💥राज्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्लूएस आरक्षणाचा मिळणार लाभ......!


💥मराठा आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना पुन्हा नव्यानं प्रवर्ग निवडावा लागेल💥

मुंबई (दि.१८ जुन २०२१) - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर मराठा समाजातील विद्यार्थी नाराज झाले होते. आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा एकदा रद्दही झाली आहे. त्यातच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं एसईबीसी आरक्षण कोट्यातून अर्ज भरलेल्या उमेदवारांना ईडब्लूएस पर्याय निवडण्यासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे.


 मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सवलतीचा उपाय म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आता शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या प्रवर्गाच्या आरक्षणासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन पर्याय देऊ केले आहेत. उमेदवारांना एक तर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रवर्गाच्या आरक्षणाचा लाभ घेता येईल किंवा त्यांना खुल्या प्रवर्गाचा म्हणजे ओपन पर्याय निवडावा लागेल.SEBC प्रवर्गाऐवजी आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना EWS आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. उमेदवारांकडे खुल्या प्रवर्गाची निवड करण्याचा पर्याय देखील उपलब्ध असेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं प्रवर्ग निवडीबाबतचं परिपत्रक काढलं आहे. 23 जूनपर्यंत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दरम्यान, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा दावा केलेल्या उमेदवारांनी आयोगाच्या 4 जानेवारी रोजीच्या प्रसिध्दी पत्रकानुसार कोणत्याही पदभरती/परीक्षांकरीता यापूर्वी प्रवर्ग निवडला असला तरी मराठा आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना पुन्हा नव्यानं प्रवर्ग निवडावा लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या