर एसीबीच्या पथकाने आरोपी पाल याच्या मुंबई व सेलूतील घरांवर छापे टाकून कार्यवाही केली.

 दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई येथील सहाय्यक पोलिस आयुक्त आबासाहेब पाटील यांनी काल शनिवार दि.२४ जुलै २०२१ रोजी सकाळी एका प्रेसनोटद्वारे सेलूतील त्या कारवाईबाबत तपशीलवार माहिती दिली. तक्रारकर्ता यांना दाखल गुन्ह्यामध्ये मदत करण्याकरीता लाचखोर उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल वय ५५ याने दोन कोटी रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १ कोटी ५० लाख रुपयांची मागणी केली. ती बाबही स्पष्ट झाली. तसेच त्या रकमेपैकी पोलिस नाईक गणेश चव्हाण नेमणूक मानवत पोलिस स्टेशन याने तक्रारकर्ता यांच्या भावाकडून १० लाख रुपयांची लाचेची रक्कम स्विकारली. ती रक्कम स्विकारतांनाच नाईक यास रंगेहाथ पकडण्यात आले.

     या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांच्याकडे संबंधित तक्रारकर्त्याने २२ जूलै २०२१ रोजी प्रत्यक्ष येवून लेखी तक्रार दिली. त्या तक्रारीवर कारवाई करण्याकरीता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी निर्देश दिले. त्या प्रमाणेच दि.२३ जुलै २०२१ रोजी तक्रारकर्त्याच्या तक्रारीची पडताळणी केली असता आरोपी तथा उपविभागीय अधिकारी पाल ह्याने तक्रारकर्ता यांच्याकडे गुन्ह्यात मदत करण्याकरीता २ कोटी रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. तडजोडीअंती १ कोटी ५० लाख रुपयांची मागणी केल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळेच काही वेळातच केलेल्या सापळा कारवाईत पोलिस नाईक चव्हाण यास रंगेहाथ पकडल्या गेले, असे या प्रेसनोटमधून नमूद केले....

या प्रकरणात या प्रेसनोटमधून तक्रारकर्ता यांच्या मित्राचा अपघाती मृत्यू झाल्याबाबत दि.03 मे 2021 रोजी सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (रजिस्टर क्रमांक 120/221 भादवि कलम 304 (अ) 279, 427) अन्वये तो गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील मयत यांची पत्नी सोबत यातील तक्रारदार यांचे झालेले मोबाईलवरील संभाषण व्हायरल झाल्याने दि.09 जुलै 2021 रोजी यातील आरोपी तथा उपविभागीय अधिकरी पाल यांनी तक्रारकर्ता यांना त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले. तुझी व्हायरल झालेली क्लीप मी ऐकली असून त्यातून तुला बाहेर पडावयाचे असेल तर मला 2 कोटी रुपये द्यावे लागतील, असे बोलून तक्रारकर्ता यांना वारंवार फोन करुन, आर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन 2 कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती, असेही या प्रेसनोटमधून नमूद करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या